हिंजवडीबाबत पालकमंत्रीही संभ्रमात 

हिंजवडीबाबत पालकमंत्रीही संभ्रमात 

पिंपरी - प्रस्तावित म्हाळुंगे- माण रस्त्यातील मुळा नदीवरील पुलाचा रस्ता का वळविला..., जमिनींचा ताबा नसताना तीन कोटी खर्चून चांदे-रास्ते रस्ता कशाच्या आधारे विकसित केला..., हिंजवडी आयटी क्षेत्र उभारताना कचरा व्यवस्थापनाचा विचार का केला गेला नाही..., अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. 15) संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. असंख्य तांत्रिक अडचणींमुळे हिंजवडीतील सार्वजनिक मूलभूत सोयी-सुविधांचा विकास रखडला आहे. या अडचणी दूर करून लवकरात लवकर सोयी-सुविधा विकसित केल्या जातील, असे आश्‍वासनही बापट यांनी पत्रकारांना दिले. 

हिंजवडी आयटी क्षेत्रातील वाहतूक कोंडीबाबत "सकाळ'ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी आज हिंजवडी दौरा करून रखडलेल्या पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंता सुधीर नागे, वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पै, इन्फ्रास्ट्रक्‍चर समितीचे शेखर सोनसळे, कर्नल चरणजित सिंग, आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अभियंते सहभागी झाले होते. 

असा केला दौरा... 
- बालेवाडीपासून प्रारंभ. शेडगे वस्ती येथे बापट यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याचा विकास आणि त्यातील अडसर जाणून घेतला. या रस्त्याचे अडथळे व शासकीय यंत्रणांची हद्द यानुसार टप्पे (तुकडे) पाडावेत व त्या अनुषंगाने अडथळ्यांचा खोलवर जाऊन साकल्याने अभ्यास करावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 

- म्हाळुंगेत मुळा नदीवर विकसित करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. जानेवारी 2018 पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश एमआयडीसीला दिले. खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या जमिनीलगत पुलाचा मार्ग का वळविला, असा जाब बापट यांनी विचारला. अधिकाऱ्यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. 

- चांदे- नांदे रस्त्याची पाहणी केली. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शंका विचारल्या. या रस्त्याची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशा सूचना केल्या. शेतकऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. 

रस्तेविकासाचे टप्पे 
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात पालकमंत्री बापट यांनी म्हाळुंगे- माण रस्त्याचा विकास सात टप्प्यांत करण्याची घोषणा केली. त्यात मर्सिडीज बेंझ शोरूम ते शेडगे वस्ती, शेडगे वस्ती ते कुमार बिल्डर, म्हाळुंगे गावठाण ते शेडगे वस्ती, म्हाळुंगे पूल ते साखरे रेसिडेन्सी असे टप्पे त्यांनी जाहीर केले. पुढील महिन्यात बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, असेही बापट यांनी जाहीर केले. 

पालकमंत्री म्हणाले... 
- हिंजवडी विकासाचे काम कोणीही अडवू नये 
- शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही 
- शेतकऱ्यांना विनासायास झोन बदलून मिळेल 
- एफएसआय वाढवून मिळेल 
- रस्त्यांच्या विकासामुळे जमिनींच्या किमती आपसूकच वाढतील 

शेतकरी म्हणाले... 
- शेतकऱ्यांना 60 टक्के जमीन परतावा मिळावा 
- पुणे मेट्रोच्या धर्तीवर चार पट एफएसआय द्यावा 
- मागण्या मान्य केल्यानंतरच जमिनी देऊ 
- म्हाळुंगेतील पाणी, कचरा, आरोग्य प्रश्‍न सोडवावेत 
- आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य कराव्यात 

बैठकीतील घोषणा 
- मुख्य रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी हिंजवडीच्या चारही दिशांनी रस्त्यांचा विकास करणार 
- मेट्रोसाठी 50 एकर जमीन संपादित करण्याकरिता दोनशे कोटींची तरतूद 
- हिंजवडी आयटी पार्क वाहनतळासाठी 12 हजार चौरस फुटांचा भूखंड देणार 
- अतिक्रमणे, फेरीवाले आणि कचरा व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com