‘योगा’त रमले आयटीयन्स

वैशाली भुते 
बुधवार, 21 जून 2017

‘आयटीयन्स’ना भेडसावणाऱ्या समस्या
मानसिक ताण
पाठदुखी
मानदुखी
खांद्याचे दुखणे
डोळे कोरडे पडणे
बोटे आणि मनगटदुखी
सतत एका जागी बसून शरीराला आलेली कठोरता

पिंपरी - शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करून अधिकाधिक कार्यक्षम राहण्यासाठी ‘आयटीयन्स’कडून नियमित योग करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आयटी कंपन्यांनीच पुढाकार घेतला असून, कर्मचाऱ्यांना दररोज योग प्रशिक्षण देण्यासाठी खास व्यवस्थाही केली आहे. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागल्याने ‘आयटीयन्स’साठी योग परवलीचा शब्द झाला आहे. 

साडेचार लाखांहूनही अधिक कर्मचारी संख्या असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील ६० टक्के कर्मचारी नियमित योगा करून आपले शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आयटी कर्मचाऱ्यांचा योगाकडे असलेला ओढा लक्षात घेऊन अनेक ‘योग संस्थां’नी या कंपन्यांमध्ये शिरकाव केला आहे. नव्हे तर ‘मेडिटेटिव्ह योगा’, ‘टोटल योगा’, ‘परम योगा’ अशा अनेक संस्था सध्या ‘आयटीयन्स’ना योगाचे धडे देत आहेत. आयटीयन्सचे शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य लक्षात घेऊन या संस्थांनी खास त्यांच्यासाठी योग प्रकार विकसित केले आहेत. विशेषत: आयटीयन्सची व्यग्र जीवनशैली लक्षात घेऊन या संस्थांनी थेट कामाच्या ठिकाणी म्हणजे ‘डेस्कटॉप योगा’ ही संकल्पना राबविली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांकडून काम करता करताच बसल्या जागी योग करून घेतला जात आहे. या प्रकारातून कामाबरोबरच मानसिक ताण कमी होऊन शारीरिक आरोग्यही निरोगी राखता येत आहे. त्यामध्ये ‘भ्रमरी प्राणायाम’, ‘अनुलोम विलोम प्राणायाम’ असे योग प्रकार शिकविले जात आहेत. 

प्रचार व प्रसार
सध्याच्या प्रचलित अन्य व्यायाम प्रकारांच्या तुलनेत योगा प्रभावी आहेच. तथापि, अमेरिकेने त्याला दिलेली मान्यता, श्री श्री रविशंकर यांच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंनी योगा आणि अध्यात्माचा साधलेला मेळ आणि बॉलिवूडमधील शिल्पा शेट्टी, लिसा रे यांनी योगा जवळ केल्यानेही योगाचा प्रचार आणि प्रसार झाला असल्याचे तळेकर यांनी सांगितले.

६० टक्के आयटीयन्सचा सहभाग 
‘टोटल योगा’च्या प्रशिक्षिका चिन्मयी पै म्हणाल्या, ‘‘चार वर्षांपूर्वी आम्ही आयटी कंपन्यांमध्ये ‘योग शिबिरे’ आयोजित करण्यास सुरवात केली. त्या वेळी काही मोजक्‍याच कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातही हजारो कर्मचारी संख्या असलेल्या या कंपन्यांमधील ३० ते ४० कर्मचारीच शिबिरांना उपस्थिती लावायचे. आता अनेक कंपन्याच आमच्याशी संपर्क साधून शिबिरे आयोजित करण्याची विनंती करतात. थेट कामाच्या ठिकाणी घेतलेल्या शिबिरात ६० ते ७० टक्के कर्मचारी सहभागी होतात.’’

कॉर्पोरेट योगा ट्रेनर्स
आयटी क्षेत्रामुळे योगामध्ये ‘कॉर्पोरेट योगा ट्रेनर्स’ ही संकल्पना पुढे आली आहे. हे योगा ट्रेनर्स नियमित स्वरूपात अथवा ठराविक दिवशी संबंधित कंपन्यांमध्ये जाऊन योग प्रशिक्षण देत आहेत. बऱ्याच कंपन्या या योग प्रशिक्षकांना बोलावून कार्यशाळा घेत आहेत. ‘योग दिना’चे निमित्त साधून यंदाही अनेक कंपन्यांनी योग शिबिरांचे आयोजन केले आहे, असे ‘मेडिटेटिव्ह योगा इंटरनॅशनल फाउंडेशन’चे दिनेश तळेकर यांनी सांगितले. 

योगामुळे  होणारे फायदे
मनातून शरीरात झिरपलेला ताण नाहीसा होतो
रक्ताभिसरणात वाढ
शारीरिक लवचिकता वाढते
स्नायू शिथिल होतात
ऊर्जेच्या पातळीत वाढ, ताजेतवाने

आयटी क्षेत्रात ‘वीकेंड’शिवाय वेळ मिळत नाही. त्यामुळे सोसायटीतील ‘वीकेंड योगा’ क्‍लासला मी जाते. त्यातून काम करून आलेली मरगळ निघून जाते. दिवसभर ताजेतवाने वाटते.
- आरती शिंदे

योगा क्‍लास करण्यापूर्वी मला ताणतणाव, सांधेदुखीचा मोठा त्रास होत होता. तथापि, नियमित योगामुळे माझे त्यातील अनेक त्रास केवळ तीन महिन्यांतच कमी झाले.
- धवल प्रजापती