प्राधिकरणात साकारणार ‘मेट्रो इको पार्क’

मिलिंद वैद्य
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

: सकाळ वृत्तेसवा
पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड जसे श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते, तसे उद्यानांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराच्या सौंदर्यावर नेहमीच मराठी सिनेसृष्टी भाळलेली असते. आता उद्यानांच्या या माहेरघरात आणखी एका नैसर्गिक उद्यानाची भर पडत आहे. पुणे मेट्रोच्या उभारणीमध्ये जेवढी झाडे हटवावी लागणार आहेत, त्याहून अधिक नानाविध प्रकारची झाडे या उद्यानात पाहायला मिळणार आहेत. एखाद्या जंगलाप्रमाणे (फॉरेस्ट स्टेशन) या मेट्रो इको-पार्कची रचना असेल. हे उद्यान प्राणवायूचा स्रोत (ऑक्‍सिजन हब) म्हणूनही ओळखले जाईल.

प्राधिकरणाच्या सेक्‍टर २९ मध्ये खाचखळग्यांच्या पाच एकर जमिनीत पुणे मेट्रो इको पार्क साकारणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने ही जागा पुणे मेट्रोला उपलब्ध करून दिली आहे. या प्रस्तावाला नुकतीच परवानगी दिली आहे. त्याचा विकास आराखडाही प्राधिकरणाने तयार करून दिला आहे. पुण्यातील प्रसिद्ध आर्किटेक्‍ट धनश्री कुलकर्णी यांनी संपूर्ण पाच एकरांत झाडांची लागवड कशी असणार, वेगवेगळे ट्रॅक्‍स, पाण्याचे तळे, वाहनतळ, ॲम्फी थिएटर कसे विकसित करायचे याची प्रतिकृती (मॉडेल) तयार केली आहे.
दोन गटांत विभागणी
ॲक्‍टिव्ह झोन आणि इको झोन अशा दोन प्रकारांत उद्यान विकसित केले जाईल. ॲक्‍टिव्ह झोनमध्ये पर्यटकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन डिझाइन तयार केले जाणार आहे. लहान मुलांच्या खेळण्याची जागा, पदपथ, एकत्र बसण्याची जागा असेल. इको झोनमध्ये मोठे तळे, वृक्षांची विभागवार आखणी केलेली असेल. 
विविध झाडांचा समावेश
उद्यानाला संपूर्ण तटबंदी असेल. प्रवेशद्वाराजवळ वाहनतळ, तेथून पुढे सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक असेल. नैसर्गिक मोठ्या खाचखळग्यांमध्ये पाण्याचे तळे असेल. विरंगुळ्यासाठी ॲम्फी थिएटर असेल. उद्यानात सावली देणारी नेवार, कडुनिंब, लावर, शिसम असे मोठे वृक्ष असतील. हनुमानफळ, फणस, अंजीर, कवठ, आंबा, आवळा यांसारखी फळझाडे असतील. सुगंधी झाडांमध्ये तामण, सोनचाफा, बकुळ, मुचकुंद फुलझाडांचा समावेश असेल, तर कांचन बांबू, बॉटल ब्रश, ग्रीनबांबू, भोमा इत्यादी दाट झाडांची बेटे असतील. शिवाय बहावा, गुलमोहर, पांगरा, अर्जुन, सिल्वरओक अशी मोठी फुलझाडे असतील. पारंपरिक (हेरिटेज) वृक्षांमध्ये वड, पिंपळ, उंबर, आपटा ही झाडे असतील. दाट झाडीमुळे पक्ष्यांचा किलबिलाटही परिसरात होणार असून, पक्षीमित्रांसाठी ती पर्वणी ठरणार आहे.

मेट्रो प्रशासनाने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीकडे जागेचा प्रस्ताव दिला आहे. वनीकरण विभागाने तळजाई येथे दहा एकर, तर खराडीत पाच एकर जागा दिली आहे. प्राधिकरणासह सर्व ठिकाणी वृक्ष लागवड सुरू केली आहे.
- भानुदास माने, 
उपसरव्यवस्थापक, उद्यान विभाग, पुणे मेट्रो
सेक्‍टर २९ मधील पाच एकर जागा प्राधिकरणाने मेट्रोला उद्यान विकसित करण्यासाठी दिली आहे; मात्र जागा प्राधिकरणाच्याच मालकीची राहील. उद्यान विकसित झाल्यावर प्राधिकरण त्याची देखभाल करेल.
- सतीशकुमार खडके, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

Web Title: pimpri news metro eco park