पिंपरी-चिंचवड शहरात ६ स्थानके

पिंपरी-चिंचवड शहरात ६ स्थानके

पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई रस्त्यावर सध्या मेट्रो प्रकल्पाच्या ३५ खांबांचे बांधकाम सुरू असून, पुण्यापेक्षाही पिंपरी- चिंचवडमध्ये काम गतीने होत आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची सहा स्थानके आहेत. या स्थानकांची कामे लवकरच सुरू होतील.  

पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो ही रस्त्याच्या वर १४ ते २० मीटर उंचीवरून धावणार आहे. म्हणजे सर्वसाधारण इमारतीच्या चौथ्या ते सहाव्या मजल्याच्या उंचीएवढ्या अंतरावरून मेट्रो मार्गस्थ होईल. महापालिका भवनालगतच्या पदपथावरून सुरू होणारी मेट्रो पिंपरी चौकापासून पुढे गेल्यानंतर ग्रेडसेपरेटरमध्ये असलेल्या दुभाजकावरून वल्लभनगरच्या दिशेने जाईल. नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाण पूल असल्यामुळे, तेथे ग्रेडसेपरेटर आणि कासारवाडी स्थानकालगतच्या सर्व्हिस रस्त्यामधील दुभाजकावर रेल्वे जाईल. तेथे सुमारे १९ मीटर उंचीवरून मेट्रो ही उड्डाण पुलाच्या रॅम्पजवळून पुण्याच्या दिशेने जाईल. त्यानंतर वळण घेत मेट्रो पुन्हा ग्रेड सेपरेटरच्या मध्यभागी उभारण्यात येत असलेल्या खांबांवरून दापोडीच्या दिशेने मार्गस्थ होईल. 

पहिल्या स्थानकाच्या पुढे निगडीच्या दिशेने सुमारे सहाशे मीटर लोहमार्ग असेल. हा मार्ग अहिल्यादेवी चौकाजवळील सेंट्रल मॉलपर्यंत उभारण्यात येईल. मेट्रो गाड्या वळविण्यासाठी याचा वापर होईल. या मार्गावर कलासागर हॉटेलजवळ पहिल्या खांबाचे काम पूर्ण झाले आहे. त्यालगतच्या पाच खांबांचे काम सुरू आहे. आणखी तीस ठिकाणी खांबांच्या पायाचे काम सुरू आहे. सर्वसाधारणपणे २५ मीटर अंतरावर हे खांब आहेत. काही ठिकाणी ते अंतर २८ किंवा ३१ मीटर आहे. मेट्रो स्थानकाच्या खालील खांबांमधील अंतर १५ मीटर असेल. खांबांच्या वर सिमेंट क्राँक्रीटचे बॉक्‍स बसविण्यात येणार आहेत, त्यावर लोहमार्ग टाकण्यात येतील. स्थानकांची रस्त्यापासूनची उंची वेगवेगळ्या ठिकाणी कमी- जास्त असली, तरी लोहमार्ग समान उंचीवरच असेल. रस्त्याच्या चढ- उतारानुसार त्या त्या ठिकाणी स्थानकाची उंची ठरविली आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो स्थानक
जमिनीपासून उंचावर असलेले मेट्रो रेल्वे स्थानक. १४० मीटर लांब, २२ मीटर रुंद आणि लोहमार्गापासून ७.५ मीटर उंच (प्लॅटफॉर्मपासून ५.५ मीटर उंच) अशी स्थानकाची रचना असेल. पूर्ण वातानुकूलित. रस्त्यावरून स्थानकात ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सरकते जिने. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी उड्डाण पूल. देशात प्रथमच लोहमार्ग आणि प्रवासी यांच्यामध्ये सुरक्षिततेसाठी काचेची भिंत, मेट्रोत बसण्यास जाण्यासाठी स्थानकावर सरकते दरवाजे.

असा असेल मेट्रोचा प्रवास
पहिले स्थानक - अहिल्यादेवी चौक 
(मोरवाडी चौक)
चौकाच्या अलीकडे आणि महापालिका भवनाचे प्रवेशद्वार यांच्यामध्ये पदपथावर १८.३९ मीटर उंचीवर स्थानक.

दुसरे स्थानक - संत तुकारामनगर
पहिल्या स्थानकापासून २.१ किलोमीटर अंतर. वल्लभनगर बसस्थानकासमोर. ग्रेडसेपरेटरच्या मध्यभागी. दुभाजकावर रस्त्यापासून १३.७८ मीटर उंचीवर स्थानक.

तिसरे स्थानक - भोसरी (नाशिक फाटा)
संत तुकारामनगरपासून ७८७ मीटर अंतरावर रस्त्यापासून १८.९४ उंचीवर. कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या बाजूला ग्रेडसेपरेटर आणि सर्व्हिस रस्ता यांच्यामधील दुभाजकावर हे स्थानक असेल. सध्या उड्डाण पुलाचा रॅम्प जेथे संपतो, तेथपासून पिंपरीच्या दिशेने हे स्थानक असेल. बीआरटी, लोकल रेल्वे आणि मेट्रो या तिन्ही सेवा येथे प्रवाशांना एकत्रित मिळतील.

चौथे स्थानक - कासारवाडी
तिसऱ्या स्थानकापासून एक हजार २७२ मीटर अंतरावर. अल्फा लावल आणि फोर्ब्स मार्शल या कंपन्यांच्या मध्ये ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावर रस्त्यापासून १४.९० मीटर उंचीवर कासारवाडी स्थानक असेल.

पाचवे स्थानक - फुगेवाडी
जुन्या जकातनाक्‍यासमोर ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावर रस्त्यापासून १४.४३ मीटर उंचीवर हे स्थानक असेल. कासारवाडीपासून फुगेवाडी स्थानक एक किलोमीटरवर आहे.

सहावे स्थानक
पिंपळे सौदागरकडे जाणारा उड्डाणपूल संपल्यानंतर पुण्याच्या दिशेने असलेल्या पेट्रोल पंपासमोर हे स्थानक असेल. फुगेवाडी स्थानकापासून ८६६ मीटर अंतरावर असलेले दापोडी स्थानक ग्रेडसेपरेटरच्या दुभाजकावर रस्त्यापासून १४.०५ मीटर उंचीवर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com