पिंपरी शहरात रक्ताचा तुटवडा

पिंपरी शहरात रक्ताचा तुटवडा

पिंपरी - शहरात सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय, ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी पॉझिटिव्ह’ या गटाचे
रक्त मिळविण्यासाठीदेखील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना सरासरी दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यामुळे या रुग्णांना मुख्यत्वे रक्त मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत रविवारी समोर आली. रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती रक्तपेढ्यांतून मिळाली.

‘सकाळ’कडून प्रत्यक्ष पाहणी
पालिकेची यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय रक्तपेढी (पिंपरी) आणि पीएसआय रक्तपेढी (खराळवाडी) येथे ‘सकाळ’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली. या पाहणीमध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जास्त प्रमाणात असल्याची माहिती समोर आली. त्या खालोखाल ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी पॉझिटिव्ह’ या रक्तगटाचे रक्त मिळविण्यात अडचणी येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. ‘ओ’ निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त उपलब्ध नसल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आठ दिवसांच्या आतील (फ्रेश ब्लड) रक्त लागते. त्यामुळे ते उपलब्ध करून देण्यात अडचणी जाणवत आहे’’, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी डॉ. शालिनी पवार यांच्याशी मात्र याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

थॅलेसिमियाग्रस्त रुग्णाला मिळाले अखेर रक्त
भोसरी-बालाजीनगर येथील एक १२ वर्षांचा मुलगा थॅलिसिमिया आजाराने ग्रस्त आहे. त्याला ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज होती. त्यासाठी त्याचे आईवडील गुरुवारपासून (ता. १६) विविध रक्तपेढ्यांमध्ये फिरत होते. मात्र, त्यांना रक्त मिळत नव्हते. रविवारी त्यांनी पिंपरी येथील ‘सकाळ’ कार्यालय गाठले. ‘सकाळ’ प्रतिनिधीकडे त्यांनी रक्त मिळविण्यासाठी येणारी अडचण मांडली. त्यानंतर, संबंधित प्रतिनिधीने याबाबत दोन ते तीन रक्तपेढ्यांमध्ये संपर्क करून विचारणा केली. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीत संबंधित रक्तगटाचे रक्त असल्याची माहिती मिळाली. मुलाच्या आईवडिलांना तेथे पाठविल्यानंतर रक्त मिळाले. 

रक्तपेढीमध्ये सरासरी १५० ते ३०० रक्त पिशव्यांचा (होल ब्लड) साठा असतो. मात्र, आजच्या तारखेला १२५ पिशव्या उपलब्ध आहेत. निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त सहजासहजी मिळत नाही. पर्यायाने, हे रक्त मिळविण्यात अडचणी जाणवतात. त्या खालोखाल सध्या एबी पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताची मागणी जास्त असल्यास आम्ही अन्य रक्तपेढ्यांकडून मागणीनुसार रक्तपिशव्या मागवितो. भविष्यात काही रक्तपेढ्यांना आमच्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्तगटाच्या पिशव्या देऊन त्यांच्याकडून आवश्‍यक रक्तगटाच्या पिशव्या घेण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. यशवंत इंगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय

शहरात सध्या विविध रुग्णांकडून रक्ताची मागणी जास्त आहे. तुलनेत रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुख्यत्वे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. निगेटिव्ह रक्ताचा तर तुटवडा आहेच, त्या खालोखाल ‘ए’, ‘एबी’ आणि ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पिशव्याच उपलब्ध नाहीत. आमच्याकडे दररोज सरासरी १०० रक्त पिशव्या असायच्या. मात्र, सध्या फक्त ५० पिशव्या उपलब्ध आहेत. आम्हाला अन्य रक्तपेढ्यांकडून सहसा रक्त घेण्याची गरज लागत नाही.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पीएसआय रक्तपेढी, खराळवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com