‘फ्री-अप हिंजवडी’ मोहीम

सागर शिंगटे
शुक्रवार, 7 जुलै 2017

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आता ‘आयटीयन्स’सोबत उद्योजक, व्यावसायिक, रहिवासी यांनीच पुढाकार घेत ‘फ्री-अप हिंजवडी’ ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. त्यात अडीच हजार लोक जोडले गेले. त्यासाठी change.org हे संकेतस्थळही सुरू केले आहे. 

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आता ‘आयटीयन्स’सोबत उद्योजक, व्यावसायिक, रहिवासी यांनीच पुढाकार घेत ‘फ्री-अप हिंजवडी’ ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. त्यात अडीच हजार लोक जोडले गेले. त्यासाठी change.org हे संकेतस्थळही सुरू केले आहे. 

हिंजवडी परिसरात माहिती-तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि इतर उत्पादक कंपन्यांमध्ये सुमारे ७ ते १० लाख कर्मचारी आहेत. सकाळी सात ते दहा आणि दुपारी पाच ते साडेआठ या वेळेत येताना-जाताना कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे, ‘आयटीयन्स’, शाळा-महाविद्यालये, स्थानिक रहिवासी, उद्योजक-व्यावसायिक या सर्वांना सोबत घेऊन ‘फ्री-अप हिंजवडी’ मोहीम सुरू केली. या मोहिमेचे समन्वयक सुधीर देशमुख आणि करमचंद गर्ग म्हणाले, ‘‘हिंजवडीतील आयटी कंपन्यांकडे सुमारे तीन हजार बस आणि कर्मचाऱ्यांकडे एक लाख कार आहेत. इतर लोकांना ‘आयटी’पार्कमध्ये येण्याजाण्यासाठी वाकड जंक्‍शनपासून फेज १, फेज २ पर्यंत आणि भूमकर चौक ते फेज १, फेज २ पर्यंतचे दोन प्रमुख रस्ते आहेत. ते अपुरे पडतात. अवघे सव्वादोन किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी ४५ ते ५५ मिनिटांचा वेळ खर्च होतो. हे टाळण्यासाठी लहान, मध्यम आणि दीर्घकालीन सुधारणा होणे गरजेचे आहे. हिंजवडीमध्ये जाण्यायेण्याच्या पिरंगुट, नांदे-चांदे, माण-म्हाळुंगे मार्गे फेज-१ च्या मागील बाजूपर्यंत, वाकड, भूमकर चौक आणि मारुंजी या सहा मार्गांचा विस्तार आणि विकास करणे अत्यंत आवश्‍यक आहे.’’

फ्री-अप हिंजवडी’ मोहीम येत्या रविवारपर्यंत चालू राहणार आहे. लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना दिले जाणार आहे. इच्छुक व्यक्तींनी http://bit.ly/२st३८vl या लिंकवर भेट द्यावी. 
- सुधीर देशमुख, समन्वयक, फ्री-अप हिंजवडी

सुचविलेल्या सुधारणा
हिंजवडी मेट्रो वाकड जकात नाक्‍यामार्गे पुढे विशालनगर, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी-चाकणपर्यंत असावी
विप्रो-इन्फोसिस यासारख्या कंपन्यांच्या शिफ्टमध्ये बदल 
रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वाहतूक नियमांचे कठोर पालन
रस्ता रुंदीकरण, ग्रेडसेपरेटर, उड्डाण पूल, भुयारी मार्गाचा अवलंब