‘संस्कार’ची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

पोलिसांची माहिती, आतापर्यंत सहा कोटींच्या फसवणुकीची पोलिसांकडे नोंद

पिंपरी - दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपविरोधात दिघी पोलिस ठाण्यात तक्रारी वाढत असून, बुधवारी तब्बल एक कोटीच्या फसवणुकीची नोंद झाली. आतापर्यंत सुमारे सहा कोटी रुपयांच्या फसवणुकीची पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने लवकरच संस्कार ग्रुपची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

पोलिसांची माहिती, आतापर्यंत सहा कोटींच्या फसवणुकीची पोलिसांकडे नोंद

पिंपरी - दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपविरोधात दिघी पोलिस ठाण्यात तक्रारी वाढत असून, बुधवारी तब्बल एक कोटीच्या फसवणुकीची नोंद झाली. आतापर्यंत सुमारे सहा कोटी रुपयांच्या फसवणुकीची पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने लवकरच संस्कार ग्रुपची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

निवृत्तीनंतर मिळालेला पैसा, पोटाला चिमटा काढून जमवलेली रक्कम, एफएसआयमधून मिळालेला मोबदला अनेकांनी संस्कार ग्रुपमध्ये लावला. महिला बचत गटांनी, तीन वर्षांत दुप्पट मिळवण्याच्या खोट्या आमिषाला बळी पडून पैसा गुंतवला. मात्र, मुदत संपूनही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. याबाबत जानेवारीमध्ये संस्कार ग्रुपविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात संस्थापक वैकुंठ कुंभार, राणी कुंभार, कमल शेळके यांना सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळूनही पोलिसांनी त्यांना अटक केली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. पोलिस दप्तरी त्यांची फरार म्हणून नोंद आहे. मात्र, हे संशयित व्हॉट्‌सॲपवर सक्रिय आहेत. तसेच, बिनधास्तपणे फिरत आहेत.

तरीही पोलिसांना ते दिसत कसे नाहीत, असा सवाल गुंतवणूकदार करत आहेत. तसेच, अनेकजणांची मूळ कागदपत्रे ग्रुपने जमा करून घेतली आहेत. यातील संशयित आरोपी गुंतवणूकदारांना फोनवरून धमक्‍या देत असल्याचेही काही जणांनी सांगितले. 

गुंतवणूकदार म्हणतात 

माझे पती योगेश्‍वर उमाप यांना लष्करातून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले दहा लाख गुंतवले. तसेच, माझे नातेवाईक व ओळखीच्यांनीही तीन लाख गुंतवले; मात्र ते आजतागायत मिळाले नाहीत. 
- देविका उमाप

मी संस्कार ग्रुपमध्ये पाच लाख, तसेच सुरत येथील माझी नणंद यांनी माझ्या सांगण्यावरून वीस लाख मुदतठेव योजनेत गुंतवले. मुदत संपूनही पैसे परत मिळाले नाहीत. यामुळे आमचे नाते तुटले आहे.
- प्रतीक्षा पेठे

माझे पती लष्करामधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बचत केलेले बारा लाख रुपये संस्कार ग्रुपमध्ये गुंतवले. सध्या यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला न्याय मिळावा ही विनंती. 
- सुप्रिया सावंत 

टाटा मोटर्समधून राजीनामा दिल्यानंतर बिर्ला सन लाइफ व एचडीएफसी एसएलआयएलमध्ये गुंतवणूक केलेले पैसे, तसेच इतर काही असे ३७ लाख ५० हजार संस्कार ग्रुपमध्ये गुंतवले. पहिले सतरा महिने व्याज मिळाले, नंतर बंद झाले. तसेच, मूळ कागदपत्रेही जमा करून घेतली आहेत. 
- बाळासाहेब साळुंके

जमीन रस्त्यात गेल्याने महापालिकेच्या वतीने दिलेल्या मोबदल्यातील चार लाख गुंतवले. मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत होते, महिनाभर हेलपाटे मारूनही मिळाले नाहीत. शेवटी उधारीवर मुलीच्या पायाची शस्त्रक्रिया केली. 
- नाथ पठारे 

व्हॉटसॲप ग्रुपवर संपर्क; व्हिडिओ क्‍लिपद्वारे संदेश

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळून सहा महिने लोटले, मात्र ‘संस्कार’चे संचालक पोलिसांना अद्याप सापडत नाहीत, फरारी आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या एजंटामार्फत ते ठेवीदारांशी सतत संपर्कात आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र व्हॉटसॲप ग्रुप कार्यरत आहे, प्रसंगी व्हिडिओ क्‍लिपद्वारे संदेश दिला जातो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून ‘संस्कार’च्या वडमुखवाडी येथील कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प आहे. आता ठेवीदारांच्या संपर्कासाठी व्हॉटसॲप ग्रुप केला आहे. रोजच्या चर्चा, बैठका, निरोप देवाणघेवाण त्यावर चालते. ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी स्वतः वैकुंठ कुंभार यांची १८ मिनिटांची एक क्‍लिप सर्वांना नुकतीच पाठविण्यात आली आहे. त्यात संस्थेच्या आर्थिक अडचणीचे कारण देताना ‘तुमचे सर्व पैसे परत देणार, माझ्यावर विश्‍वास ठेवा’ असा संदेश आहे.

मुळशी शिवसेनेचा पदाधिकारीच एजंट?
दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करायला कोण आले?, माहितीसाठी फोन कोणी केला? या प्रत्येक हालचालींची माहिती ‘संस्कार’च्या सर्व संचालकांना तत्काळ मिळते. गुन्हा दाखल होऊच नये, यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. पैसे परत मागणाऱ्या गुंतवणूकदारांना शांत करण्यासाठी मुळशी तालुक्‍यातील शिवसेनेचा एक पदाधिकारीच एजंटची भूमिका बजावतो आहे. 

माजी अधीक्षकाचे लाखो रुपये
शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका पोलिस अधीक्षकांचे लाखो रुपये गुंतले आहेत. त्यांच्याशी संवाद असलेली एक व्हिडिओ क्‍लिप गुंतवणूकदारांना दाखविण्यात येते. त्यात ‘आळंदी येथे गृहप्रकल्प बांधून सर्वांचे पैसे परत देणार आहोत, त्याला तुमची संमती आहे का?’ अशी विचारणा करण्यात येते. पैसे परत मिळणार यावर त्यांचाही विश्‍वास आहे. आणि गृहप्रकल्पाला होकार असल्याचा संदेश त्यातून अन्य गुंतवणूकदारांना दिला जातो.