मेट्रो, लोकल अन्‌ बीआरटी

पिंपरी - पिंपरी ते कासारवाडीदरम्यान मेट्रोचे वेगात सुरू असलेले काम.
पिंपरी - पिंपरी ते कासारवाडीदरम्यान मेट्रोचे वेगात सुरू असलेले काम.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई रस्त्यावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे वेगाने सुरू झाले असून, तीन वर्षांत या रस्त्यावरून पुण्यात ये-जा करण्यासाठी नागरिकांना तीन सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहेत. बीआरटी बससेवा, लोकल रेल्वे आणि मेट्रो या वाहतूक सेवांमुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता येईल.

पिंपरी महापालिका भवनापासून शिवाजीनगरपर्यंत मेट्रो रेल्वेची दहा स्थानके आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वल्लभनगर येथे मेट्रो प्रकल्पाचा पहिला खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले. पिंपरी चौकापासून वल्लभनगरदरम्यान मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. येत्या सहा महिन्यांत ते काम पूर्ण होईल. त्याचवेळी वल्लभनगरपासून हॅरिस पुलादरम्यानच्या भागातील खांब उभारण्याच्या प्राथमिक कामाला सुरवात झालेली असेल. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीच्या कोंडीची समस्या भेडसावत असली, तरी खांब उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होईल.

महापालिकेने पुणे-मुंबई रस्त्यावरील रखडलेल्या बीआरटी मार्गाचे कामही पुन्हा हाती घेतले आहे. मेट्रो प्रकल्पातील खांबउभारणीचे काम पूर्ण होत असतानाच बीआरटी बससेवा सक्षमतेने सुरू होईल. लोकल रेल्वेसाठीही स्वतंत्र तिसरा लोहमार्ग टाकण्याचे नियोजन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यास लोकल गाड्यांच्याही फेऱ्या वाढतील. या तिन्ही पद्धतींच्या सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गाच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होईल. 

मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आजूबाजूच्या उपनगरांपासून मेट्रो स्थानकापर्यंत फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या भागातून या सेवेद्वारे अथवा पीएमपी बसगाड्यांतून मेट्रो स्थानकापर्यंत ये-जा करता येईल. त्यामुळे लोकांना दुचाकी अथवा चारचाकी वाहने वापरण्याला सार्वजनिक वाहतूक सेवेचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.  

मेट्रो रेल्वे वातानुकूलित सेवा असून, नागरिकांना कमी वेळेत, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणविरहित प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना पिंपरी महापालिकेपासून स्वारगेटपर्यंतच्या १६ किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ अर्ध्या तासात करता येईल. 

पॅरिस, लंडन, ॲमस्टरडॅम अशा सर्वच मोठ्या शहरांत विविध प्रकारची सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मार्गावर तीन वाहतूक सेवा उपलब्ध होत आहेत. प्रवासी सर्वांनाच मिळतील. थोड्या फार प्रमाणात जगातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये अशा पद्धतीच्या एकापेक्षा अधिक वाहतूक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होतात. त्या सेवा एकमेकांना पूरक ठरतात.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com