खडकी, बोपोडीत ‘कसोटी’

बोपोडी - सह्याद्री हॉस्पिटलजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला बोपोडी मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे.
बोपोडी - सह्याद्री हॉस्पिटलजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला बोपोडी मेट्रो स्थानक उभारण्यात येणार आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पुणे-मुंबई महामार्गावरून मेट्रो प्रकल्पाचे काम खडकी कॅंटोन्मेंट हद्दीत सुरू झाल्यानंतरचा काळ वाहनचालकांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. या हद्दीत बोपोडी आणि खडकी या दोन मेट्रो स्थानकांची कामे होणार आहेत. तसेच बोपोडी चौकात ग्रेड सेपरेटर करण्याचाही प्रस्ताव आहे. 

महापालिकेच्या हद्दीत खराळवाडीपासून दापोडीपर्यंत मेट्रो रेल्वेसाठी खांब उभारण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन लेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा रस्ता दहा लेनचा आहे. वाहतुकीसाठी आठ लेन उपलब्ध असतानाही मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. हॅरीस पूल ओलांडून पुण्याकडे जाताना खडकीत केवळ २२ मीटर रुंदीचा रस्ता असल्याने तेथे रोजच गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तेथे मेट्रो प्रकल्पासाठी खांब उभारण्याचे काम सुरू झाल्यानंतर तेथील वाहतुकीची कोंडी आणखी वाढणार आहे. 

दापोडी मेट्रो स्थानक हे ग्रेड सेपरेटरच्या दुभाजकावर आहे. तेथून पुण्याच्या दिशेने जाताना मुळा नदीवरील हॅरीस पुलाचे दोन भाग आहेत. त्या दोन पुलांच्या मधल्या रिकाम्या जागेत मेट्रोचे खांब उभारणार आहेत. ते काम लवकरच सुरू होत असून, येत्या उन्हाळ्यात ते काम पूर्ण करण्यात येणार आहे. पूल संपल्यानंतर मेट्रो रेल्वे रस्त्याच्या डाव्या बाजूला वळेल.

पिंपरीकडून पुण्याकडे जाताना सध्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मेट्रोचे खांब येतील. सह्याद्री हॉस्पिटलजवळ जुन्या जकात नाक्‍याच्या जागी बोपोडी मेट्रो स्थानक येईल. त्यापुढे जयहिंद टॉकीजपासून खडकी रेल्वेस्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाच्या समोरील जागेपर्यंत खडकी मेट्रो स्थानक असेल. 

हॅरीस पुलापासून खडकी रेल्वेस्थानकासमोरील रस्ता हा सध्या २२ मीटर रुंद असून, तो ४५ मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे आहे. रुंदीकरण झाल्यानंतर नवीन रस्त्याच्या दुभाजकावर मेट्रोचे खांब येतील. रुंदीकरण लवकर न झाल्यास त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होईल.

खडकी मेट्रो स्थानक हे रस्त्यापासून सुमारे २१ मीटर उंचीवर आहे. तेथून पुढे ऑल सेन्टस चर्चपासून मेट्रो मार्ग रेंजहिल्सकडे रस्त्याच्या उजव्या बाजूला वळेल. चर्चपासून खडकी पोलिस ठाण्याच्या मागील बाजूने तेथील बोगद्याजवळून मेट्रोचा पूल लोहमार्ग ओलांडेल. तेथे मेट्रो रेल्वेमार्गाची जमिनीपासूनची उंची वीस मीटरपेक्षाही अधिक असेल. त्यानंतर काही अंतरावर रेंजहिल्सचे मेट्रोचे स्थानक असेल. 

कृषी महाविद्यालयाने मेट्रो प्रकल्पासाठी दिलेल्या जागेत मेट्रो जमिनीवर येईल. रेंजहिल्स स्थानकापासून मेट्रो उन्नत मार्गावरून हळूहळू उताराने जमिनीकडे येईल. महाविद्यालयात मेट्रो प्रकल्पाची जागा १२०० मीटर आहे. त्यापैकी आठशे मीटर जागेत मेट्रो जमिनीवरून धावेल. राहिलेल्या चारशे मीटर जागेत ती कमी उताराने भुयारी मार्गात जाईल. तेथून भुयारी मेट्रो मार्ग सुरू होईल. शिवाजीनगर एसटी बसस्थानकापाशी मेट्रोचे पहिले भुयारी स्थानक असेल. तेथून प्रवाशांना एसटी, पीएमपी आणि लोकल रेल्वे या तिन्ही ठिकाणी जाता येईल. त्यानंतर शासकीय गोदामाजवळ मेट्रोचे तिन्ही मार्ग एकत्र येणार आहेत. तेथे प्रवाशांना मेट्रो बदलता येईल. पिंपरीपासून स्वारगेटकडे जाणाऱ्या मेट्रोला पुढे बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट येथे भुयारी स्थानके असतील.

खडकी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम पुणे महापालिकेने करायचे आहे. तेथे वाहतुकीच्या कोंडीमुळे अडचणी आल्यास मेट्रोच्या कामाला उशीर होऊ शकतो. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी कमीत कमी नऊ मीटर जागा लागणार आहे. मेट्रो प्रकल्पाला विलंब होऊ नये म्हणून सर्वच संस्था मदत करीत आहेत.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

पिंपरी हद्दीनंतरची स्थानके - सातवे स्थानक बोपोडी
दापोडी स्थानकापासून १६२२ मीटर अंतरावर पुण्याकडे जाताना सध्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला जुन्या जकातनाक्‍याच्या जागेवर सह्याद्री हॉस्पिटलजवळ जमिनीपासून १४.८ मीटर उंचीवर स्थानक असेल.

आठवे स्थानक - खडकी
जयहिंद टॉकीजची हद्द संपल्यानंतर खडकी रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या पादचारी पुलापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला जमिनीपासून २०.१ मीटर उंचीवर मेट्रोचे स्थानक असेल. बोपोडी स्थानकापासून खडकी स्थानकादरम्यानचे अंतर ८६७ मीटर.

नववे स्थानक - रेंज हिल्स
खडकी स्थानकापासून हे स्थानक १४०७ मीटरवर जमिनीपासून १४.४ मीटर उंचीवर असेल. रेंजहिल्स येथील झोपडपट्टी संपते तेथे हे स्थानक असेल.

दहावे स्थानक - शिवाजीनगर 
पहिले भुयारी स्थानक शिवाजीनगर एसटी आगार आणि बस स्थानक यांच्यामध्ये मेट्रोचे स्थानक जमिनीखाली सुमारे साडेबारा मीटर असेल. भुयारी स्थानकातून वर येण्यासाठी सरकते जिने असणार.

पिंपरी चिंचवड पालिका ते स्वारगेट मेट्रो मार्ग
मेट्रो रेल्वे सुरू होण्याचे वर्ष    २०२०-२१
या मार्गावरील मेट्रो गाड्या    १९ ते २२
प्रत्येक गाडीच्या कोचची (डबा) संख्या    ४
एका गाडीतील प्रवासी क्षमता    १०३४
रोजचे अंदाजे प्रवासी    चार लाख
स्थानके    १४
मेट्रो रेल्वेचा वेग    ताशी ३३ किलोमीटर
फेऱ्या    दर चार मिनिटांनी
मार्गाची लांबी    १६.५ किलोमीटर
उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग    ११.५ किलोमीटर
भुयारी मार्ग    ५ किलोमीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com