पिंपरी- वाकडमध्ये उन्नाव व कठुवामधील बलात्काराच्या निषेधार्थ आंदोलन 

रवींद्र जगधने 
रविवार, 15 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे)- उत्तरप्रदेशातील उन्नाव, जम्मू काश्‍मीर मधील कठुवा व गुजरात मधील सुरत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात 'अपना वतन' संघटनेसह इतर संघटनांनी रविवारी (ता. 15) वाकड चौकात निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच वाकड चौक ते वाकड पोलिस स्टेशनवर मार्च काढण्यात आला. 

पिंपरी (पुणे)- उत्तरप्रदेशातील उन्नाव, जम्मू काश्‍मीर मधील कठुवा व गुजरात मधील सुरत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात 'अपना वतन' संघटनेसह इतर संघटनांनी रविवारी (ता. 15) वाकड चौकात निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच वाकड चौक ते वाकड पोलिस स्टेशनवर मार्च काढण्यात आला. 

'अपना वतन' संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे, शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, परिवर्तनवादी संघटनेचे इम्रान शेख, जमत उलेमाये हिंदचे हाजी गुलजार शेख, शेतकरी कामगार पक्षाचे नाना फुगे, अखिल भारतीय छावा संघटनेचे धनाजी येलकर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, शिव व्यापारी सेनेचे युवराज दाखले, योद्धा फाउंडेशनचे साकी गायकवाड, नितीन पाटेकर, मुजफर इनामदार, गणेश हिंगडे, विशाल वाघमारे, मसूद शेख, आकाश कांबळे, संदीप पिसाळ, संतोष शिंदे, पूजा सराफ, संगीत शहा, बेटींना दास यांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

उत्तरप्रदेशातील उन्नाव, जम्मू काश्‍मीर मधील कठुवा व गुजरात मधील सुरत या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरला आहे. स्त्रीला सन्मान व मातेचा दर्जा दिल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृतीला या अशा घटनांमुळे व काही नराधमांच्या अघोरी, निर्दयी कृत्यांमुळे गालबोट लागले आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी अशा सत्ताधारी पक्षाचे काही नेते अशा घृणास्पद घटनांचे समर्थन करीत आहेत. असे मत सिद्दीक शेख यांनी व्यक्त केले. "बलात्कार्यांना फाशी झालीच पाहिजे, जनता की है ललकारी, बंद करो ये अत्याचार, शर्म करो शर्म करो, मोदी सरकार शर्म करो'' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळेस घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

निदर्शनानंतर वाकड चौक ते वाकडरोड मार्गे वाकड पोलिस स्टेशनवर मार्च काढण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये सर्व घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व अशा सामूहिक बलात्काराच्या घटनांसंदर्भात कडक कायदा अमलात आणावा अशा मागण्यांचे निवेदन पोलिसांमार्फत राष्ट्रपती, जम्मू काश्‍मीर, गुजरात, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल यांना पाठविण्यात आले . 

Web Title: protest against unnao and kathua rape cases in wakad pune