बालदिन विशेष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

बालदिनाच्या पूर्वसंध्येला विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयात हजेरी लावली आणि अतिथी संपादक म्हणून काम करीत आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त केल्या. या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने विविध विषयांवर चर्चा केली, विषय निवडले व त्यावरील आपले विचार कागदावर उतरवले. या मजकुरासाठीची पूरक चित्रे स्वतःच काढत उत्साहात आणि अत्यंत कमी वेळेत कसलेल्या पत्रकारांच्या सफाईने काम पूर्ण केले! ‘सकाळ’च्या वाचकांसाठी खास ‘बालदिना’निमित्त मुलांनीच तयार केलेले हे विशेष ...

माझ्या स्वप्नातील भारत
प्रत्येकाचे आपल्या देशाबद्दल एक स्वप्न आहे. माझा देश कसा असावा, तेथील नागरिकांची वागणूक कशी असावी, राजकारणी कसे असावेत आणि एकुणात देशाची जगभरात काय प्रतिमा असावी, याबद्दल हे मत हळूहळू तयार होत जाते. माझ्या स्वप्नातील भारतही असाच नावीन्यपूर्ण असेल. या भारतामध्ये स्पर्धेला मोठे महत्त्व असेल व त्याच्या जोडीला देशातील प्रत्येक नागरिक डिजिटल माध्यमांचा संपूर्ण वापर करीत असेल. माझा देश स्वच्छ असावा, अशी माझी मनोमन इच्छा आहे. सध्या सुरू असलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा देश स्वच्छ होण्यात सिंहाचा वाटा असणार आहे.

माझ्या देशातील स्त्रियांना सन्मान मिळावा, समानतेची वागणूक मिळावी. स्त्रियांकडे पाहण्याची सर्वांची दृष्टी बदलावी व देशाच्या प्रगतीत त्यांच्या हुशारीचा पुरेपूर वापर व्हावा. देशातील अपंग व्यक्तींनाही सन्मान व स्पर्धेत पुढे येण्याची संधी मिळायलाच हवी. त्यांना नोकरीतील संधी व इतर अधिकारांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. सुशिक्षित भावी पिढी देशाच्या प्रगतीतील सर्वांत मोठा घटक असेल. त्या दृष्टीने प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या पूर्ण क्षमतांचा उपयोग करून शिक्षण घ्यावे व देशाच्या प्रगतीमध्ये आपल्या ज्ञानातून हातभार लावावा. आपले शिक्षण पूर्ण करतानाच शिक्षणापासून वंचित राहात असलेल्या घटकांनाही शिक्षण मिळावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. असे असले तरी, माझ्या स्वप्नातील भारत मला ‘परीक्षांपासून मुक्त’ असाच हवा आहे. याचे कारण आज विद्यार्थी ‘गुणार्थी’ होत आहे. त्याऐवजी प्रत्येकाने ‘ज्ञान’ प्राप्त करावे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम व अधिकाधिक संशोधन करून देश समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.

माझ्या भारताला निर्सगाने भरभरून दिले आहे. मात्र, माणूस भौतिक प्रगती साधताना निसर्गाला विसरतो आहे, त्याच्यावर अन्याय करीत आहे. देशातील नैसर्गिक विविधता, पाण्याचे सर्व स्रोत, खनिजे, अभयारण्ये आदींची जोपासना व वाढ करणे हे आपलेच कर्तव्य आहे व त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. मित्रांनो, आपला देश ‘स्मार्ट’ होतो आहे. मात्र, देशातील ‘आर्ट’ ऊर्फ कला जोपासल्या जाव्यात याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. 

हा देश माझा, प्रिय भारत देश माझा
प्रगतिपथावर नेऊ, स्वप्नातील देशास माझ्या...

क्‍लास...बळजबरी नको आवड हवी!
मित्र-मैत्रिणींनो, संपूर्ण दिवसात तुम्हाला किती वेळ रिकामा मिळतो? दिवसातील सर्वाधिक वेळ कशाला देतो? करा विचार...हो बरोबर...दिवसभरातील आपला सर्वाधिक वेळ क्‍लासलाच जातो. असंही म्हणता येईल, आपलं सगळं शालेय जीवन जणू ‘क्‍लासमय’च झालं आहे. सकाळी सात वाजता अभ्यासाचा क्‍लास, ९ ते ५ शाळा, शाळेतून घरी जात नाही, तर संगणक, ड्रॉइंगचे क्‍लास डोळे वटारूनच बघत असतात. ६ वाजता संस्कृतचा, सात वाजता कथक किंवा तबला क्‍लास. दमून-भागून ९ वाजता घरी आल्यावर शाळेचा होमवर्क वाटच पाहत असतो. क्‍लास आमच्यासाठी आहे, का आम्ही क्‍लाससाठी आहोत, याचाच कधीतरी प्रश्‍न पडतो. क्‍लासमुळे जाम कंटाळा येतो. क्‍लासच्या या कटकटीपासून निदान दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तरी सुटका होईल, अशी अपेक्षा असते, परंतु तीसुद्धा फोल जाते. दोन्ही सुट्यांत वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून आपल्याला बांधून ठेवलेले असते. शाळेचा अभ्यास आणि त्याच्या दुपटीने क्‍लासचा अभ्यास यामुळे अक्षरक्ष: वैताग आला आहे. आम्हाला नेहमी प्रश्‍न पडतो, एवढ्या क्‍लास, ट्यूशनची आवश्‍यकता आहे का? आपण वेगवेगळ्या क्‍लासला जातो, ते आपल्या शिक्षणासाठी की पालकांच्या आनंदासाठी? पूर्वी शिक्षणाची गुरुकुल पद्धत होती. क्‍लासेसचा चक्रव्यूह पाहता, पुन्हा गुरुकुल पद्धत यावी असेच मनापासून वाटते. एकाच गुरूकडून सर्व प्रकारच्या कला, अभ्यास शिकणे. ही पद्धत किती सोपी आणि सुटसुटीत आहे. नाहीतर आताची आमची तारेवरची कसरत. या क्‍लासेसच्या माध्यमातून आपल्या सुप्तगुणांना वाव मिळतो का? आपल्याला खरा आनंद मिळतो का? हे आपणही शोधत नाही आणि आपले पालकही. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. आपली आवड आणि बळजबरी यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. आपण आजच्या बालदिनापासूनच आपल्याला आवडेल ते करायचा संकल्प करू यात.

परिसर ठेवू स्वच्छ आणि शांत
माझा परिसर हा माझ्या परिवारासारखाच आहे. एखादे पालक आपल्या मुलाला जेवढे जपतात, तेवढाच माझा परिसर मला जपतो. आपण म्हणतो की सामाजिक वातावरण एका माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करतं. आपल्या जडणघडणीत आजूबाजूच्या परिस्थितीचा, घटकांचा मोठा वाटा असतो. माझ्यात जे जे चांगले गुण आहेत ते मला माझ्या परिसराने दिले आहेत. 

पण मला खूप वाईट वाटतं की, जिथे एवढी चांगली व सुशिक्षित माणसं आहेत, त्याच परिसरात रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग कसे काय साठतात? अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की , A child’s brain is the esiest thing to mold’. म्हणूनच लहानपणापासून आपण स्वच्छता हा गुण अंगिकृत केला पाहिजे, म्हणूनच मित्रांनो आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. कारण, जेव्हा परिसर स्वच्छ होईल तेव्हा भारताला स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. 

आणखी एक गोष्ट जी खटकते आणि जी कदाचित सगळ्यांनाच खटकत असेल ती म्हणजे रात्री बारापर्यंत चालणारे डॉल्बी. हल्ली मुलांना दांडिया आणि गणपतीच्या मिरवणुकीला डीजेवर नाचण्याशिवाय काही सुचतच नाही. त्यामुळे उत्सवांचे उत्साही रूप हरवत चालले आहे. आमच्या परीक्षांच्या काळातच मोठमोठ्याने गाणी सुरू असतात. घरातील आजीआजोबा, आजारी व्यक्ती, परिसरातील हॉस्पिटल याचा विचार आपण कधी करणार? तर मग मित्रांनो, बालदिनाच्या निमित्तानं आपण हे चित्र बदलण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया. एक स्वच्छ व सशक्त भारताचे उद्याचे नागरिक म्हणून वचन घेऊ की आपण रस्त्यात कुठेही कचरा फेकणार नाही, इतरांनाही फेकू देणार नाही, उत्सवांच्या काळात कमी आवाजात किंवा बंदिस्त जागेत कार्यक्रम घेऊ, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही. आपल्या परीने आपल्या परिसराचा सर्वार्थांने विकास करू. 

मीच माझ्या मनाचा राजा...!
नुकताच दहावीचा निकाल लागला आहे. निकालाबाबत दोन मित्रांमध्ये कमालीची उत्सुकता होती. निकालानंतर चिंटू आणि पिंटू यांच्यातील करिअर कोणते निवडायचे यावर झालेला हा संवाद...
चिंटू : काय रे पिंटू, काय दिवे लावले आहेत परीक्षेत?
पिंटू : अरे, ९५ टक्के पडले आहेत, तुला किती टक्के पडले?
चिंटू : मलाही तितकेच पडले आहेत. तू काय सायन्स घेणार आहेस का?
पिंटू : नाही रे, तुला सांगतो मला फॅशन डिझायनिंग करायचे आहे.
चिंटू : मग एवढा उदास का दिसतोस?
पिंटू : अरे, आई-बाबा म्हणतात की, आर्टसमध्ये काय करिअर करणार आहेस? त्यापेक्षा ९५ टक्के मार्क मिळाले आहेत, सायन्समध्येच करिअर कर. अरे, तुझे काय? 
चिंटू : मला कळतंच नाहीये! मी गोंधळून गेलो आहे. 
पिंटू : तुला ज्या क्षेत्रात आवड आहे, तेच कर व जे करशील ते मनापासून कर.
चिंटू : इंजिनिअर, डॉक्‍टर, सी. ए. कित्ती क्षेत्र आहेत. मी ना, माझ्या आई-बाबांशी बोलणार आहे. त्यांचं मत घेणार आहे आणि मग ठरविणार आहे. आपल्याला आवडत्या क्षेत्रात गेल्यावर खरंच करिअर छान होते.  
पिंटू : छान..! मी पण माझ्या आई-बाबांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की, ‘मला सायन्समध्ये गोडी नाही. तू म्हणतोस ते खरं आहे. आपल्याला शाळेत आवडत नसलेला विषय जसा आपण बाजूला ठेवतो, तसे होईल, अशी मला भीती आहे. तसेच अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनीही आपल्या आवडत्या क्षेत्रातच करिअर केले ना..! अशी अनेक नावे सांगता येतील.
चल भेटू.. बाय! लगेच जाऊन आई-बाबांशी बोलतो.
चिंटू : चल...बाय...!

पत्रांची वाट पाहण्यातील गंमत पुन्हा यावी!
संवाद माध्यमांचे स्वरूप एकविसाव्या शतकात वेगाने बदलत गेले आहे. देशात मोबाईल फोनचा प्रवेश झाल्यानंतर ही परिस्थिती अधिकच वेगाने बदलत गेली आहे. लोक आज मोबाईल फोनवरील विविध ॲप्लिकेशन्स, इंटरनेट, ई-मेल यांच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतात. हे सर्व अपरिहार्य असले, तरी कागद आणि पेनाचा उपयोग करून पत्र लिहिण्यातील गंमत आपण हरवून बसलो आहोत. आपल्या मित्रांना, नातेवाइकांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराची वाट पाहण्यात असलेली गंमत व्हॉट्‌सॲप मेसेजच्या उत्तराची वाट पाहण्यात नक्कीच नाही! काही सेकंदामध्ये आलेल्या उत्तरामध्ये पत्राच्या उत्तराची वाट पाहण्यातील उत्सुकतेची गंमत नाहीच. 
पेन, कागद आणि त्यावर सुवाच्च अक्षरामध्ये मांडलेले आपले विचार यांना पूर्वी मोठे महत्त्व होते. लिहिलेले पत्र समोरच्या व्यक्तिमत्त्वाची ओळखही करून द्यायचे. मित्राचे, आईने मोठ्या प्रयत्नांनी लिहिलेले पत्र कायमची आठवण म्हणून जपून ठेवल्याचे मागील पिढीतील लोक सांगतात. आज मात्र शेकड्यांनी मेसेजेस येतात, भावना व्यक्त होतात आणि क्‍लिकवर त्या फोनबरोबर मनातूनही कायमच्या ‘डिलीट’ होतात. यातून मैत्रीचे, नात्यांचे बंध घट्ट होण्यात अडचणी निर्माण होतात, नाती तुटतात. ही परिस्थिती टाळायची असल्यास प्रत्येकाने वाढदिवस, सण-समारंभ अशा प्रसंगी आपल्या मित्रांना, सहृदांना छोटे का होईना, पत्र लिहिलेच पाहिजे. सुख-दुःखांची देवाण-घेवाण झालीच पाहिजे. मशिनवर तयार झालेला ‘हॅपी बर्थडे’सारखा मेकॅनिकल संदेश आणि प्रेमाने पत्र लिहून दिलेल्या भरभरून शुभेच्छा यात खूप मोठे अंतर आहे...
देशाची सध्याची पिढी खूपच टेक्‍नोसॅव्ही आहे आणि ती काळाची गरजही आहे. मात्र, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, इन्स्टाग्राम आदींवरील संदेश तुमच्यातील मैत्रीचे, नात्यांचे बंध अधिक दृढ करू शकतीलच, असे नाही. त्यासाठी कागदावर स्वतःच्या अक्षरात व्यक्त केलेल्या वैयक्तिक भावना तुमच्या अधिक उपयोग पडतील... पाहा, विचार करा...मित्रांनो, पत्राची वाट पाहण्यातील गंमत पुन्हा अनुभवण्याचा निर्णय केवळ तुमच्याच हातात आहे...