पोलिसांकडून सौजन्याची ऐसीतैशी

पोलिसांकडून सौजन्याची ऐसीतैशी

‘नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे’, असा एक सुविचार पोलिस आयुक्‍तालयात नुकताच वाचनात आला. मात्र प्रत्यक्षात काही पोलिस ठाण्यात आणि चौकीत जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाईट अनुभव येत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढतच आहेत. ‘स्मार्ट पोलिसिंग’चा नारा देताना पोलिसांनीही आता नागरिकांसोबत अरे-तुरेची भाषा, दमदाटी आणि हेकेखोरपणा सोडून देण्याची गरज आहे. 

स्वत: पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला समाजात पोलिस दलाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे इतरांनीही पोलिस दलाची प्रतिमा मलिन होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज 
आहे.

पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये साहेब आहेत का, असे वाकून एक व्यक्‍ती बघत होती. तेवढ्यात त्या व्यक्‍तीला ठाणे अंमलदाराकडून ‘ए काय रे, काय काम आहे. चल हो तिकडं’ असे वाक्‍य कानी पडले अन्‌ त्या अनपेक्षित वाक्‍यानं ती व्यक्‍ती चपापलीच. नागरिक आपली तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात-चौकीत जात असतात. पती-पत्नीच्या भांडणाचे एक प्रकरण होते.

पत्नीने पतीविरुद्ध ठाण्याच्या न्यायालयात दावा ठोकला आहे. पत्नी आणि तिच्या भावाने पतीच्या पॅन कार्डची माहिती चोरून परस्पर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावरून पतीला वेतन किती मिळते, याची माहिती काढली. याबाबत पतीनेही वारजे पोलिस ठाण्यात सायबर क्राइम केल्याची पत्नीविरुद्ध तक्रार दिली. गेले काही दिवस पती आणि त्यांचे वडील हे वारजे पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. पण त्यांना पोलिस दाद देत नाहीत. अपमानास्पद वागणूक देत आहेत. आरोपीला अटक करायची असेल, तर ठाणे येथे जाण्यासाठी गाडी उपलब्ध करून द्यावी लागेल, असे सांगितले. त्यावर तक्रारदार पतीकडून गाडीसाठी पैसे घेतले. परंतु काही कारवाई 
न करता पोलिस हात हलवत परतले. 

अजूनही बाप-लेकाच्या पोलिस ठाण्याच्या चकरा सुरूच आहेत. समर्थ पोलिस ठाण्यातील बीट मार्शलने एका व्यक्‍तीला पोलिस ठाण्यात मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पोलिस कर्मचाऱ्याला काय शिक्षा झाली, ही बाब वरिष्ठांकडून लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे तर, ही घटना घडल्यानंतर याच पोलिस ठाण्यातील दुसऱ्या बीट मार्शलने एका शाळेजवळ काही पालकांना दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एखाद्या व्यक्‍तीला चौकशीच्या नावाखाली पोलिस चौकीत किंवा ठाण्यात दिवसभर बसवून ठेवले जाते. शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचेही प्रकार घडत आहेत. सांगवी पोलिस ठाण्यातही असाच प्रकार सुरू आहे. एखाद्या व्यक्‍तीने गुन्हा केला की नाही, ही बाब न्यायालयात सिद्ध होईल. परंतु दररोज पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात आहे. 

हा प्रकार वरिष्ठांना कळविण्यात आला. पण पुढे काय झाले, हे अद्याप समजले नाही. कायदेशीर कर्तव्यात बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तन करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com