‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

‘सकाळ’च्या उपक्रमांची घेतली माहिती
‘सकाळ’ने इस्राईलमधील विविध संस्थांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती अभिजित पवार यांनी राजदूत कारमॉन यांना दिली. पत्रकारितेसोबतच कौशल्यविकास आणि शिक्षण, कम्युनिटी ट्रान्सफॉर्मेशन, शेतीविकास, शहरविकास, महिलांचे सबलीकरण अशा विविध क्षेत्रांत आणि विविध समाजघटकांसाठी ‘सकाळ’तर्फे सुरू असलेल्या उपक्रमांविषयी ऐकताना राजदूत भारावून गेले होते. त्यांनी उत्सुकतेने या उपक्रमांची माहिती करून घेतली. यातील अनेक उपक्रम हे इस्राईलच्या सोबतीने घडत असल्याचे माहीत झाल्यावर त्यांना अधिक आनंद झाला.

पुणे - ‘‘सरकारी पातळीवर दोन देशांतील संबंधांसाठी, विकासासाठी विविध पातळींवर पावले उचलली जात असतातच. मात्र, समाजबदलासाठी एखाद्या संस्थेने, संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे त्यातून दोन देशांमध्ये काही सकारात्मक घडू पाहत असेल, तर ते महत्त्वाचे आणि उल्लेखनीय पाऊल म्हणायला हवे. ‘सकाळ माध्यम समूह’ म्हणजे असेच एक रचनात्मक आणि सकारात्मक पाऊल पुढे टाकणारी संस्था असून, अशी पावले मोठ्या संख्येने उचलली जायला हवीत. त्याचा उपयोग भारत आणि इस्राईल या उभय देशांतील नागरी व औद्योगिक विकासाला पुढे नेण्यासाठी होऊ शकेल,’’ असे गौरवोद्‌गार इस्राईलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमॉन यांनी काढले.

भारत-इस्राईल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुणे भेटीस आलेल्या कारमॉन यांनी इस्राईलचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड अकोव, राजकीय सल्लागार अद्वा विलचिनस्की, इस्राईलच्या मुंबई येथील वाणिज्य कार्यालयातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर, यांच्यासह शुक्रवारी ‘सकाळ’च्या कार्यालयास खास भेट दिली. ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘डीसीएफ’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांनी कारमॉन यांचे स्वागत केले, तसेच इस्राईलमधील विविध संस्थांच्या सहकार्याने ‘सकाळ’ समूहाने हाती घेतलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. ‘सकाळ’च्या ‘डीसीएफ’ ॲडव्हायजरीचे संचालक बॉबी निंबाळकर आदी या वेळी उपस्थित होते.

कारमॉन म्हणाले, ‘‘सकाळ’चे कार्य अतिशय मोलाचे आणि अभ्यासपूर्ण आहे. सरकारी उपक्रमांच्या समांतर संस्थात्मक पातळीवर असे काही करणे हे नक्कीच दिशादर्शक आहे. भारत-इस्राईल यांच्यात १९९२ पासून सुरू झालेले राजनैतिक नातेसंबंध आज प्रदीर्घ पल्ला गाठून एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचले आहेत. दोन्ही देशांची भू-राजकीय आव्हाने जवळपास सारखीच आहेत. गेल्या काही वर्षांत शेतीसोबतच व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता, स्टार्टअप आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही भारत-इस्राईल नातेसंबंध मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होत आहेत. ‘मेड फॉर इच ऑदर’ अशी भारत आणि इस्राईलची संयुक्त ओळख अशीच अधिकाधिक सौहार्दाने पुढे जात राहील यात शंका नाही.’’

‘लुक ईस्ट’ धोरणात भारताला प्राधान्य
कारमॉन म्हणाले, ‘‘परस्परांविषयीचा विश्‍वास, मैत्री आणि अनेक वर्षांचा अनुभव हा भारत-इस्राईल नात्याचा भक्कम पाया आहे. इस्राईलच्या ‘लुक ईस्ट’ धोरणांतर्गत भारत हा निःशंकपणे प्राधान्याचे स्थान असणारा देश आहे. भारत सरकारच्या मदतीने कृषी व्यवस्थापनात इस्राईल परिवर्तनशील क्रांती घडवू इच्छित आहे. ज्यासाठी संपूर्ण भारतात ‘एक्‍सलन्स सेंटर’ची उभारणी करण्याचा आमचा मानस असून महाराष्ट्र, गुजरात, हरियाना या राज्यांत ही सुमारे १५ सेंटर कार्यरतदेखील होत आहेत. येत्या काळात सरकारसोबत खासगी क्षेत्राने कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान निर्मिती व संशोधन अशा क्षेत्रांत योगदान दिल्यास त्यातून विकास अधिक गतिशील होईल.’’