डॉक्टरांमुळे यमराजाच्या तावडीतून सायलीची मुक्तत्ता

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पवार यांनी तपासणी केली असता सायलीची प्रकृती चिंताजनक झाली होती. तिचा श्वास जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होता. तिला प्रथम कृत्रिम श्वास देण्याची व्यवस्था केली. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख, डॉ. आशिष पोखरकर, डॉ. मनीष मोरे, डॉ. संजय भवारी, डॉ. संदीप पाटील, यांचीही मदत डॉ. पवार यांना उपचारासाठी मिळाली. हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास मदत झाली.

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला. मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला रात्री सात वाजता दाखल केले. त्यावेळी तिच्या हृदयाची हालचाल व श्वासही मंदावला होता. नातेवाईकहि चिंतेत होते. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी तिला कृत्रिम श्वास देवून औषधोपचार सुरु केले. सहा डॉक्टरांच्या पथकाने प्रयात्नानाची पराकाष्ट केली. त्यात त्यांना यश आले. रात्री दहा वाजता सायलीची हालचाल सुरु झाल्याचे पाहून डॉक्टर व नातेवाईकानी सुटकेचा निश्वास सोडला. 

उजव्या पायाला काहीतरी चावल्याचे सायलीने आई शोभा निलेश शिंदे यांना सांगितले.  शोभा यांनी नातेवाईकांच्या मदतीने घरात शोधाशोध केली. त्यावेळी तेथे साप असल्याचे पाहून सर्वांची बोबडीच वळाली. शोभा यांच्या अंगाचा थरकाप झाला. अशाही आवस्थेत सायलीला वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर घोडेगाव ग्रामीण रुगणालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. पण तिची प्रकृती खालावत चालल्याचे पाहून तिला मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पवार यांनी तपासणी केली असता सायलीची प्रकृती चिंताजनक झाली होती. तिचा श्वास जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होता. तिला प्रथम कृत्रिम श्वास देण्याची व्यवस्था केली. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सीमा देशमुख, डॉ. आशिष पोखरकर, डॉ. मनीष मोरे, डॉ. संजय भवारी, डॉ. संदीप पाटील, यांचीही मदत डॉ. पवार यांना उपचारासाठी मिळाली. हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास मदत झाली. रात्री साडे नऊ वाजता कृत्रिम श्वास यंत्रणा बाजूला केली. सायली स्वतःच श्वास घेऊ लागली. औषधांना तिच्या कडून चांगला प्रतिसाद मिळाला. डोळे उघडल्यानंतर तिने जवळच उभ्या असलेल्या आईला हाक मारल्या नंतर डॉक्टर व नातेवाईकांचा आनंद द्विगणित झाला. ''यमराजाच्या तावडीतून सायलीची मुक्तात्ता करण्याचे काम डॉक्टरांमुळे झाले. डॉक्टरांना देवाने बळ दिले. त्यामुळेच सायलीचा पुर्नजन्म झाला आहे. डॉक्टरांचे प्रयत्न व ऋण मी कधीही विसरणार नाही.'' असे शोभा शिंदे यांनी सांगितले.