नायलॉनचा मांजा कर्दनकाळ

Kite
Kite

पुणे - काचेचा थर असलेला नायलॉन मांजा, तंगुस आणि गट्टू मांजा अशा नावाखाली शहर व उपनगरांत साध्या मांजापेक्षा महाग मांजा सर्रास विकला जात आहे. पतंग कापण्याच्या शर्यतीमध्ये हा नायलॉन मांजा सर्वसामान्य नागरिकांसह पक्ष्यांचे गळे कापून जिवाला धोका निर्माण करत आहे. अनेकांच्या आयुष्यात हा मांजा कर्दनकाळ ठरत आहे.

मकरसंक्रांतीला आनंदोत्सव म्हणून पतंग उडविण्याची प्रथा आहे. सध्या राज्यभरात विविध शहरांमध्ये पतंग महोत्सवदेखील आयोजित केले जात आहेत. स्मार्टफोन आणि गेमिंग पार्लरच्या संस्कृतीमुळे पतंग उडविण्याचा खेळ काही सणांपुरताच उरला असला, तरी कृत्रिम मांजांचा सर्रास वापर होत असल्याने मरण स्वस्त होत आहे. राष्ट्रीय हरित न्यायप्राधिकरणाने (एनजीटी) कृत्रिम मांजा, नायलॉन दोरे, तंगुस दोरे यांच्या उत्पादन, विक्री, साठा, खरेदी आणि वापरावर पूर्णतः बंदी घातली आहे. पतंगासाठी नायलॉन व तत्सम अविघटनशील घटकांपासून बनविलेला, काचेचे लेपन असलेला मांजा वापरला जात असल्यामुळे पशुपक्षी व मानवी जीवनाला धोका निर्माण झाल्याचे गेल्या पाच ते सहा वर्षांतील अपघातांच्या आणि बळींच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.

निर्मिती, विक्री आणि वापरही बेकायदा
देशाच्या विविध राज्यांमध्ये पतंग उडविण्याची परंपरा आहे; पण पशुपक्ष्यांसह मानवाला धोका निर्माण झाल्यामुळे ‘एनजीटी’ने बंदीचा आदेश दिला; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नसल्याने अपघात आणि बळींची संख्या वाढत आहे. याची दखल घेऊन नायलॉन मांजासह पतंग उडविण्यावरच बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. बंदी असूनही बेकायदा मांजा निमिर्ती, साठा, विक्री, खरेदी आणि वापरणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

साध्या खळीमध्ये बनविलेल्या मांजामुळे शरीराला इजा होत नाही; परंतु चिनी मांजाच्या नावाखाली काचेचे लेपन लावून नायलॉन मांजा ४०० ते ५०० रुपयांत विकला जात आहे. पतंग कापण्याच्या झिंगेपायी बंदी असूनही नायलॉन मांजाची खरेदी सुरू आहे. निर्मिती आणि विक्री सर्रास सुरू असून, संबंधित दुकानांवर अचानक छापा टाकून माल जप्त केला पाहिजे.
- रफिक शेख (दुकान व्यावसायिक) (नाव बदलेले आहे)

संक्रांतीच्या सणाला पतंग उडविणे परंपरा मानली जाते. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्या तरी पतंग उडविणे बंद करणे हा उपाय नाही. त्याऐवजी घातक, नायलॉन मांजावर बंदी घालून साधा मांजा वापरावा.
- संजय सोमाणी, नागरिक

संक्रांतीला लहान मुलांसह मोठ्यांचीही पतंग उडविण्याची हौस पूर्ण होते; परंतु काचेचा थर असलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांनाच नव्हे, तर प्राणी व पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेऊन हा खेळ खेळला जावा.
- मुकुंद कुलकर्णी, नोकरदार

मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची मजा घेणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते. या प्रथेवर बंदी घालण्याऐवजी काचेचा थर लावलेल्या मांजावर बंदी घालावी. पतंग उडविण्याच्या स्पर्धांमध्ये काचेचा थर लावलेला मांजा वापरला नाही, तर जिंकणे अवघड असते. त्यामुळे काही अटी-शर्तींवर मांजा वापरण्यास परवानगी द्यावी.
- प्रथमेश जाजू, विद्यार्थी

गळ्याभोवती मांजा अडकून गळा कापल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो आणि मेंदू व हृदयाला होणारा रक्तपुरवठाही बंद पडतो. त्यामुळे तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणे हा पहिला उपाय आहे. शस्त्रक्रियेनंतर मेंदूची आणि हृदयाची कार्यक्षमता पाहून त्यानंतर पेशंटची स्थिती निश्‍चित करता येते. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी वाहने चालविताना हेल्मेट, स्कार्फ यांचा वापर केला पाहिजे.
- डॉ. जयसिंग शिंदे, मुख्य शल्यचिकित्सक व संचालक, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, पुणे

पतंग उडविण्याच्या नादामध्ये लहानांसह मोठेदेखील गुंतून जातात. साधा मांजा वापरून पतंग उडविण्याच्या स्पर्धा खुल्या मैदानात भरविल्या जाव्यात किंवा त्यावर बंदी आणावी. पतंग कापण्याच्या खेळामुळे मुलांमध्ये खुनशीपणा वाढतो. सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह परंपरादेखील जपावी.
- आशा सोनी, गृहिणी.

चिनी मांजामुळे घुबड, घारी आणि पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. साध्या आणि कृत्रिम मांजामुळेदेखील जखमा होतात. ‘एनजीटी’च्या दिल्ली खंडपीठाने बंदी घालूनही उत्पादन, विक्री-खरेदी सुरूच आहे. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणीदेखील कागदावरच राहिल्याचे दिसते.
- शेखर नानजकर, पर्यावरणतज्ज्ञ, अध्यक्ष, ‘वाइल्ड’ संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com