न्यायाधीशाच्या पतीकडून पोलिस हवालदारास मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

डेक्‍कन पोलिस ठाण्यात रात्री दुचाकीस्वार आणि हवालदार यांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चौकशीदरम्यान, या घटनेचे कारण आणि इतर बाबी समोर येतील. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा. 

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्या पोलिस हवालदारानेही दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, हवालदारास मारहाण करणारी व्यक्‍ती ही एका महिला न्यायाधीशाचा पती असल्याचे समजते. 

शहर वाहतूक शाखेतील हवालदार इंगळे आणि त्यांचे सहकारी कैलास काळे हे दोघेजण कर्वे रस्त्यातील स्वतंत्र चौकात वाहतूक नियमन करत होते. त्या वेळी एक व्यक्‍ती त्यांच्या मुलीसह दुचाकीवरून जात होती. त्यांनी स्वतंत्र्य चौकातून यू-टर्न घेतला. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे इंगळे यांनी त्यांची दुचाकी अडवून दंड भरण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. ती व्यक्‍ती दुचाकी रस्त्याच्या कडेला घेत होती. त्या वेळी दुचाकी इंगळे यांच्या पायावर गेली. त्यामुळे इंगळे यांनी त्या दुचाकीस्वाराला चापट मारली. वडिलांना मारल्यामुळे मुलीने इंगळे यांच्यावर हात उगारला. त्यामुळे हवालदारानेही तिच्यावर हात उगारला. त्यानंतर दुचाकीवरील व्यक्‍तीने इंगळे यांना मारहाण केली, असे दृश्‍य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

Web Title: pune news police karve road