पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!

पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!

पुणे - ‘‘अहो, फार लांबून नव्हे, येथूनच आलो... असेल आठ-दहा किलोमीटर अंतर. पण प्रचंड थकवा आला हो !’’, ‘‘मुंबईहून पुण्याकडे येताना एक्‍स्प्रेस वे संपेपर्यंत पोचण्यात जेवढे कंटाळलो नाही, तेवढे शिवाजीनगरहून हडपसरपर्यंत पोचताना वैतागलो !’’ हे डायलॉग आपल्या कानांवर अधूनमधून पडायचे, ते अलीकडे नित्याचेच झाले आहेत. यामागची शहरातील प्रचंड वर्दळ, बेशिस्त वाहतूक ही कारणे तर आहेतच; पण आणखी एक कारण समोर येत आहे- ‘व्हिज्युअल पोल्यूशन’ अर्थात दृश्‍य प्रदूषण.

दृश्‍य आणि प्रदूषण? ही काय भानगड आहे? आम्ही आधीच वायुप्रदूषण, पाणीप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यामुळे वैतागलो आहोत, त्यात ही नवी काय भर, असा प्रश्‍न पडू शकतो; परंतु अनेक जाणकार, अभ्यासू व्यक्तींना हे चौथ्या प्रकारचे प्रदूषण नक्कीच माहिती असणार ! एकदा न्यूयॉर्कचे प्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ पुण्यात आले होते. त्यांना हॉटेल हयातपासून ‘सकाळ’ कार्यालयात यायला खूप वेळ लागला. आल्या-आल्या ते म्हणाले, ‘‘पुण्यात फिरताना खूप थकवा येतो.’’ वाहतूक कोंडीमुळे का, असे विचारले असता, ‘‘ते एक कारण तर आहेच; शिवाय दुसरे कारण आहे येथील ‘व्हिज्युअल पोल्यूशन’चे!’’ दृश्‍य प्रदूषणाची सोपी व्याख्या करण्यात आली आहे. डोळ्याला त्रासदायक ठरणारी रचना म्हणजे दृश्‍य प्रदूषण. भारतासारख्या देशात जेथे सद्यःस्थितीच्या नियमनासाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्था कुचकामी ठरत आहेत. सध्याचे व्यवस्थापन आणि नियमांची अंमलबजावणी करताना या संस्था दमत आहेत. तेथे या नव्या प्रकारच्या प्रदूषणाकडे लक्ष कधी जाणार? मोजके जाणकार वगळता आपल्या देशात या प्रदूषणाची साधी चर्चादेखील होताना दिसत नाही. मग नियंत्रण आणि नियमनाचा मुद्दा पुढे येण्याचे काही कारण नाही. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत तेथे या विषयावर केवळ चर्चाच नव्हे, तर संशोधनही होताना दिसत आहे. थोड्या प्रवासानेही शारीरिक आणि मानसिक थकवा येणे, डोकेदुखी, एकाग्र चित्त करण्याची क्षमता कमी होणे असे अनेक परिणाम दृश्‍य प्रदूषणामुळे आरोग्यावर होत आहेत, असे निष्पन्न झाले आहे. युरोप किंवा अमेरिकेत घरांच्या रचना किंवा व्यावसायिक बांधकामांमध्ये अनेक सामायिक बाबी आढळून येतात. यामागे दृश्‍य प्रदूषण कमी करण्याचाच विचार आहे आणि तो तिकडे अतिशय कटाक्षाने पाळला जातो. त्यासाठी नियमन करणाऱ्या संस्थाही निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तिकडील समूह रचनांमध्ये सौंदर्य दिसून येते. म्हणूनच युरोपात फिरताना, वाहनामधून लांबचा प्रवास केला तरी लोकांचा उत्साह कमी होत नाही. आपल्यासारखा कमालीचा थकवा जाणवत नाही. अर्थात, तेथील हवामानाची भूमिका यात महत्त्वाची आहेच. 

महानगरे अग्रस्थानी 
दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई ही भारताची चार महानगरे वेगाने विकसित झाली आहेत, असे आपण मानतो. मात्र विकासात सुसंगत सौंदर्यदृष्टीचा अभाव असल्याने दृश्‍य प्रदूषण प्रचंड वाढले आहे. विशेषत: नव्याने विकास झालेल्या भागामध्ये आलिशान इमारती, चमकणारे रस्ते, भव्य व्यापारी दालने होऊनदेखील तेथे फिरताना सौंदर्यानुभूती होत नाही. दक्षिण मुंबईत फिरताना नजरेला जो आल्हाददायकपणा वाटतो, तो उत्तर मुंबई किंवा नव्याने विकसित झालेल्या बृहन्मुंबईमध्ये अनुभवायला येत नाही.

पुण्यामध्येही वेगाने नागरीकरण झाले; परंतु नागरिकरणाला निश्‍चित दिशा नसल्याने दृश्‍य प्रदूषणात भरच पडली आहे. खूप सुंदर, आखीव-रेखीव, चांगल्या इमारती उभारल्या आहेत. पण त्यांचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिगत स्तरावरचे आहे. अशा इमारतींचा संपूर्ण परिसर सुंदर बनला आहे, असे म्हणता येणार नाही. कारण एकूण शहराच्या किंवा संबंधित परिसराच्या रचनेमध्ये सुसंगतपणाचा अभाव आहे. विदेशामध्ये दृश्‍य प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहिले जाते. स्कॉटलंडच्या राजधानीत नवीन बांधकाम करण्यासाठीचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात, इतके की शहराच्या सौंदर्य रचनेच्या चौकटीत बसणाऱ्या नव्या बांधकामाला परवानगीच मिळत नाही. लंडनसारख्या शहरातही त्या त्या भागाची समरूपता सांभाळली जाते, नवे रंगकामदेखील करायचे असेल, तर त्या भागासाठी निश्‍चित केलेल्या चौकटीतच, सुसंगत रंग निवडावा लागतो. आपल्याकडे या टोकाला जाण्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतील. पण किमान नियमावली निश्‍चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. शहरातील जाणकार वास्तुशिल्पज्ञांनी एकत्र येऊन यावर विचार करायला हवा. 

प्रदूषण टाळणे शक्‍य?
मेंदू ज्या ज्ञानेंद्रियांमुळे प्रभावित होतो त्यात डोळ्यांचे महत्त्व सर्वाधिक आहे. त्यानंतर कान आणि मग नाक, त्वचा इत्यादी. ध्वनी, वायू, वाढते तापमान यांसारख्या प्रदूषणामुळे या ज्ञानेंद्रियांची आधीच वाट लागली आहे. त्यात दृश्‍य प्रदूषणाकडे लक्ष नाही दिले तर मानवाच्या कार्यक्षमतेवर अधिक परिणाम होणार आहे. दृश्‍य प्रदूषण टाळणे शक्‍य आहे का? याला पुण्यातील काही टाऊनशिपनी कृतीतून उत्तर दिले आहे. मगरपट्टा सिटी, अमानोरा सिटी अशी काही उदाहरणे देता येतील. तेथे गेल्यानंतर ‘आपण विदेशात तर नाही ना’ असे उद्‌गार सहजपणे निघतात. पुण्याचे नियोजन नीटनेटके व्हावे म्हणून स्वतंत्र ‘नियोजन विभाग’ सुरू केला होता. तरीदेखील दर दोन-तीन वर्षांनी रस्ते उखडले जात आहेत, नव्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे नियोजन विभागाने नेमके काय काम केले, हा प्रश्‍न पडतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com