तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

रामदास वाडेकर
मंगळवार, 11 जुलै 2017

पवळेवाडी येथील जमीन आंद्रा धरणासाठी संपादित केली, मात्र येथील पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. कोणत्याही धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेतले नाही.या चारही गावाने धरणा सारख्या महत्वाच्या प्रकल्पाला जमीनी संपादन करताना सहकार्य केले. पण औद्योगिक संपादनाला कडाडून विरोध होऊ लागला आहे. 

टाकवे बुद्रुक : तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ ला आंदर मावळातील निगडे, आंबळे, पवळेवाडी व कल्हाटच्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या संमती शिवाय ७\१२ उता-यावर औद्योगिक विकास महामंडळाने शिक्के मारू नये,महामंडळाने.३०.५.२०१७ रोजी या अनुषंगाने काढलेले परिपत्रक रद्द करावे अशी मागणी निगडेचे  माजी उपसरपंच भिकाजी भागवत व अॅड.सोमनाथ पवळे यांनी केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मावळचे आमदार बाळा भेगडे, प्रांताधिकारी, तहसीलदार ,महाराष्ट्औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देऊन गावकऱ्यांनी या संपादनाला विरोध दर्शविला आहे. सुमारे २७०० हेक्टरवर हे संपादन करण्याचा औद्योगिक विकास महामंडळाचा घाट आहे.या संपादनाला कडाडून विरोध होऊ लागला आहे. 
या गावातील बहुतेक क्षेत्र शासनाने आंद्रा धरणा करिता संपादित केले आहे,या शिवाय  पवन उर्जा प्रकल्पासाठी, रिलायन्सच्या वायूवाहिनी व एच.पी.सी.एलच्या वाहिनीसाठी या गावातून जमीनीचे संपादन झाले आहे. त्यात हा औद्योगिक संपादनाचा घाट कशासाठी असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची उपजीविकेचे शेती हेच मुख्य साधन आहे,त्यामुळे अनेकांनी ५ वर्षांपूर्वी पासून आंद्रा धरणातून शेतीला जलसिंचन योजना राबवली त्या पाण्यावर ऊस,गहू,ज्वारी, बाजरी, भात, भुईमूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर  या पिकांसह आंबा,सिताफळ,पपई, यांच्या बागा लावायला सुरूवात केली आहे.या संपादनामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय ही धोक्यात येईल. 

औद्योगिक टप्पा क्षेत्र क्रमांक ४ या साठी संपादन  ही माहिती मिळताच सबंधित शेतकऱ्यांनी विरोधाला सुरूवात केली आहे.गावनिहाय याची चर्चा होऊ लागली आहे.ज्या गावात पूर्वी शासनाने संपादन केले तेथे नव्याने संपादनाचा घाट कशाला असा उद्विग्न प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. खर तर शासनाने निगडे,कल्हाट ,पवळेवाडी ही गावे इकोसिन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहे. निगडेतील बहुतेक ७\१२ वर वनविभागाचे शिक्के मारले आहेत.या चार गावातून ऐवढे मोठे होणारे संपादन म्हणजे बळिराजाला येथून उठविण्याचा प्रकार आहे.
या संपादनाला विरोध करण्यासाठी संबंधितांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे, शासनाने दडपशाही केली तर लोकशाही मार्गाने अंदोलन करण्याचा इशारा भागवत व पवळे यांनी दिला आहे.