#PuneIssues "ग्रास'ने केलं हजारो नागरिकांना निराश

woman
woman

पुणे - दस्तावेज नोंदणीसाठीची ग्रास (गव्हर्न्मेंट रिसिट अकौंटिंग सिस्टीम) प्रणाली आज तरी सुरू होईल, या आशेने रविवारी सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत सुमारे दीडशे नागरिक आशेने थांबले होते; पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशी निराशा चार दिवस हजारो नागरिक अनुभवत आहेत. आज (सोमवारी) ही या कार्यालयात काम संथ गतीनेच सुरू होते.
 
पौड रस्त्यावरील अलंकापुरी श्री सोसायटीतील सुमारे 40 फ्लॅटधारक कुटुंबीयांसह गुरुवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांतील दुय्यम निबंधक कार्यालयात खेटे घालत आहेत. त्यात बहुतांश ज्येष्ठांसह अभियंता, व्यावसायिक, डॉक्‍टर, शेतकरी, नोकरदार, शिक्षिका, प्राध्यापक असे सुमारे चारशे नागरिक काल दिवसभर वेगवेगळ्या वेळी एरंडवण्यातील कार्यालयात ताटकळले होते. आयटी क्षेत्रातील तरुणांचाही त्यात समावेश होता. 

दस्तावेज नोंदणीसाठी रविवारचा दिवस ठरवून निवडलेला. निबंधक कार्यालयातील कर्मचारीही सक्काळी सक्काळी हजर. डिजिटल इंडियात ही सोय उपलब्ध करून दिल्याचा आनंद सुरवातीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर. (पुण्यात अशी तीन कार्यालये रविवारी सुरू असतात.) गर्दी आणि वेळ वाढायला लागला तसे उपस्थित अस्वस्थ होऊ लागले; कारण ना बसण्यासाठी जागा ना स्वच्छतागृह. कार्यालयाच्या खाली असलेल्या दुकानांच्या पायऱ्यांचा आधार बहुतेकांनी घेतला. ज्येष्ठांनी बाहेर पायऱ्यांवरच बसकण मारली. अलंकापुरी श्री सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे. त्यासाठी सोसायटीतील सख्खे शेजारी नोंदणीसाठी जमलेले. त्यात बोरीवलीवरून आलेल्या निवृत्त बॅंक अधिकारी नीता समेळ म्हणाल्या, ""तांत्रिक कारणामुळे काम रखडलेय. दोन दिवस राहण्याच्या तयारीने आले. आता औषधेही संपली आहेत. मुखत्यारपत्र देऊन यजमानांनाच हेलपाटे मारायला सांगावं लागेल.'' सोसायटीतील 92 वर्षांचे आजोबा गुरुवारी हडपसर कार्यालयात पाच तास उभे राहून वैतागले. 

विकसकाचे कर्मचारी मात्र यांची चहा-नाश्‍त्याची व्यवस्था करतात. "पासपोर्ट तुमच्या दारी'सारखी योजना दुय्यम निबंधक कार्यालयाला करता आली तर बरे होईल, अशी सूचना दीपा वेसावकर यांनी केली. वाळकेश्‍वरवरूनही आलेले एक ज्येष्ठ नागरिकही हतबल होऊन परत निघाले. येथे रोज वावरणाऱ्या वकिलांनाही याची सवय झालीय. परिसरातील चहा, वडापावचे विक्रेत्यांचा व्यवसाय मात्र तेजीत होता. 

आम्ही जायचं कुठे? 
दुकानाच्या पायऱ्यांवर सहा तास बसलीय. मधुमेह आहे, अजून चहाही घेतलेला नाही. वाट बघण्याशिवाय काय हातात आहे! 
- विजया कुकनूर (वय 81) 

आम्ही सुधारणा करतोय! 
ग्रास प्रणालीच्या देखभालीचे काम वित्त विभागाकडे आहे; पण आमच्या खात्यांतर्गतही संपर्क व्यवस्था आहे. निबंधक कार्यालयांमध्ये सोयी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर माहिती घेऊन असे दोष दुरुस्त करण्याचा प्रयत्न राहील. 
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य 

याविषयी काय वाटते? मांडा तुमच्या प्रतिक्रिया 
ई-मेल करा - webeditor@esakal.com 
ट्‌विट - #PuneIssues 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com