घरफोडी उघडकीचे प्रमाण केवळ 30 टक्के? 

घरफोडी उघडकीचे प्रमाण केवळ 30 टक्के? 

पिंपरी - उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत अनेकजण गावी जातात. याचा फायदा घेत बंद सदनिका हेरून चोरटे डल्ला मारतात. दरवर्षी या कालावधीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते. घरफोड्या होऊ नये किंवा झाल्यास त्यामध्ये किमती ऐवज चोरीस जाऊ नये म्हणून पोलिस सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. मात्र, मार्चअखेर शहरात 43 घरफोडी झाल्याचे आकडेवारी सांगते. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिस करीत असले, तरी हे प्रमाण 25 ते 30 टक्‍के इतकेच असल्याचे समजते. 

पिंपरी-चिंचवड शहराची वाढ झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढलेली नाही. गुन्हेगारीच्या क्षेत्रात रेकॉर्डवर नसलेले नवनवीन गुन्हेगार येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

दुकाने फोडल्याचा गुन्हाच नाही 
चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांमध्ये महावीर मेडिकल, पतंजली साहित्याचे दुकान, गिफ्ट गॅलरी, हिमगिरी प्लायवूड या दुकानांमध्ये चोरी झाली. यापैकी दोन दुकाने मुख्य रस्त्यावर पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर होती. मात्र यापैकी एकही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसच तक्रारदाराला तक्रार न देण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याची चर्चा सध्या चिंचवडमध्ये सुरू आहे. 

वाढत्या घरफोडीची कारणे 
* पोलिसांची ठराविक भागात न होणारी गस्त 
* कमी झालेले खबऱ्यांचे जाळे आणि नवीन गुन्हेगारांचा समावेश 
* गुन्हेगारांची माहिती काढण्यात कमी पडलेले पोलिस 
* डीबी पथकाचे डिटेक्‍शनऐवजी वसुलीवर लक्ष 
* गेल्या सहा महिन्यांत गुन्हे शाखाही सुस्तावलेली 

आपला शेजारी खरा पहारेकरी असतो. त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजारी तसेच पोलिसांना माहिती दिल्यास त्या परिसरात गस्त घालणे सोयीचे होईल. घरफोड्या होऊ नयेत म्हणून पोलिसांनी सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन जनजागृती सुरू केली आहे. मात्र नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्‍कम बॅंकेत ठेवावी. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक असावेत. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त 

वर्ष 2017 मार्च 2018 पर्यंत 
रात्री घरफोडी 202 43 
दिवसा घरफोडी 71 17 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com