रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी शिवसैनिकांचे आंदोलन 

Shivsainik movement demand for road obstruction
Shivsainik movement demand for road obstruction

विश्रांतवाडी - धानोरी येथील पोरवाल रस्त्याकडून निंबाळकरवस्ती व लोहगाव गावकुसाकडे जाणार्‍या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी आंदोलन केले.

नुकत्याच महापालिकेत सामील करण्यात आलेल्या लोहगावमधील या भागात गुडविल 24 या सोसायटीपासून जवळजवळ 2 किलोमीटरचा रस्ता खराब आहे. लोहगाव गावकुस रोड, गोलेगाव, पिंपळगाव, मरकळ, निरगुडी, वडगाव शिंदे आदी गावांतून येणारे लोक या रस्त्याचा वापर करतात. गेली दोन वर्षे हा रस्ता खराब आहे. याचे डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चालताना वा दुचाकीवरून नागरिक घसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता छोटा असल्यामुळे एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. त्यामुळे इतर गाड्यांना बाजूला थांबावे लागते. अनेकदा विशेषतः शाळेच्या वेळेत रस्त्यावर गर्दी असते.  

चार महिन्यांपूर्वी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रयत्नाने ग्रामविकासनिधीतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून या रस्त्यावर सांडपाणी वाहिनी बसवण्याचे काम करण्यात झालेले आहे. त्यावेळी चेंबर्स बसवले आहेत, पण त्यांवर झाकणे नाहीत. शिवाय चेंबरभोवतीही मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे त्या चेंबरमध्ये वा खड्ड्यांमध्ये कुणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात कुणी पडला तर 10-12 फूट खाली जाईल. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात या रस्त्यावरून वावरणे धोकादायक झालेले आहे. यामुळे अगदी तातडीने हा रस्ता करण्यात यावी, अशी शिवसेनेतर्फे मागणी करण्यासाठी आजच्या या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनात अमित जंगम, सोमनाथ खांदवे, काळूराम साठे, संजय मोझे, एकनाथ खांदवे, अनिल कदम, अभिजित नवले, अजिंक्य अहिरेकर, शिवनाथ खांदवे, वैभव जंगम, लोहगाव शाखाप्रमुख मनोज ढोकले यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 8 दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला.

यावेळी सोमनाथ खांदवे यांनी सांगितले की या रस्त्यावर अनेक नर्सरी व शाळा, हॉस्पिटल्स आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेत सोडविण्यासाठी सगळ्यांनाच स्कूलबसची सोय करता येत नाही. त्यामुळे अनेकदा घरातील महिला मुलांना घेऊन येतात. त्यांचे या रस्त्यावरून खूप हाल होतात. अमित जंगम यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी एक महिला मुलाला शाळेत नेत असताना पडली. त्यावेळी दगडात पडल्यामुळे तिला आणि मुलालाही खूप लागले. मुलाला 9 टाके पडले. असे प्रकार वारंवार होतात. त्यामुळे नागरिकांना खूप शारीरिक, मानिसक त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता खाजगी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. परंतु प्रशासनाने सांडपाणीवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळेे प्रशासनाने त्वरित या रस्त्याचे डांबरीकरण करावे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com