#SreetDogs पिसाळलेल्या कुत्र्याचा कात्रजमध्ये धुमाकूळ

dogs
dogs

कात्रज (पुणे) : घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणारी आपली मुलं खरंच किती सुरक्षित आहेत, या प्रश्‍नावर प्रत्येक पुणेकराला गांभीर्याने विचार करायला लावणारी भयंकर घटना शुक्रवारी सकाळी पुण्यात घडली. महाविद्यालयातून घरी जाणारी मुलगी असो की, रस्त्यावरून फिरणारे आजोबा, तसेच घराच्या अंगणात मनमुराद खेळणारी तीन वर्षांची चिमुकली असो या सर्वांवर पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हल्ला करून, त्यांचे लचके तोडले. यात सहा जण जखमी झाले आहेत. त्यात आजोबा आणि नातीचाही समावेश आहे. 

कात्रजमधील अंजलीनगर येथे सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही खळबळजनक घटना घडली. त्यामुळे या परिसरात दिवसभर कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. कोणत्याही क्षणी कोणतेही कुत्रे आपल्यावर जीवघेणा हल्ला करेल की काय, इतकी भीती या परिसरात निर्माण झाल्याचे येथील नागरिकांशी साधलेल्या संवादातून दिसून आले. 

सकाळी अकराला भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयातून घरी जात असताना कल्याणी गाढवे हिला पहिल्यांदा कुत्रे चावले. हा हल्ला इतका भीषण होता की, ती त्याला प्रतिकारच करू शकली नाही. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या आजोबांना पुढे येऊन कुत्र्याला हटकले, तेव्हा त्याने कल्याणीला सोडले. तोपर्यंत तिचा चावा कुत्र्याने घेतला होता, अशी माहिती तिचे वडील दिलीप गाढवे यांनी दिली. 

कल्याणीचा चावा घेतल्यानंतर कुत्रे वाट दिसेल तिकडे सुसाट वेगाने पळू लागले. मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी जात असलेल्या 80 वर्षांच्या साधू रेणुसे यांच्याही पायाचा लचका त्याने तोडला. त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्यांची जेमतेम तीन वर्षांची नात आरोही घराच्या अंगणात खेळत होती. तिच्यावर कुत्र्याने झडप घेतली. ती चिमुरडी जीवाच्या आकांताने ओरडली. त्यानंतर कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली, असे राजू रेणुसे यांनी सांगितले. मारुती पवार (वय 50), सोमनाथ कांबळे (वय 25) आणि मारुती कडू (वय 42) यांनाही हे कुत्रे चावले. 

सहापैकी दोघांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे यांनी दिली. कल्याणी गाढवे, साधू रेणुसे आणि आरोही रेणुसे यांना भारती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. त्यांना रेबीज प्रतिबंधक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

"कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे; पण त्याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली पाहिजे.'' 
- अमृता बाबर, नगरसेविका 

"तीनही रुग्णांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्यातून रक्त आल्याने श्‍वानदंशाच्या तिसऱ्या वर्गवारीत या जखमा मोडतात.'' 
- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती विद्यापीठ रुग्णालय 

याबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा ईसकाळवर 
ईमेल करा - webeditor@esakal.com

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com