टॉयलेट चोरी - एक प्रेमकथा की व्यवसाय 

टॉयलेट चोरी - एक प्रेमकथा की व्यवसाय 

पुणे - किरकोळ भाजीपाल्याची, ड्रेनेजच्या झाकणाची इतकंच काय पण दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांचीही चोरी झाल्याचे आपण ऐकले असेल. पण टॉयलेटचीच (शौचालय) चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का? पण खरंच असं घडलं आहे.

कात्रज- देहूरोड बायपास मार्गावरील ताथवडे येथून फिरती दहा सार्वजनिक शौचालये चोरीस गेली आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा काल रात्री दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत झोपडपट्टीधारकांसाठी ही स्वच्छतागृहे बसविण्यात आली होती. 

काही महिन्यांपूर्वी अक्षयकुमारचा ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यामध्ये त्याच्या बायकोला उघड्यावर शौचाला जाण्याचा संकोच वाटायचा. त्यामुळे अक्षयकुमारने खास आपल्या बायकोसाठी एका चित्रपटाच्या सेटवरील फिरते शौचालय चोरून घरी आणले होते. त्यामुळे बायकोवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी या चित्रपटातून प्रेरणा घेत एखाद्या प्रेमवीराने ही शौचालये चोरली आहेत का? अशीही चर्चा आज होती. बरं दहा शौचालये चोरीस गेली आहेत, यामागे काय कारण असावे, असाही प्रश्‍न आहे. मात्र, अनेकदा पुरुषमंडळी बायकोवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, ‘तुला एकच दागिना काय दहा दागिने करून देईल.’ अशा फुशारक्‍या मारत असतात. तसंच एखाद्या नवऱ्याने तुला एकच शौचालय काय, दहा आणून देईल, असे आश्‍वासन दिले असावे व त्याची पूर्तता करण्यासाठी ही चोरी झाली असावी, असाही एक अंदाज बांधण्यात येत आहे. 

दरम्यान, सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लावण्यासाठी या चोरीत विरोधकांचा हात असल्याचा आरोप अजून सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांचे पोलिसांकडे दुर्लक्ष होत असल्याने शौचालय चोरीची घटना घडल्याचा आरोप केलेला नाही. तसेच या घटनेमुळे सरकारने खडबडून जागे होऊन, राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा, अशी मागणी विरोधकांनी अद्याप केलेली नाही.      

कागदोपत्री शौचालये दाखवून, अधिकारी मंडळी निधी हडप करत असल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आता थेट शौचालयाचीच चोरी झाल्याने अनेकांनी कपाळावर हात मारला आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे ) रघुनाथ उंडे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही स्वच्छतागहांची चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विविध शक्‍यता गृहित धरून तपास चालू आहे.’’

बेरोजगारीला उत्तर? 
या शौचालयाचा उपयोग चोरमंडळी कसा करणार, हाही प्रश्‍न आहे. मात्र, जत्रा- यात्रा, उत्सव,  सभा- समारंभ याठिकाणी ही शौचालये उभे करून ‘केवळ दोन रुपयांत लाभ घ्या’ अशी जाहिरात करून, चोरमंडळी व्यवसाय करू शकतात. देशात बेरोजगारी वाढत असल्याच्या टीकेला उत्तर म्हणून तर या मंडळींनी हा नवा व्यवसाय सुरू केला नसावा ना, अशीही शंका व्यक्त होत आहे. मध्यंतरी नोकरीपेक्षा भजी तळण्याचा व्यवसाय चांगला असल्याचे अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितले होते. त्याला पर्याय काही डोकेबाजांनी तर शोधला नाही ना, याची चर्चा दिवसभर हिंजवडी परिसरात आज होत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com