वाहतूक हेच आव्हान - आर. के. पद्‌मनाभन

R.-K.-Padmanabhan
R.-K.-Padmanabhan

पिंपरी - ‘‘शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे कठीण नाही. मात्र, वाहतूक समस्या सोडवणे हे आव्हानात्मक असून, त्यावर सध्या लक्ष केंद्रित करीत आहोत,’’ असे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी गुरुवारी (ता. ६) सांगितले. ‘सकाळ’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

औद्योगिक नगरीतील स्थलांतरित लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक आहे. नोकरी आणि शिक्षणानिमित्त अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत. त्यामध्ये हिंजवडी, चाकण, देहूरोड, तसेच शहरातील औद्योगिक वसाहतीत आयटीयन्सपासून सर्व प्रकारचे कामगार आहेत. त्यामुळे ही लोकसंख्या ३५ लाखांवर पोचली आहे. 

वाहतुकीला शिस्त लावण्यावर सर्वाधिक भर देण्याचे नियोजन केले आहे. चुकीच्या बाजूने येणारी वाहने, दुहेरी पार्किंगवर सर्वप्रथम कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक चौकामध्ये चार पोलिसांचे पथक ठेवण्यात येईल. नियम तोडणाऱ्या वाहनांचे क्रमांक नोंदवून त्याआधारे घरी नोटीस बजाविण्यात येईल. महाविद्यालये, मॉल आणि बाजारपेठा येथे पोलिसांचा वावर असेल, त्यामुळे तेथील गुन्हेगारीला आळा बसणार आहे. आतापर्यंत शहरात घडलेल्या गुन्ह्यांचे मॅपिंग करण्यात आले असून, त्याचा अभ्यास सुरू आहे.

सध्या आयुक्‍तालयात मनुष्यबळ कमी आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले असून, लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बीआरटी मार्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या खासगी वाहनांचे क्रमांक नोंदवून त्यांच्यावर पोलिसांची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंजवडीवर प्रथम लक्ष केंद्रित
हिंजवडी, चाकण या भागांतील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. शहरातील काही चौकांत वाहतूक कोंडी होते. सर्वाधिक कोंडी होत असणाऱ्या हिंजवडीवर प्रथम लक्ष केंद्रित केले असून, लोकांना तो प्रयोग उपयुक्‍त ठरत आहे. चाकण चौकाची पाहणी आज केली. येत्या दोन दिवसांमध्ये त्याठिकाणी बदल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांच्या मते...
रिक्षा मीटर न वापरणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करणार 
 ओव्हर लोडिंग वाहनांच्या फोटोसाठी ‘व्हॉट्‌सॲप’ क्रमांक जाहीर करणार
 अनधिकृत पार्किंगविरुद्ध महापालिकेसमवेत कारवाई करू
 शाळा, महाविद्यालय परिसरातील रोड रोमिओविरुद्ध कारवाई चालू राहील 
 गुन्हेगारी जास्त असलेल्या भागांवर लक्ष देणार
 बीआरटी मार्गात प्रवेश केल्यास कारवाई करणार
 सध्या मनुष्यबळ कमी, यंत्रणा नाही, पुरेशी वाहनेही नाहीत. त्यामुळे सर्वांत महत्त्वाच्या आणि मोठ्या समस्यांवर प्रथम लक्ष देणार
 समस्या सोडविणे आणि ‘रिझल्ट ओरिएंटेड’ काम करू
 ‘फिल्ड पोलिसिंग’ केल्याने जास्तीत जास्त पोलिसांना ‘फिल्ड ड्यूटी’
 डबल पार्किंग, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणार
 सीसीटीव्ही कॅमेरे पुणे आयुक्तालयातून पिंपरी नियंत्रण कक्षाला जोडणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com