ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळत असे. तेंडुलकर यांनी 1954 पासून व्यंगचित्रे काढण्यास सुरवात केली होती. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता.

पुणे - व्यंग्यचित्रातून दिसतो 'चेहऱ्याआडचा माणूस' असे सांगणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे सोमवारी मध्यरात्री आजारपणाने निधन झाले.

'व्यंग्यचित्र म्हणजे कागदावर उमटलेल्या कुंचल्याच्या फर्राट्यांचा हास्याविष्कार‘, या रूढ व्याख्येच्या पलीकडे जात ज्यांच्या व्यंग्यचित्रांनी प्रसंगी अनेकांना अंतर्मुख केलं... कागदावर जणू जगण्याचं तत्त्वज्ञानच मांडलं... अशी मंगेश तेंडुलकर यांची ओळख होती. वाढते दारिद्य्र, शहरातील टेकडीफोड, वाहनांचा गोंगाट, रस्त्यांची दुर्दशा, मोबाईलच्या गमती-जमती अशा गंभीर अन्‌ हलक्‍या-फुलक्‍या विषयांवरील वेगळा विचार देणारी मंगेश तेंडुलकर यांची व्यंग्यचित्रे होती. आज दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळत असे. तेंडुलकर यांनी 1954 पासून व्यंगचित्रे काढण्यास सुरवात केली होती. भुईचक्र, संडे मूड, कार्टुन ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. संडे मूड या पुस्तकासाठी त्यांनी वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कारहील मिळाला होता. 

(मंगेश तेंडुलकर यांनी व्यंगचित्र प्रदर्शनाला दिलेल्या भेटीवेळी अपर्णा आशिष यांनी यु ट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ)