'गुलजार' रचना 

'गुलजार' रचना 

एखाद्या दिवशी सकाळी जाग येताच, एखाद्या गाण्याची धून किंवा ओळ मनात रुणझुणते... किंवा सकाळी कानावर पडलेलं एखादं गाणं दिवसभर मनात रेंगाळत राहतं... काही शब्द... काही सूर. कधी शब्दांमुळे सूर; तर कधी सुरांमुळे शब्द... कधी दोन्हींचा अपूर्व मिलाफ! पावसाळी आभाळात मधूनच इंद्रधनू खुलावं, झाडांच्या मागून अवचित निळा-मोरपिशी पिसारा हळूच उलगडावा, तसं हे शब्द आणि सूर आपला दिवस रंगीबेरंगी बनवतात. अशाच कधी कधी मनात रुणझुणत राहिलेल्या ओळी... 
'लटों से उलझी लिपटी 
इक रात हुआ करती थी 
कभी कभी तकिये पे वो भी मिला करती है...' 
किंवा 
'इक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं 
वहॉं दास्ता मिली, लम्हा कहीं नही...' 
किंवा 
'बादलों से काट काट के...' 
किंवा 
'नमक इश्‍क का...' 
... असं खूपदा होतं. माझ्या बऱ्याचदा लक्षात आलंय, की अशा मनात दरवळणाऱ्या ओळी बऱ्याचदा 'गुलजार' लेखणीतून उतरलेल्या असतात. 

कवी. गीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक, चित्रपटनिर्माता म्हणून सहा दशकांहून अधिक काळ कलेच्या विविध क्षेत्रांत सक्रिय असलेलं आणि आपल्या शब्दवैभवानं आणि विलक्षण कल्पनाविष्कारानं रसिकांच्या मनात मानाचं स्थान मिळवणारं आदरणीय नाव म्हणजे गुलजार. त्यांच्या कविता आणि गीतं यांचं रसिकांच्या मनात खास स्थान आहे आणि त्यांच्या रचनांची मोहिनी सर्वांवरच आहे. 
'तू मेरे पास भी है...', 'दिल तो बच्चा है...', 'ए अजनबी...', 
'दिल ढूँढता है...', 'इस मोड से जाते हैं...', 'ए जिंदगी गले लगा ले...', 
'आनेवाला पल जानेवाला है...' अशा नव्याजुन्या कितीतरी गीतरचना आपल्या ओठांवर कितीदा तरी येतात. 
गुलजार यांची शब्दरचना म्हणजे तरल, पिसासारखा हळुवार अनुभव असतो. ते अतिशय परिणामकारक; पण संयत अभिव्यक्तीतून भावभावनांचा किती विलक्षण पट खुला करतात! आणि कधी कधी तर आपल्या खोलवर कुठंतरी जाणवलेल्या; पण मुठीत पकडता न आलेल्या भावना अगदी सहजपणे शब्दांत गुंफून, त्या कविता किंवा गीतांच्या रूपानं आपल्यासमोर सादर करतात. 
'चुपचाप सा ये कमरा मेरा 
और रोशन ताक 
जहॉं बल्ब जल रहे हैं 
खामोश 
बेजुबान 
जो बस जलना जानते हैं 
किसी की याद में...!' 
अशा शब्दांत मनातली वेदना मांडणारी त्यांची लेखणी, 
'शाम से आँख में नमीं सी है 
आज फिर आप की कमी सी है!' 
अशा शब्दांत विरहभावना किती आर्तपणे व्यक्त करते! 
'यादों की अलमारी में देखा, 
वहॉं मोहब्बत फटेहाल लटक रही है!' 
असं म्हणत प्रेमाची व्यथा मांडणारी त्यांची समर्थ लेखणी, 
'पलक से पानी गिरा है 
तो उसको गिरने दो 
कोई पुरानी तमन्ना 
पिघल रही होगी!!' 
असं म्हणत थेट आपल्या काळजालाच हात घालते, तेव्हा आपल्याच मनातलं आर्त कागदावर उमटल्यासारखं वाटतं. 

गुलजारजींच्या रचनांचं खास वैशिष्ट्य म्हणजे, ते शब्दांचे विलक्षण गोफ गुंफताना, त्यात भाषांचं वैभव, निराळ्या प्रतिमा, अनोख्या उपमा, भावनांची उत्कटता, त्यांची सखोलता, लोकजीवनाचे रंग, निसर्गाच्या छटा, मनोव्यापार, आध्यात्मिकता यांचे इतके वेगळे आणि मनोहर रंग गुंफतात...आणि त्या हळुवार, तरल रचना मनाची तार छेडत, रसिक मनाशी एक अनोखं नातं निर्माण करतात. 
'तेरी बातों में किमाम की खुशबू है' किंवा 'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' किंवा 'सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे चलता है'... अशा चित्रपटगीतांतल्या त्यांच्या विलक्षण प्रतिमा-उपमा आणि कल्पना अतिशय मोहक आहेत. त्या गीताच्या सुरांच्या बरोबरीनं लक्षात राहतात. अशा अनेक अनोख्या व मधुर गीतरचनांबरोबरच, 'आँखों को वीसा नहीं लगता, सपनों की सरहद नहीं होती,' अशा त्यांच्या कवितांतील कल्पना किती सुंदर आहेत! 

'त्रिवेणी' हा तर त्यांचा अतिशय मनमोहक रचनाबंध आहे... 
'बेलगाम उडती है कुछ ख्वाहिशें ऐसे दिल में 
'मेक्‍सिकन' फिल्मों मे कुछ दौडते घोडे जैसे 
थान पर बॉंधी नहीं जाती सभी ख्वाहिशें मुझ से' 
अशी मनोवस्था सांगणारे गुलजार 
'तमाम सफ हे किताबों के फडफडाने लगे 
हवा धकेल के दरवाजा आ गयी घर में! 
कभी हवा की तरह तुम भी आया जाया करो!!' 
असं मोहक आणि हळुवार आर्जव करतात, तेव्हा आपण 
त्या रचनेच्या प्रेमातच पडतो. 
'जंगल जंगल बात चली है पता चला है 
अरे चड्डी पहन के फूल खिला है...' हे 'मोगली'चं गाणे लिहिणारे गुलजार 
'लकीरे है तो रहने दो 
किसी ने रुठकर गुस्से में शायद खींच दी थी, 
इन्हीं को अब बनाओ पाला 
और आओ कबड्डी खेलते हैं' 
अशा टोकदार शब्दांत परिस्थितीवर भाष्य करतात, तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा विस्तीर्ण आवाका विशेषकरून लक्षात येतो. 
'खाली कागज पे क्‍या तलाश करते हो? 
एक खामोश-सा जवाब तो है' 
अशा सहज शब्दांत मर्म पकडणारे गुलजार 
'मॉं ने जिस चॉंद सी दुल्हन की दुआ दी थी मुझे 
आज की रात वह फुटपाथ से देखा मैंने 
रातभर रोटी नजर आया है वो चॉंद मुझे' 
अशा परिणामकारक शब्दांत वास्तवाचं दर्शन घडवतात, तेव्हा त्यांच्या लेखणीची ताकद लक्षात येते. अशीच आणखी एक रचना 
'चूडी के टुकडे थें, पैर में चुभते ही खून बह निकला 
नंगे पॉंव खेल रहा था, लडका अपने आँगन में 
बाप ने कल दारू पी के मॉं की बॉह मरोडी थी.' 

'तुम्हारे होंठ बहुत खुश्‍क खुश्‍क रहते हैं 
इन्हीं लबों पे कभी ताजा शेर मिलते थें 
ये तुम ने होठों पे अफसाने रख लिए कब से?' 

अशा प्रकारे तरल भावना समर्थपणे शब्दांत पकडणारे गुलजार 
'प्रेम' या नितांतसुंदर भावनेबद्दल लिहिताना किती हळुवार होतात... 
'प्यार कभी इकतरफा होता है; न होगा 
दो रुहों की मिलन की जुडवा पैदाईश है ये 
प्यार अकेला नहीं जी सकता 
जीता है तो दो लोगों में 
मरता है तो दो मरते हैं' 

'क्‍या लिखूं क्‍या ना लिखूं, आरजू मदहोश है 
आँसू गिरते हैं पन्नों पर, और कलम खामोश है..' 
अशी हळवी रचना करणारे गुलजार म्हणतात, 
'शायर बनना बहुत आसान है.. 
बस एक अधूरी मोहब्बत की 
मुकम्मल डिग्री चाहिए' 

असंच एकदा त्यांची एक कविता वाचली. 
'याद है इक दिन 
मेरी मेज पे बैठे बैठे 
सिगरेट की डिबिया पर तुमने 
एक स्केच बनाया था 
आ कर देखो 
उस पौधे पर फूल आया है...' 

मला आठवतंय, इट रिअली मेड माय डे ! 
गुलजार यांच्या रचना आहेतच अशा... फुलांच्या ताटव्यावर नक्षी नक्षी काढत भिरभिरणारी फुलपाखरं त्यांच्या पंखांची मखमल मागे ठेवत जातात तशा... चवीचवीनं आस्वाद घेतल्यानंतर मनात दरवळत राहणाऱ्या... प्राजक्ताचा हार ओवल्यानंतर दोरा आणि बोटं केशरानं माखावीत तशा मनावर रंग उमटवणाऱ्या! 
गुलजार जी, वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com