एक कोल्हा बहु भुकेला (प्रवीण टोकेकर)

रविवार, 30 जुलै 2017

‘द डे ऑफ द जॅकल’ ही फ्रेडरिक फॉरसाइथ यांची कादंबरी १९७० च्या दशकाच्या सुरवातीला बाजारात आली. तिचं स्वागत तसं थंडंच झालं; पण नंतर ती सलग दोन तपं बेस्ट सेलर म्हणून आघाडीवर राहिली. लगोलग तिच्यावर त्याच नावाचा चित्रपटही आला. एक भन्नाट थरारपट म्हणून तो लक्षात राहतो. या कादंबरीला आणि चित्रपटाला खऱ्या अर्थानं ‘ट्रेंडसेटर’ म्हणायला हवं. कारण त्यानंतर या पठडीतल्या असंख्य कहाण्या शाईरूपानं कागदावर आणि चित्ररूपानं पडद्यावर आल्या.
 

आशाळभूतासारखं पडलेलं एखादं पल्प नॉवेल काय काय घडवून आणू शकतं? फारसं काही नाही. गिऱ्हाइकाच्या वाटेवर त्यानं पडून राहायचं. आपण ते फूटपाथवरून उचलायचं. दोन-तीनशे पानांतला थरार मिटक्‍या मारत अनुभवून, पानांचे कोपरे दुमडून अडगळीत फेकून द्यायचं. कालांतरानं पुन्हा ते फूटपाथवर येतंच. असं असलं तरी ही निष्फळ पैदास काही थांबता थांबत नाही. महिन्याकाठी डझनावारी येत असतात. बरं, ह्या कादंबऱ्या कुणी पुनःपुन्हा वाचत असेल, अशी शक्‍यताही नाही. ही काही अभिजात, संग्राह्य पुस्तकं नव्हेत, की दिवाणखान्यात शोभेनं लावावीत. एकदा वाचली, विषय संपला. लेखक कुणीही असो...सिडनी शेल्डन, डेव्हिड बाल्डाची, टॉम क्‍लॅन्सी, जॉन ग्रिशॅम किंवा रॉबर्ट लुडलम...किंवा कुणीही. 

अर्थात यांपैकी काही कादंबऱ्या तुफान खपतात. काहींवर चित्रपट निघतात. काही इतक्‍या बेस्टसेलर ठरतात, की लेखकमहाशय एका फटक्‍यात विमानबिमान विकत घेऊ शकतील...घेतातही.

ख्यातनाम लेखक फ्रेडरिक फॉरसाइथच्या पहिल्यावहिल्या नवलिकेनं मात्र याच्या पलीकडं झेपा टाकल्या. एक विशिष्ट विश्‍व संपूर्ण ढवळून काढलं. गुप्तचरांचं जग थोडं चपापलं. जगभरातल्या सुरक्षायंत्रणा सावध झाल्या. मुख्य म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटनच्या प्रशासनांनी लगबगीनं आपल्या पासपोर्ट वितरणयंत्रणा सुधारून घेतल्या. आजही खोटे पासपोर्ट बनवण्याच्या प्रकाराला युरोपात ‘जॅकल फ्रॉड’ असं म्हटलं जातं. व्हीआयपी लोकांच्या सुरक्षाव्यवस्थांमधली गोपनीयता अधिक गंभीरपणानं घेतली जाऊ लागली. कारण या कादंबरीत वास्तव आणि काल्पनिकेची सरमिसळ अशी काही बेमालूम होती, की ती वाचून लोक हैराण झाले ः द डे ऑफ द जॅकल. १९७० चं दशक येता येता बाजारात आलेली ही कादंबरी. आल्या आल्या तिचं स्वागत थंडंच झालं; पण नंतर ती सलग दोन तपं बेस्ट सेलर म्हणून आघाडीवर राहिली. लगोलग तिच्यावर चित्रपटही आला. 

एक भन्नाट थरारपट म्हणून तो लक्षात राहतो. ही कादंबरी आणि चित्रपटाला खऱ्या अर्थानं ‘ट्रेंडसेटर’ म्हणायला हवं. कारण, त्यानंतर या पठडीतल्या असंख्य कहाण्या शाईरूपानं कागदावर आणि चित्ररूपानं पडद्यावर आल्या.

* * *

तो साधारणत: १९६२ चा ऑगस्ट महिना असेल. चार्ल्स द गॉल या धडाकेबाज फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी अखेर अल्जिरियाला स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं. एक भयंकर चिघळलेली समस्या संपवली होती. अल्जिरियावर तेव्हा फ्रेंचांचा अंमल होता आणि स्वातंत्र्यचळवळ ऐन भरात होती. तिथं कुणी महात्मा जन्माला न आल्यानं ही चळवळ अर्थात बंदुका आणि स्फोटकांनीच पेटत होती. दिवसाढवळ्या खून पडत होते. क्रांतिकारकांच्या प्रतिकारापुढं फ्रेंच सैन्याचीही दमछाक होतच होती. कित्येक सैनिकांनी अल्जिरियन भूमीवर देह ठेवला होता. या सगळ्याची किंमत मोजून अखेर द गॉल यांनी स्वातंत्र्यकरारावर सह्या केल्या. त्यानं फ्रेंच राष्ट्रभक्‍त मात्र खवळले. त्यात काही लष्करी अधिकारीही होते. या माणसानं फुकाफुकी अल्जिरियाचा ताबा सोडला? मग आजवर सांडलेल्या रक्‍ताचं काय? शत्रूला दिलदारी दाखवणं ही जन्मभूमीशी प्रतारणाच...मग या राष्ट्रभक्‍तांनी द गॉल यांनाच उडवायचा निर्धार केला. हे सगळं आपल्याला ओळखीओळखीचं वाटतंय का? असेल असेल.

...पण गॉल यांच्या आयुष्याची दोरी एका महात्म्यापेक्षाही बळकट होती बहुधा. कैक हल्ल्यांमधून ते सहीसलामत बचावले. त्यांच्यावर झालेला शेवटचा हल्ला तर निकराचा होता. लेफ्टनंट कर्नल ज्यां मारी बास्तिन-थिरी याच्या नेतृत्वाखाली ‘ओएएस-ऑर्गनायझेशन दे ला आर्मी सीक्रेती’ या जहाल संघटनेच्या एका पथकानं गॉल यांच्या मोटारीवर मशिनगनच्या गोळ्यांचा पाऊस पाडला; पण गॉल यांना ओरखडाही उमटला नाही. वास्तविक, मारेकऱ्यांचा म्होरक्‍या बास्तिन थिरी फ्रेंच लष्करातही आवडता अधिकारी होता. त्याला अटक झाली. अखेरच्या क्षणी त्याचं अपील फेटाळून लावलं तेव्हा वकिलालाही त्यानं सांगितलं होतं ः ‘माझी काळजी करू नकोस. मी मरणार नाही.’

‘‘फायरिंग स्क्‍वाडपुढं काही तासांत तुला उभं केलं जाणारेय!’’

‘‘माझं फायरिंग स्क्‍वाड माझ्यावर गोळ्या झाडेल? अशक्‍य!’’

...पण बास्तिन थिरीच्या शरीरात एका इशाऱ्यानिशी फायरिंग स्क्‍वाडच्या दीड-दोनशे गोळ्या शिरल्या.

हा प्रयत्न फसल्यावर ओएएससमोर दोन पर्याय होते. एकतर लढा सोडून द्यायचा, नाहीतर नवीन प्रयत्न जारी ठेवायचे. ओएएसचं पुढारपण कर्नल रोदॅं, व्यवस्थापक कॅसाँ आणि खजिनदार मॉक्‍लां यांच्याकडं आलं होतं. त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये काही निष्पन्न होईनासं झालं. कारण, दरम्यान फ्रेंच गुप्तहेरांनी क्रांतिकारकांचं जग संपूर्ण पोखरून काढलं होतं. सगळ्या संभावितांच्या याद्या, माहिती त्यांच्याकडं वेगानं जमा होत होती. अशा परिस्थितीत हल्ला करणं आणखीच कठीण झालं होतं. काय करता येईल? ज्याचं कुठल्याही देशात कसलंही रेकॉर्ड नाही, ज्याचा चेहरा कुणालाही माहीत नाही, असा व्यावसायिक मारेकरी हुडकून त्याला हे काम सोपवायचं; पण हे कसं जमावं? 

...असा माणूस त्यांना शेजारच्या ब्रिटनमध्येच मिळाला, ज्याचं मूळ नाव कुणाला ठाऊक नव्हतं, कुठल्याही पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. गुन्हा तर दूरच राहिला...पण तो व्यावसायिक मारेकरी आहे. बख्खळ किंमत घेऊन एखाद्याला उडवणं हा त्याचा पेशा आहे. व्हिएन्नामध्ये त्याला बोलावलं गेलं. तो आला. सगळी केस ऐकून त्यानं होकार दिला; पण अटीही घातल्या.

‘‘काम अवघड आहे; पण अशक्‍य नाही. अशी कामं मी नेहमी एकटा करतो. कुणीही

लुडबुड करता कामा नये. घडामोडी जाणून घ्यायला मला पॅरिसमधला एखादा गुप्त फोन नंबर मिळाला पाहिजे. तिथं दरवेळी मीच संपर्क साधीन. तुमचा एखादा हेर टारगेटच्या जास्तीत जास्त जवळ पेरा. एखादी बाई असेल तर बेहतर! आपल्याला अंतर्गत माहिती मिळत राहणं आवश्‍यक आहे. ती मला सांगत चला. तेवढं सोडलं तर माझा-तुमचा काहीही संबंध नाही. आणि हो, माझ्या स्विस बॅंकेच्या खात्यात पाच लाख पडायला पाहिजेत. मगच मी कामाला लागेन,’’ तो म्हणाला.

‘‘पाच लाख फ्रॅंक्‍स?’’ कर्नल रोदॅं हादरला.

‘‘ अंहं...डॉलर्स! अडीच लाख ॲडव्हान्स. अडीच लाख काम झाल्यावर...’’ तो म्हणाला. कर्नल रॉदॅंला घाम फुटला. पाच लाख डॉलर्स कुठून आणणार? (तेव्हाचे पाच लाख डॉलर्स म्हणजे आजच्या हिशेबात ४० लाख डॉलर्सपेक्षाही थोडे जास्तच.)

‘‘आमचा व्हाल्मी तुझ्या संपर्कात राहील. बरं. पण हे पैसे आम्ही कसे मिळवू शकतो? काही सूचना?’’ चाचरत रोदॅंनं विचारलं.

‘‘तुमचं नेटवर्क वापरा आणि बॅंका लुटा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर पाळत ठेवली गेली किंवा तुमच्यापैकी कुणीही फुटलं तर मी त्या क्षणी मोकळा होईन...’’ व्हाल्मीकडं नजर टाकून तो म्हणाला आणि निघून गेला.

...त्याला नाव विचारलं तर त्यानं नुसतं ‘जॅकल म्हणा’ असं सांगितलं होतं.

* * *

फ्रान्स आणि युरोपातल्या काही भागांत अचानक बॅंकलुटीचे प्रकार वाढल्याचं पोलिसांच्याही लक्षात आलं होतं. यापाठीमागं काही भयंकर कटकारस्थान शिजतंय याचीही कल्पना त्यांना आली होती. जॅकलनं यथावकाश दिलेल्या खातेक्रमांकावर अडीच लाख डॉलर्स वळते झाले. मग सुरू झाला तो उंदरा-मांजराचा खेळ.

जॅकलनं लगोलग दोन खोटे पासपोर्ट मिळवले. खोटे पासपोर्ट मिळवायचे तीन ढोबळ मार्ग आहेत. एक, खोट्या नावानिशी आणि कागदपत्रांनिशी रीतसर अर्ज करून खरा पासपोर्ट मिळवणं. दोन, खरा पासपोर्ट मिळवून त्याच्यावरचा फोटो बदलणं. आणि तिसरं, पासपोर्ट-कर्मचाऱ्याला लाच देऊन कोरा करकरीत पासपोर्ट मिळवून तो मनासारखा करून घेणं. जॅकलचा तिन्हींत हातखंडा होता! वेळ न दवडता त्यानं पॅरिस गाठलं. दूरवरच्या डोंगरातली नेमबाजीच्या तालमीची जागा मुक्रर केली. मग बेल्जियममधला एक निष्णात कारागीर गाठून विशिष्ट पद्धतीची बंदूक बनवायला टाकली.

कागदपत्रांचा फेरफार करायलाही त्याला चांगला नकलखोर हवा होता. तोही मिळाला. 

बंदूक मिळाल्यावर त्यानं पहिली गोळी कारागिराला घातली. कागदपत्रांचा फेरफार करणाऱ्याची मान मोडली. त्याचा चेहरा बघणाऱ्याला मृत्यू पावणं गरजेचं होतं! तो कामगिरीवर निघाला, तेव्हा त्याच्या हातात पॉल ऑलिव्हर डुग्गन या नावाचा पासपोर्ट होता. 

* * *

-फ्रेंच पोलिसही हातावर हात धरून बसलेले नव्हते. ओएएसनं काहीतरी नवीन भानगड सुरू केली आहे, याची कुणकुण त्यांना लागली होतीच. द गॉल यांनी मात्र जास्तीची सुरक्षा घेण्यास नकार दिला. ‘मी पब्लिकचा माणूस आहे, पब्लिकमध्ये मी मिसळणारच, काहीही होवो,’ असं त्यांचं म्हणणं. पोलिस आयुक्‍त बर्तिए आणि कर्नल सांक्‍लेअर यांची एक छोटी समितीच तयार झाली. बर्तिए यांनी लेबेल नावाच्या आपल्या चलाख अधिकाऱ्याला गुप्त चौकशीचे संपूर्ण अधिकार दिले. लेबेल खूपच तय्यार होता. बॅंकलुटीच्या प्रकरणात काही अटका झाल्या, त्यातून माहिती मिळाली की ओएएसनं कुण्या अज्ञात परदेशी मारेकऱ्याला कामगिरी दिली आहे ः द गॉल यांना उडवण्याची. रोदॅं आणि त्याचं त्रिकूट रोममधल्या गॅरिबाल्डी हॉटेलात दडून बसल्याची माहितीही त्यानं मिळवली. कुणी व्हॉलिन्स्की नावाचा इसम त्यांचा सांभाळ करत होता. लेबेलनं सरळ रोम गाठून व्हॉलिन्स्कीला ‘पोत्या’त घेतलं. थर्ड डिग्रीचा वापर अपरिहार्य होता. छळानं अर्धमेल्या झालेल्या व्हॉलिन्स्कीचे अखेरचे शब्द होते : जॅकल.

ब्रिटनपासून आफ्रिकी देशांपर्यंत अनेक देशांतल्या संभावित मारेकऱ्यांचा इतिहास तपासून पाहण्यात आला. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इन्स्पेक्‍टर थॉमस नावाच्या विश्‍वासू अधिकाऱ्याला कामाला लावलं. चार्ल्स कॅलथ्रॉप हे एक संशयित नाव ब्रिटिश तपासात पुढं आलं. चार्ल्स कॅलथ्रॉप. (Charles Calthrope). दोन्ही नावांची पहिली तीन अक्षरं उचलली की होतं CHACAL. - फ्रेंच भाषेत चॅकल म्हणजे जॅकल JACKAL. कोल्हाच. 

कॅलथ्रॉपच्या घरी धाड पडली. अर्थात तो घरात नव्हता. कुठं गेला होता? कुणाला माहीत नव्हतं. काय करतो? कुणास ठाऊक. काळजीत भर आणखी एका खबरीनं पडली. पॉल ऑलिव्हर डुग्गन नावाचा पासपोर्टधारक फ्रान्सच्या भूमीवर उतरला होता आणि त्याच नावाचं एक दोन वर्षांचं पोरगं मृत पावलं होतं. 

...संकट अगदी जवळ आल्याचं हे चिन्ह होतं.

* * *

-फ्रान्सच्या एका रम्य उपनगरातल्या हॉटेल ग्रास्सीमध्ये पॉल ऑलिव्हर डुग्गन उतरला. तिथं राहणाऱ्या एकुटवाण्या बॅरोनेस कोलेत दे मोम्पेलिएला तो आधार वाटला. तोवर फ्रेंच पोलिस डुग्गनच्या मागावर निघालेलं होतंच. पोलिस हॉटेल ग्रास्सीमध्ये पोचले तेव्हा डुग्गननं नुकताच मुक्‍काम गुंडाळला होता. त्या माणसाबद्दल काहीही माहिती नसल्याचं बॅरोनेसनं सांगितलं. बॅरोनेसच्या खोलीतल्या उष्ण बिछान्याकडं अर्थपूर्ण नजर टाकून लेबेल वेगानं निघाला. डुग्गनची गाडी नादुरुस्त झाल्यानं तो हॉटेलवर परतला, तेव्हा बॅरोनेसनं त्याला पोलिस त्याच्या मागावर आहेत हे सांगितलं; पण ‘काळजी करू नकोस, मी तुझ्याबद्दल कुणाला काही सांगणार नाही...’ असाही दिलासा दिला. उत्तरादाखल डुग्गननं तिचा गळा घोटला.

बॅरोनेसची गाडी घेऊन डेन्मार्कचा एक पाद्री नामे पेर लुंडक्‍विस्ट तुले रेल्वे स्थानकावर आला. त्यानं पॅरिसची गाडी पकडली. लेबेलच्या माणसांना स्थानकावर चौकशी करताना कळलं की एक डेन्मार्कचा पाद्री प्रवासात आहे. पॅरिस स्थानकावर सापळा लावला गेला; पण तिथूनही तो पाद्री सटकला. पॅरिसमधली सगळीच हॉटेलं पाळतीवर होती; पण तो संशयित पाद्री एका तुर्की स्नानगृहात शिरला. या आलिशात स्नानगृहात सगळ्याच सोई असतात. एका फ्रेंच समलिंगी इसमानं त्याला ‘हेरला’ होता; पण पोलिस एका धर्मोपदेशकाला शोधताहेत, हे कळल्यानं त्याला मुक्‍ती द्यावी लागली...

* * *

आपल्याचकडून कुठंतरी माहितीची गळती होते आहे, हे न कळण्याइतका लेबेल दूधखुळा नव्हता. कर्नल सांक्‍लेअर आणि पोलिस आयुक्‍त बर्तिए यांच्या व्यतिरिक्‍त आणखी कुणाकुणाला आपल्या गुप्त मोहिमेची माहिती आहे? लेबेलनं शेवटी गपचूप सगळ्याच व्हीआयपींचे फोन टॅप करायला सुरवात केली. त्यात गुन्हेगार सापडला. कर्नल सांक्‍लेअर यांची मैत्रीण डेनिस ही ओएएसची हेर होती. व्हाल्मीला सगळ्या खबरा तीच द्यायची. कारण, नाजूक क्षणी कर्नल सांक्‍लेअर सगळं काही वेड्यासारखं तिला सांगून टाकायचा. 

हे कळल्यावर सांक्‍लेअरनं गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. डेनिसच्या फोन कॉलवरून कळलं की मारेकरी पॅरिसमध्ये पोचला आहे. आणखी दोन दिवसांनी २५ ऑगस्ट. म्हणजे फ्रान्सचा स्वातंत्र्यदिन. या दिवशी नाझींच्या विळख्यातून फ्रान्स सुटला होता. द गॉल हे तर दुसऱ्या महायुद्धातले वीरशिरोमणी होते. त्या दिवशी ते सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणारच. पब्लिकमध्ये मिसळणारच. याच दिवशी जॅकल त्यांना लक्ष्य करणार, हे लेबेलनं ताडलं. तसंच घडलं. आता सगळं काही दैवावर अवलंबून आहे. सुरक्षाव्यवस्था कडक करणं एवढंच पोलिसांच्या हाती उरलं.

...एका विशाल चौकात समारंभाची तयारी झाली होती. युद्धवीरांना पदकं बहाल करण्यासाठी द गॉल स्वत: येणार होते. चौकातल्या इमारतींवर कडेकोट बंदोबस्त होता. एक युद्धवीर कुबड्या सांभाळत इमारतीपाशी आला. तो त्या इमारतीतच राहणारा होता, असं त्याची कागदपत्रं सांगत होती. त्याला सोडण्यात आलं. वरच्या मजल्यावर आल्यावर त्या युद्धवीरानं कुबडीत दडवलेली बंदूक भराभरा काढली. खिडकीतून नेम साधून तो वाट पाहत राहिला... त्याची पहिली गोळी चुकली. द गॉल नेमकं काही बोलण्यासाठी खाली वाकले. दुसरी गोळी भरणार इतक्‍यात लेबेल आणि त्याचा साथीदार खोलीत शिरले. जॅकलनं लेबेलच्या साथीदाराला उडवलं. तिसरी गोळी तो भरणार इतक्‍यात लेबेलनं साथीदाराची मशिनगन उचलून त्याच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला.

हे प्रकरण इतकं गुप्त ठेवण्यात आलं की ते कधीही बाहेर आलं नाही.  ...पण यानंतर एक घटना अशी घडली की सगळेच हादरले. ब्रिटनमधला तो चार्ल्स कॅलथ्रॉप चक्‍क आपल्या घरी परतला आणि घराची तपासणी बघून भडकला. तो खराखुरा चार्ल्स कॅलथ्रॉप होता. जॅकल कोण होता? इतिहासाला ते आजही माहीत नाही.

* * *

े-फ्रेडरिक फॉरसाइथ हे पेशानं मुक्‍त पत्रकार होते. पूर्वाश्रमीचे एअरफोर्स पायलट, धाडसी प्रवासी आणि त्यात पत्रकार; पण बारमाही कडकीला कायम वैतागलेले. नायजेरियातल्या बायफ्रान संघर्षावर खूप खपून मेहनत करून त्यांनी ‘द बायफ्रा स्टोरी’ हे माहितीपर पुस्तक लिहिलं; पण ते कुणीही उचललं नाही. मग त्यांनी १९७० च्या जानेवारीत ४० दिवसांत ही कादंबरी लिहून काढली ः द डे ऑफ द जॅकल. ही कादंबरी तडाखेबंद विकून सगळी कर्ज फेडू, असा त्यांचा भाबडा आशावादही फोल ठरला. कारण, वर्षभर कुठल्याही प्रकाशकानं ही कादंबरी स्वीकारलीच नाही. तेव्हा द गॉल हयात होते; पण त्याच वर्षी नोव्हेंबरात ते गेले आणि हचिसन कंपनीनं फक्‍त आठ हजार प्रती काढण्याची तयारी दाखवली. हळूहळू बोलबाला झाल्यावर अमेरिकेतल्या व्हायकिंग प्रकाशन संस्थेनं साडेतीन लाख डॉलर्स मोजून तिचे हक्‍क विकत घेऊन कादंबरी तुफान खपवली. आज मितीस तिच्या कोट्यवधी प्रती खपल्या आहेत.

या कादंबरीवर आधारित चित्रपट काढायचं दिग्दर्शक फ्रेड झिनरमननं ठरवलं, तेव्हा त्यानं मुद्दाम नवखा नटच घ्यायचं ठरवलं. त्यानुसार एडवर्ड फॉक्‍स याची निवड झाली. परिणाम एवढाच झाला, की चित्रपट धड काही चालला नाही! पण त्याची बांधणी कमालीची घट्ट आहे. संवाद अगदी मोजके. सुरवातीची पाचेक मिनिटं सोडली तर संपूर्ण चित्रपटात पार्श्वसंगीत असं नाहीच. पार्श्वध्वनी तेवढे आहेत. एक अभिजात थरारपट म्हणून जाणकारांची दाद मात्र भरपूर मिळाली. उंदरा-मांजराचा खेळ हा एक बेष्ट फॉर्म्युला आहे, हे हॉलिवूडच्या ध्यानात आलं. मग अशा चित्रपटांची रांग लागली. अगदी दाक्षिणात्य माम्मुटीनंही याच कथेवर आधारित १९८८ मध्ये ‘ऑगस्ट१’ हा मल्याळी चित्रपट केला. हॉलिवूडमध्येही ‘जॅकल’ नावाचा आणखी एक बिग बजेट सिनेमा येऊन गेला. त्यातला जॅकल होता ‘डायहार्ड’वाला ब्रूस विलिस.

इतका जुना आणि गाजलेला सिनेमा; पण टीव्हीवर फारसा का लागत नाही? कोण जाणे. चांगला चित्रपट असूनही फूटपाथवरल्या नवलिकेसारखंच त्याचं नशीब निघालं. कितीही बेस्टसेलर झालं, तरी शेवटी हयात फूटपाथवरच जायची. चलता है.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा