raj jadhav
raj jadhav

पेंडिंग सपनों का बोझ (राज जाधव)

आवड, शिक्षण आणि नोकरी या तीन गोष्टी कधीच जुळून येत नाहीत. स्वप्नांचं ओझं आयुष्यभर कायम राहतं. "पेंडिंग सपनों का बोझ' मांडणारी "लाखों में एक' ही वेब सिरीज याच गोष्टीवर नेमकं भाष्य करते. आकाश नावाच्या एका मुलाच्या आयआयटीमधल्या कोचिंग क्‍लासची गोष्ट सांगताना इतरही अनेक प्रश्‍न मनात उपस्थित करणाऱ्या या सिरीजविषयी...

नोकरी आणि छंद सांभाळत आपण प्रत्येक जण काही प्रमाणात दुहेरी आयुष्य जगत असतो- "स्प्लिट पर्सनॅलिटी' असल्यासारखे. एक इतरांसाठी आणि दुसरे स्वतःसाठी. फॉर्मल इस्त्री केलेला टिपटॉप ड्रेस, ट्राऊझर, चकाचक ब्लॅक शूज, चापूनचोपून बसवलेले केस आणि क्‍लीन शेव्ड चेहरा हा ऑफिशियल लूक कितीही भुरळ पाडणारा असला, तरी काही लोकांसाठी हा पेहराव कैदखाना आणि त्यावर लटकवलेली टाय हा कॉर्पोरेट गळफास वाटत असेल, याची कल्पना किती जणांनी केली असेल? अर्थात याला सर्वस्व मानून मनापासून कामाला वाहून घेणारेही आहेत; पण काही लोक यालाही अपवाद असतात. एखादं प्रेझेंटेशन चालू असताना एखादी कवितेची ओळ सुचते, ती कुठं लिहिता येत नाही, रिव्ह्यू मीटिंगच्या दरम्यान एखादं गाणं नकळत गुणगुणलं जातं, ते कशातलं असावं याबद्दल उत्सुकता दाटून येते; पण ते बाजूला सारून समोर चालू आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. असं दुहेरी आयुष्य सांभाळत, दोन्ही बाजूंचा तोल सावरत, दोन्ही कामांशी प्रामाणिक राहत समतोल साधताना जीव दमून जातो. आज किती लोक स्वतःला काय हवं आहे, हा विचार न करता घरच्यांच्या भविष्याची तरतूद व्हावी किंवा समाज काय म्हणेल या भीतीनं नाईलाजानं नऊ ते पाचची नोकरी करतात. उराशी जपलेली कितीतरी स्वप्नं कुठं तरी माळावर अशी बांधून ठेवली जातात, की त्याकडे ढुंकूनही पहायची देखील फुरसत होत नाही.

सध्या ही परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली असली, तरी सध्या तिशीत असणारी बरीच मंडळी याची झळ सोसणारी शेवटची पिढी आहे असं म्हणता येईल. त्या वेळी मुलाला करिअर निवडीचे दोनच पर्याय असायचे, इंजिनिअर आणि डॉक्‍टर. शिवाय मुलानं इंजिनिअर होणं हा बापाच्याही रेप्युटेशनचा प्रश्न असायचा, त्यापेक्षा कमी म्हणजे शक्‍यच नाही. बऱ्याचशा मध्यमवर्गीय घरात अजूनही बापाचा शब्द शेवटचा मानला जातो, इतर सदस्यांना पटो अथवा नाही. बऱ्याचदा पालक आपली स्वप्नं मुलांवर लादू पाहतात. स्वतः जे करू शकले नाहीत ते आपल्या मुलांनी करावं अशी अपेक्षा असते त्यांची. अशीच एक कथा आहे "लाखोंमे एक' या वेब सिरीजमधल्या आकाशची.
आकाश गुप्ता- रायपूरच्या मध्यमवर्गीय घरात राहणारा, अभ्यासात साधारण असणारा मुलगा. मिमिक्री करणं हा त्याचा आवडता छंद. मिमिक्रीचे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करून फेमस व्हायची त्याची इच्छा असते. आकाश बोर्डाच्या परीक्षेत केवळ 55 टक्के घेऊन पास होतो आणि स्वतःच्या कुवतीनुसार कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं ठरवतो. पहिल्या दोन लिस्टमध्ये त्याचं नाव नसतं; पण पुढं काहीतरी होईल, अशी आशा असते; पण त्याच्या वडिलांचं स्वप्न वेगळं आहे. त्याला आयआयटीसाठी तयार करून इंजिनिअर बनवण्याचं. त्यासाठी त्यांनी परस्पर त्याची ऍडमिशन विशाखापट्टणम इथल्या एका आयआयटीच्या कोचिंग सेंटरमध्ये केली आहे. आकाशकडं विशाखापट्टणमला जाण्याशिवाय काही पर्याय नसतो. तिथं जाऊन तो "जिनियस इन्फिनिटी' या नावाजलेल्या कोचिंग सेंटरमध्ये दाखल होतो. तिथं ग्रेडनुसार "ए' आणि "डी' बॅच असतात. आकाशला अर्थातच "डी' बॅचमध्ये प्रवेश मिळतो आणि मग सुरू होतो कुवतीपेक्षा बोजड स्वप्नांना काबीज करण्यासाठीच्या धडपडीचा प्रवास.

"डी' ही नेहमी दुर्लक्षित असलेली बॅच. तिथं शिकवणारे शिक्षकही, बॅच "ए'च्या तुलनेत अगदीच साधारण असतात, "डी' च्या पाठडीतलेच. ना तिथल्या शिक्षकांना शिकवण्यात रस असतो ना विद्यार्थ्यांना शिकण्यात. आकाशच्या रूममेट्‌सचंही हेच रूटिन आहे. मस्ती करण्यात दिवस ढकलायचे आणि परीक्षा असेल तेव्हा कॉपी करून पास व्हायचं. सुरुवातीला मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करणारा आकाश, सर्व प्रकारे प्रयत्न करूनही हातात काही येत नाही म्हटल्यावर त्यांच्या संगतीत तेच करू लागतो आणि हळूहळू तो चुकीच्या पद्धतीनं टॉपर बनतो.

त्याची अपवादात्मक प्रगती पाहून प्रिन्सिपल त्याला "ए' बॅचमध्ये शिफ्ट करतात आणि आता आपण लक्षपूर्वक अभ्यास करून आपलं (?) स्वप्न पूर्ण करू असा ठाम निर्णय तो घेतो; पण परिस्थिती सुधरत तर नाहीच पण अजूनच अवघड बनत जाते. तिथल्या विद्यार्थ्यांच्या मेंदूशी आणि शिक्षकांच्या शिकवण्याच्या वेगाशी जुळवून घेणं त्याला दिवसेंदिवस अजूनच अवघड बनत जातं. ही आपली वाट नाहीये, हे त्याला कळून चुकतं; पण तिथून निघणं सोपं नसतं...

आयआयटी/ इंजिनियर झालेला प्रत्येक जण या कहाणीशी कनेक्‍ट होऊ शकेल; पण त्याहीपेक्षा आपली स्वप्नं बाजूला ठेवून केवळ उदरनिर्वाहाचा प्रश्न म्हणून नाईलाजानं नोकरी करणाऱ्या लोकांना ही सिरीज जास्त भिडू शकेल. "तारे जमींपर'नं असंच मुलांवर कोवळ्या वयात नकळत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आणि "एव्हरी चाइल्ड इज स्पेशल' हा सुंदर संदेश अधोरेखित केला. यात आमिरनं साकारलेल्या निकुंभ सरांचा प्रत्येक युक्तिवाद पटत असला, तरी बाप असलेला नंदकिशोर अवस्थीही पूर्णतः चुकीचा नव्हता. सध्याच्या युगात चाललेल्या "रॅट रेस'मध्ये आपला मुलगा मागं पडू नये, हा विचार केला तर काय चुकलं? आमिरच्याच "थ्री इडियट्‌स'नं याही पुढं जाऊन "लायक बना, यशस्वी व्हाल' हा नारा गाजवला. "मुलांना शिक्षणाच्या तराजूत तोलण्यापेक्षा त्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे पाहा. त्यांना अहोरात्र केवळ गरजा भागवणारी मशीन न बनवता, त्यांची आवड कशात आहे ते पाहणं गरजेचं आहे,' हे पटवून दिलं.

ऋत्विक साहोरनं साकारलेल्या आकाशची सहानुभूती वाटते. "दंगल'मध्ये इम्प्रेस केल्यानंतर इथंही त्यानं प्रॉमिसिंग काम केलं आहे. सुरवातीला काही प्रसंगांत हसवणारा आकाश, तितक्‍याच ताकदीनं इमोशनल सीन करतो हे विशेष. आकाशचे हॉस्टेलमधील रूममेट्‌स "बकरी' आणि "चुडैल' हेदेखील जीवाला जीव देणारे, टिपिकल मित्र आहेत. आकाशाचे आई-वडील अगदी मध्यमवर्गीय म्हणून शोभावेत असे. जीव लावणारी, काळजी करणारी आई आणि दरारा वाटावा असा, प्रॅक्‍टिकल बाप. "स्टॅंड-अप कॉमेडी'मध्ये नाव कमावल्यानंतर बिस्वा कल्याण रथ यानं या सिरीजच्या निमित्तानं, तो इमोशनल विषयही हाताळू शकतो, हे सिद्ध केलं आहे. यात तो स्वतःही एका प्रोफेसरच्या भूमिकेत आहे. कॉलेज प्रिन्सिपलच्या भूमिकेत, शिवकुमार सुब्रमण्यम हा नावाजलेला चेहराही दिसतो; पण काही विशेष छाप पाडत नाही.

एक उत्तम विषय असून आणि सुरवात चांगली होऊनही मध्यंतरानंतर सिरीज थोडीशी भरकटते, अपेक्षा उंचावून शेवटी काहीशी निराश करते. हॉस्टेलमधला क्‍लायमॅक्‍स, शेवटी आकाशनं घेतलेला निर्णयही बऱ्यापैकी प्रेडिक्‍टेबल वाटतो. तरीही इंजिनिअरिंगसाठी राबलेल्या आणि हॉस्टेल लाइफ एन्जॉय केलेल्या प्रत्येकाला ही सिरीज नॉस्टॅल्जिक करेल.

आयुष्यात आपल्याला काय करायचंय? कशात रस आहे? कोणत्या क्षेत्रात काम करायला मनापासून आवडेल, हे कळेपर्यंत आपण ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडून, पोटापाण्यासाठी एखादी नोकरी शोधून, लग्न वगैरे करून, फिजिकली सेट्‌ल झालेलो असतो; पण तो जो एक मेंटल ब्लॉक असतो, तो कायम तसाच राहतो, जो अधूनमधून नियमित बाहेर डोकावत राहतो, आपल्याशी संवादतो. आयुष्याच्या ट्रेनमध्ये एकदा बसलो, की अनेक मोहावणारी स्टेशन्स येत राहतात; पण ती खिडकीतून बघण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसतं. हा, एखाद्या थांब्यावर काही काळ ट्रेनमधून उतरून तात्पुरतं रमता येतं इतकंच; पण वेळीच पुन्हा ट्रेनमध्ये चढणं भाग असतं. अखेरच्या मुक्कामाची वाट न बघता आपल्याला हव्या त्या थांब्यावर गाडी आली असता चेन ओढायची हिंमत काही आपल्यात येत नसते....हे ज्याला जमलं, त्याचा खरा प्रवास सुरू झाला म्हणायचा. बाकी, मागं राहणारे खिडकीच्या गजाआडून पळती झाडं पाहत राहणार, कायम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com