नवमाध्यमांचं ‘बाळ’कडू (शोभा भागवत)

shobha bhagwat article
shobha bhagwat article

मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट अशी माध्यमं रोज बदलत आहेत, नवनवी रूपं धारण करत आहेत. मात्र, त्यांच्या वेगाशी, बदलांशी पाल्यांची सांगड कशी घालून द्यायची हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ‘गॅजेटमुक्त’ केलं तर मित्रमंडळींच्या तुलनेत मुलं मागं पडतील का, किंवा टीव्ही त्यांच्या मनासारखा बघू दिला तर ती ‘वाया’ जातील का, असे प्रश्‍न पालकांसमोर आहेत. एकीकडं बालचित्रपट, बालनाट्यं यांचं प्रमाण कमी झालेलं असताना रंजनाच्या नव्या ‘अवतारां’चा मुलांवर दुष्परिणाम होईल का? नव्या माध्यमांचा सकारात्मक उपयोग कसा करायचा?...मंगळवारी (ता. चौदा नोव्हेंबर) साजऱ्या होणाऱ्या बालदिनाच्या निमित्तानं बालक-पालकांशी संबंधित अनेक प्रश्‍नांबाबत चर्चा.

सध्या लहान मुलं ‘बाहुबली’च्या प्रेमात आहेत. त्याच्यासारखी तलवार घेऊन, चिलखत घालून, ढाल घेऊन जोरदार उड्या मारणं, धावणं घरात चालू असतं. एक मुलगा आईला म्हणाला ः ‘‘मला लवकर मोठं व्हायचंय आणि ‘युद्ध’ करायचंय.’’ हाच मुलगा ‘हिरोशिमा डे’ला ‘‘बॉम्ब नको, युद्ध नको, आम्हाला शांती हवी,’’ अशी शपथही घेतो. काही काळांनी तो हे दोन्ही विसरून जातो आणि तिसऱ्याच कुठल्या तरी हिरोच्या प्रेमात पडतो.

मुलांना हिंसा ही गंमत वाटते आहे. त्यामुळंच त्यांचे खेळ हिंसक होत चाललेत. मुलांची भाषा, त्यांचे शब्द, आविर्भाव, हिंसक होत आहे. आपण जे निर्माण करतो आहोत, त्यामुळं मुलांच्या मनावर काय परिणाम होईल याची टीव्ही, चित्रपट, इंटरनेट, जाहिराती अशा नवमाध्यमांना चिंता नाही, फिकीर नाही. कारण मूल कुणाला कळलंय? आणि मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे?

मुलांचा विचार करायचा फक्त बालदिनाला. तोही त्यांना काही वस्तूंचं वाटप केलं, की आपली जबाबदारी संपली. केला बालदिवस साजरा. ‘‘पैशांसाठी वाट्टेल ते,’’ हे सगळ्या समाजाचंच सूत्र बनलं आहे. नवमाध्यमं का मागं राहतील? मुलांना वाईट कार्यक्रम दाखवू नका असा कोणी पालकांना सल्ला दिला, तर पालक म्हणतात ः ‘‘आम्ही थांबवू शकत नाही मुलांना. ती बघतातच.’’ त्यातून ती अस्वस्थही होतात. मुलांवर आणि मोठ्यांवरही नकळत अनेक परिणाम माध्यमं करतात. त्यातून माणसं नाटकी बोलायला लागतात. किंचाळून बोलतात. त्यांचे विचार, भाषा, पोशाख, अभिव्यक्ती सगळ्याला माध्यमं वळण लावतात. किती भडकायचं, कसा राग व्यक्त करायचा तेही नकळत माणसं टीव्ही, चित्रपटांतून शिकतात.

एकीकडं पर्यावरणरक्षणासाठी सबंध आयुष्य घातलेली माणसं आपण पाहतो आणि दुसरीकडं टीव्ही पुनःपुन्हा आपल्यावर काय आदळत राहतो? ‘हे सॉस खा’, ‘हा जॅम खा’, ‘हे सूप प्या’, ‘त्या नूडल्स खा’, ‘ही चॉकलेट्‌स आणा’, ‘ते त्रिकोण खा’, ‘डायपर्स आणा’ वगैरे वगैरे. हे सगळं वापरणं, खाणं, फेकणं, पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न फुकट घालवणार आहे, ही साधी बाब दुर्लक्षितच राहते.
तरुण मुलं मोबाईल वापरतात. मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या मोबाईलवर गप्पा चालतात. पालक फतवा काढतात. आठ वाजता मोबाईल पालकांकडं द्यायचा. त्यावर भांडणं होतात. तान्ही बाळंसुद्धा मोबाइलकडं एकटक पाहतात आणि काढून घेतला मोबाइल तर आकांततांडव!

सहविचार, माध्यमशिक्षणाची  गरज
आपण मुलांना जबरदस्तीनं आज्ञा पाळायला लावतो; पण त्यांच्याबरोबर सहविचार करत नाही. मुलांना मार देण्यावर आपला विश्‍वास असतो. त्यांना तडातडा बोलण्यावर विश्‍वास असतो; पण त्यांना माध्यमांचं शिक्षण देण्याविषयी आपण विचार करत नाही.
पूर्वी राजपुत्रांचं शिक्षण गुरुगृही का होत असे? राजवाड्यात शिक्षण होणं शक्‍य नव्हतं. म्हणून गुरुकुलात मुलं शेती करत, गुरं सांभाळत, सर्व कामं करत आणि त्याबरोबर अध्ययन करत. गुरुकुलातले ऋषी-मुनी म्हणजे शिक्षक नव्हते. त्यांची दिनचर्या वेगळी चालू असे. ते विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देत. परीक्षा घेत. पण शाळेत शिकवल्याप्रमाणं नाही.
आज आपण घरांचेच ‘राजवाडे’ करण्याच्या मागं आहोत का? आपल्या राजपुत्रांच्या, राजकन्यांच्या जीवनात भरपूर करमणूक आहे. खायला पिझ्झा, बर्गर, आईसक्रीम आहे, मोबाइल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, टॅब्लेट आहे, एमपीथ्री आहे, त्यांना अभ्यास बोअरिंग वाटला तर नवल ते काय?
माध्यमांचा परिणाम स्वप्रतिमेवरही होतो. चित्रपटात टीव्ही मालिकांमध्ये ज्या प्रकारचे कपडे मुली घालतात, तसे आपण आपल्या रोजच्या वातावरणात घालावेत का? टीव्हीसारखे ड्रेसेस घालण्याचा हट्ट मुलं धरतात, त्यांना पालक विरोध करतात आणि मुलं तर हट्ट सोडत नाहीत. गेल्याच्या गेल्या पिढीत पालक सांगत ः ‘चित्रपट घरात आणायचा नाही. तिथंच सोडून यायचा.’ आता मुलांना हे पटतच नाही. ती जणू कायमच माध्यमांच्या जगात जगत असतात.

माध्यमांचा वेगळा विचार
मध्यंतरी नाशिकच्या अभिव्यक्ती संस्थेनं ‘माध्यम-जत्रा’ केली होती. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आम्ही पुण्याच्या गरवारे बालभवनात ‘माध्यम-जत्रा’ केली. मुलांना माध्यमांची डोळस ओळख करून देण्याचा तो प्रयोग होता. त्यात एका स्टॉलवर वर्तमानपत्रं लावली होती आणि येणाऱ्याला एकेक टिकली दिली होती. ‘रोज तुम्ही वृत्तपत्रांतलं काय, सर्वांत जास्त वाचता त्यावर टिकली लावा,’ असं सांगितलं होतं. कुणी बातम्यांवर, तर कुणी जाहिरातीवर टिकली लावत होते. एका मुलीनं तर शाहरूख खानच्या गालावर टिकली लावली.

‘जाहिरातींची गंमत करा,’ असा एक खेळ होता. फुगवलेल्या पाकिटांमधून येणाऱ्या वेफर्सवर एका मुलानं लिहिलं ः ‘पैसे द्या मूठभर, वेफर्स घ्या चिमूटनभर.’’ ज्या वस्तूची कधी जाहिरात होत नाही, त्या शहाळं, हॅंगर, सेफ्टी पिन इत्यादींच्या जाहिराती मुलांनी करून लावल्या. एका चित्रपटाचा शेवट मुलांना दाखवला आणि तो कसा बदलाल, असा प्रश्‍न होता. मुलांनी त्यातले चुकीचे संदेश आणि चुकीची दृष्टी ओळखून शेवट बदलून दिला. ‘काय खावं- काय प्यावं- काय टाळावं,’ यात अनेक मांडलेल्या गोष्टी पाहून  मुलांनी त्यातून सुकी भेळ, राजगिरा वड्या, खजूर, शेंगदाणा चिक्की असे पदार्थ निवडले. शेवटी होता ‘सपना-बझार!’ त्यात अनेक गोष्टी मांडल्या होत्या. चॉकलेट्‌स, मॅगी, पेन्स, पाणी, कोल्ड्रिंक इत्यादी इत्यादी. प्रत्येक मूल खरेदी करून आलं, की त्याला तीन खोकी दाखवली जात. एकावर ‘गरज’ लिहिलं होतं. दुसऱ्यावर ‘सोय’ आणि तिसऱ्यावर ‘चैन’ लिहिलं होतं. जेव्हा आपण पाच रुपयांच्या पेनऐवजी पन्नास रुपयांचं पेन निवडतो, तेव्हा आपण ‘चैन’ करत असतो. मुलं नवे-नवे शोध लावत होती. शंभर रुपयांची खरेदी करा असं सांगितलं होतं, तर त्यांनी पाचशे रुपयांची केली. प्रश्‍न असा होता, की शंभर रुपये घेऊन जाऊन पाचशे रुपयांचा माल कोण देईल? तेव्हा मुलांची उत्तरं होती ः ‘आम्ही क्रेडिट कार्ड वापरू,’ ‘आमचा दुकानदार खात्यावर लिहून ठेवतो.’

एक मुलगा कॅडबरीची तीन पाकिटं घेऊन आला. ‘गरज’, ‘सोय’, ‘चैन’ या तिन्ही खोक्‍यांत एकेक पाकीट टाकलं आणि म्हणाला ः ‘‘भूक लागली, की ती माझी ‘गरज’ असते. सहलीला नेतो तेव्हा ‘सोय’ असते आणि घरी टीव्ही बघताबघता मजेत खातो तेव्हा ‘चैन’ असते.’’

एक मुलगी मॅगी नूडल्सची पाकिटं घेऊन आली आणि ती सगळी तिनं ‘गरज’मध्ये टाकली. तिला विचारलं तर ती म्हणाली ः ‘‘माझ्या आईचं नुकतंच निधन झालं. बाबांना अजून स्वयंपाक येत नाही. मलाही येत नाही. त्यामुळं सध्या ही आमची ‘गरज’ आहे.’’ सध्याच्या माध्यमविस्फोटाच्या जगात ही मुलं रोज जेवताना-खाताना-बाजारात असा विचार करतील का? ‘चैनीकडून गरजेकडं’ त्यांचा प्रवास व्हावा हाच हेतू असला पाहिजे.

चित्रपट रसग्रहण वर्ग हवेत
माध्यमांचं शिक्षण अभिनव पद्धतीनं करण्याचा ‘माध्यम-जत्रा’ हा सफल कार्यक्रम झाला. असंच प्रशिक्षण इतरही काही माध्यमांसाठी देता येईल. पाचवीपासून शाळाशाळांतून चित्रपट रसग्रहण वर्ग सुरू करायला हवेत. लहान मुलांसाठी असलेले किंवा मोठ्यांचे चित्रपट असूनही लहान मुलांच्या विचारांना, कल्पनाशक्तीला वाव देणारे असे चित्रपट उलगडून दाखवायला हवेत.

मोबाईल आणि आपण
वस्तू जेवढ्या वैयक्तिक वापराकडं वाटचाल करतील, तेवढ्या त्या पर्यावरणाला हानीकारक होतील, हे तर स्पष्टच आहे. घरात लॅंडलाइन फोन असला आणि ते सगळे वापरत असले तर त्यावर कुणाला फार खासगी बोलता येत नाही. मात्र, मोबाईल आला, की चार माणसं चार दिशांना तोंड करून स्वतःचं खासगी बोलत राहू शकतात आणि एकमेकांपासून दूर जातात. अर्थात मोबाईलचे चांगले उपयोग पुष्कळ आहेत, हे कुणीही मान्य करेल; पण केवळ वैयक्तिक मजेसाठी, चैनीसाठी तो वापरला जातो आहे. तो दुरुपयोग आहे. मुलांना या सगळ्या गोष्टी वापरण्यातल्या ‘तारतम्याचं बाळकडू’ पालकांनी, शिक्षकांनी वेळोवेळी द्यायला हवं.  

हेही जाणवतं आहे, की कोणतीही गोष्ट नवी असते, तोवर तिच्यावर अनेक दोषारोप होतात. मात्र, ती सरावाची झाली, की तिच्या दोषांकडं काणाडोळा होतो. तसंच मोबाईलचं झालं आहे. मात्र, प्रत्येक वस्तूच्या वापराच्या मर्यादा आपण जाणल्या पाहिजेत. अजूनही कटाक्षानं मोबाईल न वापरणारी मंडळी आहेत. पंखा न वापरणारी, छत्री न वापरणारी मंडळी आहेत. अर्थात त्यांचे व्यवसाय, त्यांची वयं लक्षात घेतली, तर हा सल्ला इतरांना देणं घवघड आहे.

मात्र, मोबाईलपासून सर्वांत धोका आहे तो लहान आणि तरुण मुलामुलींना. त्यांना मोबाईलवरचे खेळ खेळणं हे भलतं आकर्षण असतं. त्यातूनच ‘ब्लू व्हेल’सारख्या दुष्ट खेळाचा सापळा तयार झाला. कुणाच्या तरी ताब्यात गेल्यासारखी मुलं वागली. सांगितलेल्या सर्व अटी पाळत गेली आणि अखेर त्यांचे जीवही. त्या धोकादायक जाळ्यात सापडले. काय वाटलं असेल त्यांच्या पालकांना? वापराच्या अटीही समजावून सांगा अशा घटनामुळे वाटतं, की मोबाईल हातात देण्यापूर्वी त्याच्या वापराच्या अटी मुलांना समजावून द्यायला हव्यात. यातले धोके काय आहेत आणि त्यापासून दूर कसं राहता येईल याची चर्चा आवश्‍यक आहे.  मोबाईलवर गप्पा, इंटरनेटचा वापर हे वाटतं तितकं निष्पाप नाही. त्यातून तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं. तुमच्याशी अतिशय आदरपूर्वक व गोड बोलतात आणि त्यांची मुद्दे तयार असलेली एखादी ‘खेळसाखळी’ तुमच्या गळ्यात घालून तुमचा ताबा घेतला जातो. तुम्ही सावध असाल, वेळेवर त्या गटातून बाहेर पडलात तर वाचलात!

मुलांनी आपला मोकळा वेळ मोबाईल, आयपॅडसारख्या गॅजेट्‌समध्ये न घालवता आजूबाजूला चालू असलेल्या एखाद्या सामाजिक कामात त्यांना सहभागी होता येईल. एकेकटं कशात तरी रमण्यापेक्षा गटांनी काम करणं हे जास्त सुरक्षित, विधायक ठरतं. विशिष्ट वयात शरीरातल्या हार्मोनल घडामोडीमुळं मन अस्वस्थ होतं. स्वभाव हळवा होतो. अस्वस्थता चैन पडू देत नाही. मित्र-मैत्रिणीबद्दल आकर्षण वाटतं. शरीरातले बदल चैन पडू देत नाहीत. अशावेळी विधायक कामात गुंतता आलं पाहिजे. अशा कामात एकत्र येणाऱ्या तरुण-तरुणींची चांगली निरामय मैत्री होऊ शकते. पालक या सगळ्यांत एक दुवा म्हणून काम करू शकतात.

सहशिक्षणाची गरज
शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार मुलांच्या कुमार वयातल्या वागण्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, ‘‘पौगंडावस्थेनंतर मुला-मुलींना अनैसर्गिकरित्या वेगळे ठेवल्यामुळे शरीरशास्त्रीय - मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक असे सर्वच तर्कशास्त्र धुडकावणारी एक कृत्रिम, सामाजिक व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. मानवी इतिहासातली ती सर्वात मोठी विकृती आहे.’’

‘‘सहशिक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारचे काहीही मार्गदर्शक धोरण वा आदेश नाहीत. मुला-मुलींच्या शाळा वेगळ्या करणे हा प्रकार शोचनीय आहे. कारण त्यातून व्यक्तीचं मानवीपण हरवून जातं. जो मुलगा मुलीकडं एक वस्तू म्हणून पाहतो, तो स्त्रीशी मैत्रीचं नातं जोडण्याची संधी नष्ट करतो आणि अशा मैत्रीतून येणारी स्वतःच्या जीवनातली समृद्धीही गमावून बसतो. त्याच्या जीवनात लैंगिक इच्छेचं परिवर्तन जुलूम-जबरदस्तीत होतं. आपली महाविद्यालयं व विद्यापीठं अशा मुलांनी भरलेली आहेत. ‘सहशिक्षण’ हे या समस्येचं उत्तर असलं, तरी ते सोपं नाही. असं पाऊल उचलायचं असेल, तर शिक्षकांच्या प्रशिक्षणातही बदल करावे लागतील. चित्रपट आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक प्रतिमांचा फायदा घेतात. शाळानी स्वतःच्या माध्यमांतून म्हणजे पाठ्यपुस्तकं व इतर साहित्यांतून स्त्री-पुरुषांच्या वेगळ्या प्रतिमा निर्माण करायला हव्यात.’’

नवमाध्यमांचा पूरक वापर
तेव्हा नवमाध्यमांचा विचार करताना इतरही अनेक गोष्टी कराव्या लागतील.
  सहशिक्षण देणाऱ्या शाळा वाढवणं
  माध्यमांचं शिक्षण सर्व स्तरांवर देणं
  पालकशिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू करणं
  माध्यमांनी मुलांचा विचार करून निर्मिती करणं
  समाजानं मुलांचं भान ठेवणं
  शाळांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं.
दर बालदिनाला प्रत्येक संस्थेनं मुलांच्या भल्याचा एक निर्धार करावा आणि वर्षभर तो प्रत्यक्षात आणावा. तरच मुलींची आणि मुलांचीही परिस्थिती बदलेल.

माध्यमांचा असाही विचार ...

  •   ‘डोरेमॉन’सारखी काही कार्टून्स मुलांना दाखवायला हरकत नाही. त्यातून अनेक सर्जनशील कल्पनाही मुलांना मिळतील; मात्र त्याच वेळी ‘प्रत्येक वेळी डोरेमॉन आपल्याला मदतीला येत नसतो बरंका! आपली मदत आपल्यालाच करायला लागते,’ अशा प्रकारच्या गप्पा मारून मुलांना पुन्हा जमिनीवर आणायलाही शिकवा.
  •   मोबाईलवरच्या हिंसक गेम्स का वाईट असतात, हे मुलांना आवर्जून समजावून सांगा. मात्र, त्याच वेळी त्यांना या माध्यमाशीही मैत्री करू देणाऱ्या, तंत्रज्ञानाच्या जगाची चुणूक दाखवून देणाऱ्या त्यांच्या वयाला साजेशा काही गेम्स जरूर खेळायला द्या.
  •   पुस्तकांचे नवे ट्रेंड्‌स कोणते आहेत ते मुलांकडूनच जाणून घेऊन, ती पुस्तकं मुलांना जरूर वाचायला द्या. पुस्तकं विकत घ्या किंवा मुलांना जिथं निवडीसाठी वाव असेल, अशा ग्रंथालयांत आवर्जून नोंदणी करा.
  •   चित्रं काँप्युटरवर काढणं मुलांना आवडतं. मात्र, हातानं चित्र काढण्यातली सर्जनशीलता त्यांना दाखवून द्या आणि काँप्युटरवरच्या तंत्रज्ञानामुळं काय साधता येतं हेही दाखवून द्या.
  •   ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’ अशा सोशल नेटवर्किंग साइट्‌स; क्रेडिट कार्डस, एटीएम मशीन्स अशा गोष्टींशी मुलांचा थेट संबंध नसतो. मात्र, त्याबद्दल ती विचारणा करत असतात. मात्र, अशा वेळी मुलांना झिडकारू नये. ‘तुला काय करायचंय आत्ता’ असे प्रश्‍न न विचारता त्यांना या नव्या गोष्टींचे फायदे-तोटे समजावून सांगा. तंत्रज्ञानाशी संबंधित एखाद्या छोट्या कृतीत मुलांना अधूनमधून सहभागी करून घ्या; मात्र ‘हे सगळं या वयात करण्यासाठीचं नाही,’ याचं भानही वेळोवेळी देत राहा.   
  •   अनेक गोष्टी पारंपरिक माध्यमांद्वारे शिकवता येत नाहीत, अशा वेळी छोट्या दोस्तांसाठी तयार केलेल्या काही वेबसाइट्‌स, काही ॲप्स यांचा आवर्जून वापर करा. संगीत, चित्रं, ॲनिमेशन, रंग, आवाज या सगळ्या गोष्टींचा मिलाफ करणं नव्या तंत्रज्ञानामुळं शक्‍य होत असल्यामुळं अनेक गोष्टी समजायला सोप्या जातात, हेही लक्षात घ्या.
  •   लहान मुलांसाठीचे चित्रपट कमी झाले आहेत, हे खरं असलं, तरी नेटवर जगभरातले अनेक चित्रपट असतात. त्यांचीही ओळख मुलांना करून द्या. काही वेळा पालक त्यांच्यासाठीचे चित्रपट बघायला मुलांना नेतात. त्यापूर्वी तो चित्रपट लहान मुलांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे का, हे कुणाला तरी जरूर विचारा.
  •   टीव्ही, चित्रपट वगैरेंसारख्या दुनियेपासून मुलांना एकदम न तोडता त्यांचा संयमित ‘डोस’ आणि मजा मुलांना जरूर घेऊद्यात.
  •   चित्रपट, टीव्हीची दुनिया एक स्वप्नमय विश्‍व आपल्यासमोर निर्माण करतं. मात्र, हे जग आभासी असतं, याचीही जाणीव मुलांना वेळोवेळी करून देत राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com