'रोलरकोस्टर' डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

Subramanian Swamy
Subramanian Swamy

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे देशाच्या राजकारणातील एक पारदर्शी, पण गूढ व अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व होय. त्यांच्याभोवती कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत प्रसिद्धीचं वलय फिरत असतं. कालचा प्रसंग होता, त्यांच्या पत्नी रोक्‍सान स्वामी यांनी लिहिलेल्या "इव्हॉलिविंग विथ सुब्रह्मण्यम स्वामी- ए रोलर कोस्टर राईड" या पुस्तकाच्या प्रकाशनाचा.

या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात नामवंत विधिज्ञ फली नरिमान, पत्रकार राजदीप सरदेसाई, तवलीन सिंग व रोक्‍सान स्वामी यांनी भाग घेतला. सरदेसाई म्हणाले, "स्वामी यांचे राजकारणात मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. पण मी त्यांचा मित्र बनणेच पसंत करीन. कारण त्यांच्याशी कुणी शत्रुत्व केले, की त्यांच्या मागे ते असे हात धुवून लागतात, की खैर नाही." स्वामी स्वतः म्हणाले, "माझ्यावर कुणी डूख धरली, तर त्याचा मी पाठलाग करतो, तो अगदी अखेरपर्यंत."सध्या त्यांचे लक्ष्य आहे, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम व खुद्द चिदंबरम. "कार्तिला तर तुरूंगात जावे लागेल. त्यानंतर पाळी आहे चिदंबरम यांची" अशीही टिप्पणी त्यांनी केली. 

प्रकाशनाचा समांरभ असला, तरी पुस्तकावरील चर्चा काहीशी बाजूला राहिली, आणि स्वामींच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत झाले. त्यांना देशाचा अर्थमंत्री व्हावयाचे आहे, आणि ती महत्वाकांक्षा त्यांनी लपून ठेवलेली नाही. या प्रसंगी झालेल्या भाषणात त्यांनी ठणकावून सांगितले, "जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी मंत्री होणार, मला जे हवे ते मला मिळणार ( आय विल बिकम मिनिस्टर --व्हेन टाईम कम्स, आय विल गेट, व्हॉट आय शुड गेट). 

"प्रकाशन नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 67 व्या वाढदिवशी (17 सप्टेंबर) झाले, हा योगायोग आहे काय," अशी पृच्छा एकाने केली. 1939 साली जन्मलेल्या स्वामींचं वय 78 आहे. भाजपच्या सक्रीय राजकारणातून मोदी यांनी 75 वर्षांवरील लालकृष्ण अडवानी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी व कलराज मिश्रा यांना निवृत्त केले. त्याला स्वामी अपवाद ठरणार काय? 

रोक्‍सान या मूळच्या पारशी. सुब्रह्मण्यम स्वामी व रोक्‍सान हे दोघेही हार्वर्ड विद्यापिठात शिकत होते. नंतर त्यांचा विवाह झाला अन्‌ दोघेही भारतात परतले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या समाजवादाचा बोलबाला होता. पूर्वाश्रमीचा सोव्हिएत युनियन ही एक महासत्ता होती व भारताचे सोव्हिएत युनियनबरोबर घनिष्ट राजकीय व संरक्षणात्मक संबंध होते. स्वामी यांना खुली अर्थव्यवस्था अभिप्रेत असली, तरी स्वदेशीवर त्यांचा भर होता. मी पस्तीस एक वर्षापूर्वी त्यांना भेटलो, तेव्हा साधा शर्ट व धोतर असा त्यांचा पेहराव पाहिला होता. परदेशातून आलेले स्वामी सूटबुटात नव्हते, तर त्यांच्या विचारसणीवर गांधींजीच्या विचारांचा प्रभाव होता. चेहऱ्यावर सतत स्मितहास्य व मिश्‍किल भाव. हा माणूस सहज कुणाची कशी फिरकी घेईल, सांगता येत नसे. त्यांनी "स्वदेशी"ची चळवळ चालविली होती. त्या काळात त्यांची व रोक्‍सानची दिल्लीतील आयआयटीमध्ये प्राध्यापकपदी नेमणूक झाली. स्वामी यांनी समाजवादावर टीका करणारे विश्‍लेषणात्मक लिखाण सुरू केले. स्वामी म्हणाले,"" काही दिवसातच इंदिरा गांधी यांनी मला बडतर्फ केले. नंतर रोक्‍सानलाही काढून टाकले.दोघांच्याही नोकऱ्या गेल्या. आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकात श्रीमती गांधी व कॉंग्रेचा पराभव होऊन मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे संमिश्र सरकार आले, तेव्हा मोरारजींनी मला भेटीस बोलाविले व आयआयटीमधील नोकरी कशी गेली, असे विचारले. त्याचे उत्तर दिल्यावर त्यांनी तत्काळ पुन्हा त्याच पदावर आयआयटीमध्ये माझी नेमणूक व केली. इकडे आयआयटीचे शासकीय मंडळ दिग्मुढ झाले. काही दिवसांनी मोरारजींनी मला विचारले, की कसे काय चालले आहे. त्यावर मी सांगितले, की ज्यांनी मला पदावरून काढले, ते सारेच शासकीय मंडळात आहेत. मोरारजींनी पूर्ण शासकीय मंडळालाच बरखास्त केले व माझी शासकीय मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक केली!" स्वामी यांच्या या कथनावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. 

रोक्‍सान यांचे पुस्तकात उभयतांच्या आयुष्यातील 1992 पर्यंतच्याच घटनापटाचा तपशील आहे. आणिबाणीत स्वामी यांच्यावर पकड वॉरंट होते. तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते. मी त्यावेळी "सकाळ"साठी राज्यसभेतील कामकाजाचे वार्तांकन करीत असे. एके दिवशी आम्ही पत्रकार कक्षेत बसलो असताना अचानक स्वामी सभागृहात आले, व काही क्षणात निघून गेले. त्यांच्यावर पकड वॉरंट असतानाही ते धाडस करून पोलीस व सुरक्षा यंत्रणेला त्यांनी गुंगारा दिला. ते सभागृहात कसे आले आणि पसार झाले, हेच सुरक्षाधिकाऱ्यांना कळले नाही. ते त्यांना पकडू शकले नाही. नंतर स्वामी यांनी दाढी-मिशा वाढविल्या व पगडी घालून ते शीख म्हणून आणिबाणीच्या काळात वावरले. ही घटना काही महिने देशात गाजत होती. सरकारची नामुष्की झाली, ती वेगळीच. 

स्वामींचा रोख मुस्लिम व अन्य अल्पसंख्याकांवर असतो, अशी सातत्याने टीका होते. त्यात बरेच तथ्य आहे. त्यांची भाषणे चुरचरीत व टोकदार असतात. कुणावर ते दयामाया करीत नाही. या टीकेला उत्तर देताना स्वामी म्हणाले, की मी कोणत्याही धर्मावर डूख धरलेली नाही. ""मी हिंदू, पत्नी रोक्‍सान व गुरू फली नरीमान हे पारशी, माझा जावई मुसलमान. असे असूनही माझ्यावर टीका का होते, हे समजत नाही."" त्यांची कन्या सुहासिनीने माजी परराष्ट्र सचिव सलमान हैदर यांच्या मुलाशी (नदीम) विवाह केला. रोक्‍सानची बहीण कुमी कपाडिया ही "इंडियन एक्‍स्प्रेस"मध्ये स्तंभलेखक आहे. तिचे पत्रकार पती वीरेंद्र कपूर हे पंजाबी. विशेष म्हणजे, वीरेंद्र कपूर हे अर्थमंत्री अरूण जेटली यांचे लंगोटीयार. परंतु, सुब्रमण्यम स्वामी यांचे एक नंबरचे प्रतिस्पर्धी व शत्रू. स्वामींचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न होण्याचे ते एक महत्वाचे कारण होय. एकदा सेंट्रल हॉलमध्ये स्वामी यांची मी भेट घेऊन जेटलींबाबत विचारता, ते म्हणाले होते, ""जेटली यांचे अर्थशास्त्राचे ज्ञान हे डाक तिकिटाच्या मागे जेवढी जागा असते, तेवढेच आहे."" दोघेही उत्तम वकील आहेत. स्वामी म्हणाले, की माझे सारे खटले मी स्वतःच लढवितो. माझे पैसे वाचतात, कारण मला त्याबाबत रोक्‍सान व फली नरिमान यांच्याकडून मिळालेली वकीली व्यवसायाची दीक्षा. स्वामींचे धाकटे बंधू राम स्वामी हे अण्वस्त्र तज्ञ. पण ते एकमेकाशी बोलतही नाहीत. काहीतरी बिनसलय. पण "सुब्रह्मण्यमने अर्थमंत्री व्हायला हवे," असे ते सतत सांगत असतात. 

स्वामी यांनी काही वर्षांपूर्वी स्वतःचा वेगळा जनता पक्ष काढला होता. परंतु, नंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. ते म्हणाले, की राज्यसभेचे सदस्य मिळविण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो नाही, की कुणाची याचना केली नाही. "उलट, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी एके दिवशी बोलावून मला सदस्यत्व देण्याबाबत माहिती दिली. अर्थात मी भाजपचा सदस्य नाही. राष्ट्रपतींनी मला नियुक्त केले आहे. त्याच प्रमाणे भाजपच्या अनेक सदस्यांचा मला पाठिंबा आहे."" स्वामी "एक नंबरचे ट्रबलशूटर" असल्याने त्यांना सारेच वचकून असतात. राज्यसभेत येताच त्यांनी सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यावर जोरदार हल्ले चढविले, त्यामुळे भाजप त्यांच्यावर जाम खूश आहे. तसंच, "नॅशनल हेराल्ड" प्रकरणी झालेल्या अपहाराचे प्रकरण उपस्थित करून सोनिया गांधी यांना कोर्टात खेचणारेही स्वामीच. ऑगस्टा वेस्टलॅंडचे प्रकरण उघडकीस आणणारेही तेच. त्यामुळे हे वेगळेच राजकीय रसायन आहे, याचीही खात्री भाजपला पटलीय. कॉंग्रेसच्या काळातील स्पेक्‍ट्रम घोटाळ्याची लक्तरे वेशीवर लटकविणारे तेच. स्वामी हे केवळ अर्थशास्त्रज्ञ नव्हे, तरी चीनविषयक तज्ञ असून, चीनी भाषा त्याना अवगत आहे. सुमारे 50 हजार लोक त्यांना ट्‌विटरवर फॉलो करतात. 

स्वामींची आणखी एक खासियत म्हणजे, प्रतिस्पर्ध्यांना एकत्र आणण्याचा त्याचा हातोटा. ते राजीव गांधी यांचे स्नेही होते. इंदिरा गांधी यांचा पूर्वग्रह दूर करण्यासाठी राजीव गांधी स्वामींना इंदिरा गांधीकडे भेटायलाही घेऊन गेले होते. स्वामी एकेकाळी सोनिया गांधी व जयललिता यांचे मित्र होते. परंतु, दोन्ही नेत्या एकमेकींच्या कट्टर विरोधक होत्या. 1999 चे दिवस होते.सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होण्यास जयललिता यांनी जाहीर विरोध केला होता. त्यावेळी स्वामी महाशयांनी आम्हाला एक सुखद धक्का दिला. एके दिवशी त्यांचे आमंत्रण आले, "सायंकाळी अशोक हॉटेलमध्ये (पंचताराकित) भोजनास या. जोरदार बातमी मिळेल."आम्ही पोहोचलो, पाहातो तो काय, भोजनाला सोनिया गांधी व जयललिता या दोन्ही उपस्थित होत्या. स्वामींनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो अखेर यशस्वी झाला नाही. आजही ते आणखी एक समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अयोध्येत बाबरी मशिदस्थळावर रामाचे मंदीर बांधण्याबाबत सुरू असलेला तंटा सोडविण्यासाठी ते मध्यस्थ म्हणून प्रयत्नशील आहेत. समारंभादरम्यान, त्याविषयी विचारता स्वामी म्हणाले, "5 डिसेंबर 2017 पर्यंत शिया वाक्‌फ बोर्डाने आपले म्हणणे सादर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. वादग्रस्त स्थळाबाबत फारसी भाषेतील महत्वांच्या दस्तावेजांचे भाषांतर ते करीत असून, डिसेंबरमध्ये ती कागदपत्रे अपेक्षित आहेत." "राम" व "अल्ला"ची इच्छा असेल, तर स्वामी यांना यश मिळेलही. सर्वोच्च न्यायालयानेही "दोन्ही बाजूंनी चर्चेद्वारे वाद सोडवावा," असे मत व्यक्त केले आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com