नाशिक शहरात एक हजार मुलांमागे हजारावर मुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

शहरात मुलींचा जन्मदर वाढल्याचा वैद्यकीय विभागाचा दावा

शहरात मुलींचा जन्मदर वाढल्याचा वैद्यकीय विभागाचा दावा

नाशिक - शहरात गर्भपाताची दोन प्रकरणे उघड झाल्यानंतर महापालिकेच्या सोनोग्राफी सेंटरची सुरू झालेल्या तपासणीचा परिणाम म्हणून मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण तीन महिन्यांत वाढल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला. मार्च ते मे या तीन महिन्यांत मुलींच्या जन्माचे प्रमाण हजाराच्या वर गेल्याची आकडेवारी आज वैद्यकीय विभागाने जाहीर केली. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढल्याचे समाधान असले, तरी वैद्यकीय विभागाने यापूर्वी सोनोग्राफी सेंटर सुरू असल्याचीच कबुली एकप्रकारे दिली आहे. सेंटर तपासणीचे पथकाकडून दुर्लक्ष केले गेले का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

शहरात स्त्री जन्मदराचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९२५ असणे अपेक्षित आहे. डिसेंबरपर्यंत स्त्रीजन्माचे प्रमाण हजार मुलांमागे ८८० मुली, असे होते. जानेवारीपासून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सोनोग्राफी सेंटर तपासणीची मोहीम उघडली. डॉ. लहाडे व डॉ. शिंदे यांच्यावर बेकायदा गर्भपातप्रकरणी गुन्हे दाखल केल्यानंतर गर्भपाताच्या प्रकरणांना ब्रेक लागल्याचा दावा वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी केला. डिसेंबर २०१६ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८८० होता. जानेवारी २०१७ मध्ये एक हजार मुलांमागे ९४०, फेब्रुवारीत एक हजार मुलांमागे ८९४ मुलींचा जन्मदर होता. त्यानंतर मात्र मुलींच्या जन्मदरात वाढ झाली. मार्चमध्ये एक हजार मुलांमागे १११० मुलींचा जन्मदर, एप्रिलमध्ये बाराशे, तर मार्चमध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर अकराशे असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली.

‘बिटको’त अत्यवस्थ महिलेला कन्यारत्न
गैरव्यवहार, रुग्णांची हेळसांड यांसारख्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असलेले नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात आज सकारात्मक घटना घडली. देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालयात अत्यवस्थ ज्योती परदेशी यांची प्रसूती होत नसल्याने तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ज्योती यांची प्रकृती गंभीर होती. रक्तदाब १२० ते १५० असणे गरजेचे असताना, तो ४० ते ८० दरम्यान होता. हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण १.१ होते. रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण १८ हजार प्लेटलेट होते. अशा धोकादायक परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रसूती केली. ज्योती यांना कन्यारत्न झाले असून, आई व बाळाची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले. या कामगिरीमुळे डॉ. सदानंद नायक, डॉ. दिलीप गरुड, डॉ. स्वप्नील राऊत, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. शिल्पा काळे यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डेकाटे यांनी अभिनंदन केले.

गर्भपाताच्या गोळ्यांवर बंदी
बेकायदा गर्भपाताला आळा घालण्यासाठी महापालिका नवीन ॲप्लिकेशन तयार करणार आहे. त्यात डॉक्‍टरांना गर्भपातासंदर्भात गोळी पाहिजे असेल, तर आधी नोंदणी बंधनकारक राहील. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच गर्भपातासंदर्भातील गोळी मिळविता येणार आहे. मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या बंद केल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले.