नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

वन विभागातर्फे नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘इको हट’ची निर्मिती होणार आहे. इथे राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होईल. ग्राम परिस्थिकीय विकास समितीअंतर्गत विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पक्ष्यांना न्याहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.  
- भगवान ढाकरे, वन विभागाचे अधिकारी

नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पावसातही पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्याचा आनंद लुटता येतोय. इथे पाणपक्ष्यांबरोबर गवतावरील पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले वळताहेत. निरीक्षण मनोऱ्यांनी अभयारण्याचे वैभव अनुभवण्यातील रंगत वाढली आहे.

नांदूरमध्यमेश्वरची ‘क्वीन’ जांभळी पाणकोंबडी, बदक, जांभळा बगळा, कमळपक्षी अशा पाणपक्ष्यांप्रमाणेच सुगरण, चिमणी, चातक, स्वर्गीय नर्तक, सातभाई, सनबर्ड, वटवट्या, पोपट, बुशचाट, मुनिया असे गवतावरील पक्षी इथे पाहावयास मिळतात. यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणथळ दूरवर पसरले असून अभयारण्याने हिरवाईची झालर पांघरली आहे. पक्ष्यांबरोबर वनफुले, फुलपाखरे अन्‌ विविध प्रकारचे कीटक दृष्टिक्षेपात येतात. वन विभागाने गाइड आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये गॅलरी, लपणगृह, निसर्ग निवर्चन केंद्र, नेचर ट्रेल, दुर्बीण, टेलिस्कोप, पाण्यासाठी फिल्टर, राहण्याची व्यवस्थेतील टेंट, अतिथीगृह, उपहारगृहाचा समावेश आहे.

अभयारण्यात मुक्कामी पोचलेले पक्षी हे स्थानिक स्थलांतरित आहेत. त्यात चांदवा, धनवर, राखी बगळा, रंगीत करकोचा, गडवाल, कापशी बदक, नकटा बदक आदींचा समावेश आहे. पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाइडही उपलब्ध आहेत.

Web Title: nashik news Nandur Madhyameshwar Sanctuary