ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल

जीवन सोनटक्के
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

या प्रकरणात नियमाप्रमाणे चौकशी झाली आहे. फक्त चुकून नोंद राहून गेली आहे. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदविला असून नियमानुसार पुढील कारवाई'करण्यात येईल.
- सुनील सोळंके, पोलिस निरीक्षक, डाबकी रोड पोलिस स्टेशन.

अकोला : विनयभंगाची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची तक्रार दाखल न करणाऱ्या डाबकी रोड पोलिस स्टेशन येथील महिला तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाविरोधात ठाणेदारांनीच मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

डाबकी रोड पोलिस स्टेशनला खडकी टाकळी येथील ४५ वर्षीय महिला (ता. १७) मार्च रोजी आल्या होत्या. देवराव भारत मेश्राम, महेंद्र देवीदास डोंगरे दोघेही राहणार सिद्धार्थ'नगर, तारफैल यांनी त्यांचा विनयभंग केला असल्याची लेखी तक्रार देण्यास आल्या. परंतु, त्यावेळी ठाण्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक माधुरी शंकरराव गायकवाड सध्याची नेमणूक वर्धा हीने त्यांची तक्रार नोंदविली नाही. तसेच अदखलपत्राचाही गुन्हा नोंदविण्यास टाळले. त्यामुळे ४५ वर्षीय महिलेने गुन्हा दाखल करून घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आठवे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी (ता. २३) ला आदेश दिले. त्या आदेशानुसार डाबकी रोड पोलिस स्टेशनला विनयभंगप्रकरणी देवराव मेश्राम व महेंद्र डोंगरे या दोघांविरोधात विनयभंगाचा व धमकी देणे, मारहाण करण्यावरून गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. तसेच कर्तव्यात कसूर केल्यावरून ठाणेदारांना पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड हिच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्याचे आदेश बजाविले. त्या आदेशानुसार ठाणेदार सुनील जुलालसिंग सोळंके यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री दोन गुन्हे दाखल केले आहेत.

विशेष म्हणजे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत त्यांना न्याय मिळावा व त्यांची तक्रार घेण्यासाठी स्वतंत्र महिला पोलिस अधिकारी ठाण्यात हजर असावी, असे आदेश राज्यभरातील संपूर्ण ठाण्यांमध्ये आहेत. तसे असतानाही तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांनी त्यासंदर्भात हयगय केली असून महिलांना न्याय देण्यास टाळले असल्याने न्यायालयाने हा आदेश दिला असल्याचे बोलल्या जात आहे.

या प्रकरणात नियमाप्रमाणे चौकशी झाली आहे. फक्त चुकून नोंद राहून गेली आहे. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदविला असून नियमानुसार पुढील कारवाई'करण्यात येईल.
- सुनील सोळंके, पोलिस निरीक्षक, डाबकी रोड पोलिस स्टेशन.