मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर

अनुप ताले
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सद्यस्थितीत मानव विकासच्या प्रमुख निर्देशांकामध्ये केवळ रोजगार वाढविणे, कौैशल्यविकास किंवा उद्योजगता येवढाच भाग नसून, विविध बाबींवर विकासात्मक उपक्रम यामध्ये राबविले जातात. यापूर्वीसुद्धा असे उपक्रम आपण राबविले आहेत. ज्याठिकाणी मानव विकास निर्देशांक कमी असतो, अशा ठिकाणी सरकार मदत करते. त्यामुळे जिल्ह्यातील तालुका निवडला जाणे ही अभिमानाची गोष्ट नसून, याठिकाणी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जातील.
- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला

अकोला : मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके विकास कामाच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसह दारिद्र निर्मुलन, शिक्षण, उद्योग आदी विकास कामांवर भर दिला जाणार आहे. पिछाडीवर असलेल्या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याचाही समावेश करण्यात आला असून, येथील विकास कामांच्या आखणीकरिता वित्त व नियोजन मंत्र्यालयाकडून संबधित तालुक्यातील लोकप्रतिनीधी व अधिकाऱ्यांकडून सल्ला मागविण्यात आला आहेत.

मानव विकास कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या १२५ तालुक्यांपैकी निवडक २५ तालुक्यात पहिल्या टप्प्यातील उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, हिंगोली, बुलडाणा, जालना, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या १२ जिल्ह्यांतील तालुक्यांची निवड करण्यात आली आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने, रोजगार निर्मितीसाठी कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असून, त्या माध्यमातून गरीबी कमी करण्याचा प्रयत्न केले जाणार अाहेत. युनायटेड नेशन्सने या कार्यक्रमात राज्य शासनास सहकार्य देऊ केले असून, कार्यक्रमाच्या विविध टप्प्यावर आवश्यक तज्ज्ञ व्यक्तींच्या सेवा त्यांचेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाची संकल्पना, त्यामागील भूमिका लोक प्रतिनिधी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विशद करून त्यांचे सूचना, नवीन कल्पना जाणून घेण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० आॅगस्ट रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. तसेच मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, सोमवार, मंगळवारी मुंबईमध्ये झालेल्या जोरादार पावसामुळे कॉन्फरन्स व बैठक तुर्तास रद्द केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

शिक्षण, कौशल्य, उद्योग, रोजगार, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील विकास कामांवर मानव विकास निर्देशांक ठरविला जातो. ज्या ठिकाणी निर्देशांक कमी येतो, अशा ठिकाणी शासन विकास कामांचे उपक्रम राबविते.