चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

सावली तालुक्‍यामधील कावठी गावातील सुरकर विद्यालयाच्या मैदानावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मूल (जि. चंद्रपूर) : सावली तालुक्‍यामधील कावठी गावातील सुरकर विद्यालयाच्या मैदानावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याची पावले आढळल्याने कावठी गावाच्या आसपास बिबट्या फिरत असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. गावाच्या शेजारी नदी आणि शेतीशिवार असल्याने मागील चार-पाच महिन्यांपासून येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही गावकऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र हुलकावणी देत असल्याचे त्याला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश मिळालेले नाही. गावातील काही जनावरांवरही बिबट्याने हल्ला केला आहे. मागील दीड महिन्यांनंतर पुन्हा एकटा बिबट्याने त्याचे अस्तित्व दाखवून दिले आहे. शाळेजवळ रस्त्यावरील मातीमध्ये अनेक ठिकाणी त्याच्या पावलाचे ठसे सापडले आहेत. पावलांचे ठसे बिबट्याचेच असल्याची खात्री वन्यजीव अभ्यासक उमेश झिरे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

सध्या शेतीची कामे सुरू आहेत. कामानिमित्त ग्रामस्थांना पारडी, रूद्रापूर, हरणघाट आणि सावली मार्गावरील सिंगापूरपर्यंत जावे लागते. मात्र बिबट्यामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी बिबट्याचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.