भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - गडचिरोली जिल्हा भाजपचा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

नागपूर - गडचिरोली जिल्हा भाजपचा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

बावनथडे हा शिक्षक असून एका खासगी बसमध्ये विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करतानाचा व्हिडिओ व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाल्याने त्या विद्यार्थिनीने नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. बावनथडेचा हा प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाला आहे. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर बावनथडे फरार झाला होता. नागभीड पोलिसांनी त्याला मंगळवारला अटक केली.

दरम्यान, बावनथडे याला अटक झाल्यानंतर भाजपमधून त्याला निलंबित केल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. बावनथडे याच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच पक्षाकडे पाठविला होता, असेही खासदार नेते यांनी सांगितले. महिलांसोबत असे वर्तन पक्ष खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.