उंदराने कुरतडले मृतदेहाचे नाक अन्‌ दोन्ही डोळे

उंदराने कुरतडले मृतदेहाचे नाक अन्‌ दोन्ही डोळे

नागपर - इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारादरम्यान रुग्णांची हेळसांड होत असल्याचे नवीन नाही. परंतु, शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेल्या मृतदेहाचे दोन्ही डोळे कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी(ता. १३) पुढे आला. मेयोत मरणानंतर देहाची होणारी विटंबना केव्हा थांबेल. डोळे कुरतडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही निगरगट्ट मेयो प्रशासन मात्र ढिम्म आहे. नातेवाइकांनी मृतदेहाची विटंबना झाल्यानंतर जाब विचारण्याचा प्रयत्न केला. काही वेळ नातेवाइकांनी गोंधळ घातला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अखेर नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला.   

इंदोरा परिसरात फोटो स्टुडिओचा व्यवसाय करणारे  मधुकर टेंभूर्णे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागात पाठविण्यात आला. बुधवारी जरीपटका पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी टेंभूर्णे यांचा मृतदेह बाहेर काढला त्यावेळी शवाचे डोळे कुरतडल्याचे दिसले. नातेवाइकांनी डॉक्‍टरांची विचारपूस केली. परंतु, डॉक्‍टरांनी चुप्पी साधली. मृतदेहाची होत असलेली विटंबना न बघवल्याने नातेवाइकांनी काही वेळ गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी पंचनामा करताना मेयोच्या शवविच्छेदनगृहात मृतदेहाचे डोळे कुरतडल्याची नोंद केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे शवविच्छेदनानंतर शव दुपारी ३ वाजता स्वीकारले. मेयोच्या शवविच्छेदन विभागात उंदीर मृतदेह कुरतडतात ही बाब तत्कालीन आमदार आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत निदर्शनास आणून दिली होती. परंतु, त्यानंतरही मेयो प्रशासनाचे डोळे उघडले नाही. या विभागातील दरवाजे सुधारण्यात आले नाही. तीन ‘फ्रीज’ आहेत. येथेही छिद्र असल्याची माहिती पुढे आली. उंदरांनी टेंभूर्णे यांच्या दोन्ही डोळ्यांच्या सभोवताल कुरतडले. मृत शरीरातील डोळ्यांमधून रक्तबाहेर येईपर्यंत कुरतडले होते. नाकदेखील कुरतडल्यामुळे चेहरा अतिशय विद्रूप दिसत होता. उंदरांचा उच्छाद येथे गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. परंतु, मेयो प्रशासनाकडून हा प्रकार रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली नाही. यामुळेच ‘मेयोत मरणानंतरही देहाची होणारी विटंबना कधी थांबेल’, हा सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी मेयो प्रशासनाला विचारला आहे.  

प्रकरणाची माहिती नव्हती - डॉ. श्रीखंडे
मृतदेह कुरतडल्याची नातेवाइकांची तक्रार माझ्याकडे आली नाही. नातेवाइकांनी दुपारी ३ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वीकारला आणि ते घेऊन गेले. विभागप्रमुख डॉ. व्यवहारे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी येथील समस्येसंदर्भात पत्र प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले. लवकरच सुधारणा करण्यात येईल, असे मेयोच्या  अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे म्हणाल्या. 

डॉ. व्यवहारेंचे वैद्यकीय अधीक्षकांना पत्र 
मेयोचे शवविच्छेदन विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी १२ जुलै २०१७ रोजी येथील शवविच्छेदनगृहात मृतदेह ठेवताना चेहरा व पूर्ण शरीर झाकून व बांधून ठेवावे. येथील दरवाजा बरोबर नाही. कोल्डस्टोरेजमध्येही काही समस्या आहेत. येथील कर्मचारी व्यवस्थित मृतदेह  झाकत नसल्याने यापूर्वी मृतदेह कुरतडण्याचे प्रकार झाले आहेत. असे लेखी पत्र महिनाभरापूर्वी विद्यमान वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहे. 

मेयोत मृतदेह कुरतडण्याचा इतिहास  
अकरा मार्च २०११ रोजी सुमन बोबडे या महिलेचे दोन्ही डोळे आणि पापण्या उंदराने कुरतडले होते. यानंतर दोन दिवसांनी १३ मार्च २०११ रोजी उत्तर नागपुरातील कपिलनगरात झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या माधुरी ऊर्फ विभा निकोसे या ४४ वर्षीय महिलेच्या उजव्या डोळ्याची पापणी आणि डोळ्याखालचा भागही उंदराने कुरतडला. १७ मार्च रोजी रुक्‍मिणी लोधी या अठरा वर्षीय युवतीचे कान कुरतडले गेले होते.

मेडिकलमध्ये शवाला मुंग्या... 
मेडिकलमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी देहदान केले होते. देहदान  झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या शवाला मुंग्या लागल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकरणाने मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने धडा घेत तत्कालीन विभागप्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित यांनी न्यायवैद्यकशास्त्र विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याला खबरदारीच्या सूचना दिल्या. शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह व्हरांड्यात ठेवू नयेत, कॅबिनेटमध्येच ठेवावे अशा सूचना दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com