बापरे! संपूर्ण गावच "हॉटस्पॉट'; कसा आला 'या' गावात कोरोना वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

तालुक्‍यातील सोनई येथे 10 पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने प्रशासनाने संपूर्ण सोनई गावच "हॉटस्पॉट' म्हणुन जाहिर केले आहे. दरम्यान सोनईतील सर्व व्यवहार शुक्रवारापर्यंत (ता. 24) बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्‍यातील सोनई येथे 10 पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने प्रशासनाने संपूर्ण सोनई गावच "हॉटस्पॉट' म्हणुन जाहिर केले आहे. दरम्यान सोनईतील सर्व व्यवहार शुक्रवारापर्यंत (ता. 24) बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली. दरम्यान सोनईमध्ये सनियत्रंण अधिकारी म्हणुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
मंगळवारी (ता. 7) औरंगाबाद येथील एका विवाहास गेलेल्या तरुणांचा कोरोनासदृश्‍य आजाराने मृत्यु झाला होता. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची तपासणी केली होती. गुरूवारी (ता. 9) उशीरा त्यांचे अहवाल आले असुन त्यापैकी 10 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह तर आठजण निगेटिव्ह आले होते. दोन अहवाल बाकी होते. त्यातील एक अहवाल रविवारी दुपारी पॉझिटिव्ह आल्याने सोनईकरांबरोबर परिसरातील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तहसीलदार रुपेश सुराणा, विभागिय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस उपनिरीक्षक जनार्धन सोनवणे व आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करत योग्य ती खबरदारी घेऊन उपाय योजना करण्याचे आदेश दिले. 

अशी देणार अत्यावश्‍यक सेवा 
नागरिकांची अत्यावश्‍यक सेवा पुरविण्यासाठी प्रशासनाने "होम डिलिव्हरी'ची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सोनई येथील घरपोच सेवा देतील त्या किराणा, औषधे, दूध विक्री दुकानांचे फोन, मोबाईलनंबर प्रसिद्ध केले आहेत. नागरिकांनी त्या नंबरवर संपर्क साधून हव्या त्या वस्तू पैसे देऊन घरपोच मागवता येतील. यासाठी लवकरच आम्ही नेवासकर सारखे ऍप प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. 
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा म्हणाले, एकूण वीसजणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकूण आकारा व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून विनाकारण घराबाहेर पडु नये. अफवावर विश्वास ठेवु नये तसेच खबरदारीचा उपाय म्हणुन प्रशासनाचे नियम पाळावे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 corona positive patients in Sonai village in Nevasa taluka