लाॅकडाऊनच्या काळात माउंट अबूचे 111 भाविक नगरमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

नगरमधील नवोदय विद्यालयाचे अभ्यास दौऱ्यावर गेलेले 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील राजीव पुरम नवोदय विद्यालयात अडकले, तर तेथील 23 विद्यार्थी टाकळी ढोकेश्‍वर नवोदय विद्यालयात अडकले. तसेच नगरमधील 32 विद्यार्थी राजस्थानातील कोटा, जिल्ह्यातील 111 भाविक माउंट अबू येथे अडकले.

नगर ः ""माउंट अबू (राजस्थान) येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्यालयात गेलेले व लॉकडाउनमुळे अडकलेले जिल्ह्यातील 111 भाविक, तसेच कोटा येथील नगरमधील विद्यार्थी घेऊन राज्य परिवहनच्या बस नगरमध्ये दाखल झाल्या. आता उत्तर प्रदेश येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानंतर बसेस रवाना होतील,'' अशी माहिती राज्य परिवहन मंडळाचे विभागनियंत्रक विजय गिते यांनी दिली. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी झाल्या. जनता कर्फ्यूनंतर लॉकडाउनचा पहिला टप्पा, तर 3 मेपर्यंत दुसरा टप्पा घोषित झाला. लॉकडाउनच्या काळात जेथे आहे तेथेच थांबा, असे आदेश जारी झाले. प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद झाली. घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली. बाहेर राज्यात अडकलेले विद्यार्थी, भाविक अडकून पडले.

नगरमधील नवोदय विद्यालयाचे अभ्यास दौऱ्यावर गेलेले 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील राजीव पुरम नवोदय विद्यालयात अडकले, तर तेथील 23 विद्यार्थी टाकळी ढोकेश्‍वर नवोदय विद्यालयात अडकले. तसेच नगरमधील 32 विद्यार्थी राजस्थानातील कोटा, जिल्ह्यातील 111 भाविक माउंट अबू येथे अडकले.

कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या धुळे आगारातील चार बस रवाना होऊन शुक्रवारी (ता. 1) नगरमध्ये दाखल झाल्या. नगरमधील 32 विद्यार्थ्यांची घरवापसी झाली. नगरमध्ये पोचताच आरोग्य यंत्रणेने तपासणी करीत निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. नगरमधील विद्यार्थ्यांसोबत सातारा, पुणे, कोल्हापूर येथील 90 विद्यार्थ्यांना घेऊन बस दाखल झाल्या. तारकपूर येथील बसस्थानकात या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करीत त्यांना पुढे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्देशानुसार नवोदयच्या विद्यार्थ्यांना घेऊन सीटर-स्लीपर बस उन्नावकडे रवाना होणार आहे. 

111 भाविक झाले क्वारंटाईन 
जिल्ह्यातील 111 भाविक दहा मार्च रोजी माउंट अबू येथे गेले होते. लॉकडाउनमुळे अडकलेल्या भाविकांना परत आणण्यासाठी दीड महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. 38 भाविकांची एक बस आज राहुरीत दाखल झाली. या बसमध्ये देवळाली प्रवरा येथील नऊ, राहुरी शहरातील वीस, श्रीरामपूर तालुक्‍यातील दोन, सोनई (ता. नेवासे) येथील दोन, अकोले तालुक्‍यातील पाच जण होते. त्यांची राहुरी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी झाली. सर्वांना चौदा दिवस क्वारंटाईन ठेवले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असून, कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 111 devotees in the town of Mount Abu during the lockdown