बापरे! शेवगावमध्ये १२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ‘एवढ्या’ दिवस केला लॉकडाऊन जाहीर

सचिन सातपुते
Saturday, 18 July 2020

मागील दोन-तीन दिवसात सापडलेल्या पाच रुग्णांपैकी एकाच्या संपर्कात आलेले सात तर मुंगी ता. शेवगाव येथील पाच जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. यापुर्वी सापडलेले निंबे नांदूर येथील दोन रुग्न उपचार घेत आहेत.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यात शनिवारी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात शहरातील सात तर मुंगी येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण शहर शनिवार (ता.१८) ते मंगळवार (ता.२८) जुलै असे दहा दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचा आदेश तहसीलदार अर्चना भाकड यांनी काढला आहे.

मागील दोन-तीन दिवसात सापडलेल्या पाच रुग्णांपैकी एकाच्या संपर्कात आलेले सात तर मुंगी ता. शेवगाव येथील पाच जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. यापुर्वी सापडलेले निंबे नांदूर येथील दोन रुग्न उपचार घेत आहेत. सध्या तालुक्यातील करोना बाधित रूग्ण संख्या १९ आहे. तालुक्यात आतापर्यंत ४० कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील २१ रुग्ण बरे झाले आहेत. पाटील रुग्णालय पैठण रोड शेवगाव येथे कोवीड उपचारासाठी रुग्णालय तयार केले असून येथे कमी लक्षणे असणा-या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

त्यातील एक रुग्ण आज बरा झाला असून त्याला डिस्चार्ज दिला आहे. तर जे रुग्ण अत्यवस्थ असतील त्यांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. तसेच नेवासे रस्त्यावरील त्रिमुर्ती पब्लिक स्कुल येथे कोवीड सेंटर स्थापन करुन तेथे पाँझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३०७ नागरीकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. ते स्वँब नगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात.

दरम्यान शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आज शनिवार (ता.१८) जुलैपासून मंगळवार (ता.२८) जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास  शहरातील व तालुक्यातील संसर्ग थांबवता येईल त्यामुळे येत्या दहा दिवस नागरीकांनी घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार अर्चना भाकड यांनी केले आहे. 

 शहरातील व तालुक्यातील रूग्णसंख्येच्या प्रशासनाकडून जाहीर केलेल्या जाणा-या आकडेवारीत  विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी व महसूल प्रशासन यांच्यात ताळमेळ दिसत नाही, या गंभीर विषयाबाबत प्रशासनातील समन्वयाअभावीे सोशल मीडियावरून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 people from Shevgaon taluka have received corona positive reports