गळके छत, तडे गेलेल्या खाेल्‍यांंत ज्ञानार्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12 Zilla Parishad schools waiting for repairs in Srirampur

गळके छत, तडे गेलेल्या खाेल्‍यांंत ज्ञानार्जन

श्रीरामपूर - गळणारे छत, जुने झालेले बांधकाम, तडे गेलेल्या भिंती या अवस्थेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहेत. तालुक्यातील ३२ शाळांना दुरुस्तीची आवश्यकता असून २० शाळांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली, तर १२ शाळा अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सन २०२१-२२ साठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रमाने प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले. त्यातील २० शाळांच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली. उर्वरित १२ शाळांसाठी ३४ लाख ५० हजार रुपये दुरुस्तीसाठी खर्च अपेक्षित असून अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही. दुरुस्ती करावयाच्या शाळांची स्लॅब गळती, फरशी, दरवाजे, खिडक्या, भिंतींचे प्लास्टर, पत्रे बदलणे, पडवीची दुरुस्ती अशी कामे करावी लागणार आहेत.

आजरोजी १०५ खोल्या उपलब्ध असून मंजूर शिक्षक संख्येनुसार १०३ खोल्यांची आवश्यकता असली तरी त्यातील केवळ ५४ वर्गखोल्याच ज्ञानदानासाठी वापरण्यायोग्य आहेत. ५१ खोल्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून ४९ खोल्या नव्याने बांधाव्या लागणार आहेत. खानापूर शाळेच्या तीन व बेलापूर उर्दू शाळेच्या आठ खोल्यांच्या निर्लेखनाला मंजुरी मिळाली आहे. खोकर शाळेच्या दहा खोल्यांचे निर्लेखन पूर्ण झाले आहे. एकलहरे मराठी शाळेचे निर्लेखन प्रस्तावित असून आठवाडी (एकलहरे) या शाळेला एक खोली नव्याने बांधावी लागणार असली तरी येथे जागेची उपलब्धता नाही.

नायगाव नवे, उंदिरगाव (मराठी), माळेवाडी, संतगड, ए ब्लॉकवाडी, सर्कल नंबर सहा, इंदिरानगर, रामकृष्णनगर, जाधव वस्ती (वडाळा), जाटे वस्ती, कडीत खुर्द, गोंडेगाव, कुरणपूर, जाधव वस्ती (टाकळीभान), अशोकनगर, कमालपूर, एकलहरे (मराठी), दिघी, मांडवे, कारेगाव या शाळांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळालेली आहे. मात्र, उंबरगाव, निमगाव खैरी, महांकाळ वाडगाव, भोकर, खैरी, खंडाळा, टाकळीभान, फत्त्याबाद, नरसाळी, एकलहरे (उर्दू), बेलापूर मुले, वडाळा आदी शाळांच्या दुरुस्तीसाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

दर सहा महिन्याला शाळांकडून नवीन वर्ग खोल्या व अडचणीसंदर्भात प्रस्ताव मागिवले जातात. विद्यार्थ्यांचा पट, दुरूस्तीची आवश्यकता यानुसार प्राधान्याक्रम ठरवून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले जातात. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून टप्प्यटप्प्याने निधी मंजूर होवून कामे मार्गी लावली जातात. तालुक्यातील शाळांच्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत.

- साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी.

Web Title: 12 Zilla Parishad Schools Waiting For Repairs In Srirampur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top