
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मतदारांना आकर्षित करणासाठी उमेदवारांनी चिन्ह निवडीवर विशेष भर दिला आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मतदारांना आकर्षित करणासाठी उमेदवारांनी चिन्ह निवडीवर विशेष भर दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 190 मुक्त चिन्हांचा पर्याय दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता गावागावांत प्रचार मोहीम राबविण्यास प्रारंभ होत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पराभवासाठी योग्य चिन्हासह रणनीती आखाणीला वेग आला आहे. त्यामुळे गावोगावी रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबत सुरु आहे. निवडणूक चिन्हांमध्ये भाजीपाला आणि विविध फळांसह गृहोपयोगी वस्तूंचा समावेश केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून सोमवारी (ता. 4) अर्ज माघार घेण्यासह आणि निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. प्रत्येक निवडणूकीत मतदारांना आकर्षित करणारे चिन्ह महत्वाचे मानले जाते.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 190 मुक्त चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिला आहे. त्यात विविध फळे, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, बॅट, छत्री, अंगठी, फळा, बस, रेल्वे, कपाट, पेन, नारळ, खेळांचे साहित्य, काडेपेटी, शिवणयंत्र, ब्रश, कढई, किटली, पंख्यासह जीवनावश्यक वस्तूंचे पर्याय ठेवले आहे. उमेदवारांना हवे असलेल्या निवडणूक चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे.
अर्जामध्ये प्राधान्य क्रमानुसार पाच चिन्हांचा पर्याय नमुद करावा लागला आहे. एका प्रभागात वाटप झालेले ठराविक चिन्ह त्याच प्रभागातील दुसऱ्या उमेदवरांना पुन्हा मिळणार नाही. वाटप झालेले चिन्ह वगळता उर्वरीत इतर चिन्ह पर्यायानुसार वाटप केले जाणार आहे. 190 चिन्हांमध्ये पारंपरिक चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या 279 सदस्यपदांसाठी एक हजार 110 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातील विविध ठिकाणचे 22 अर्ज काल (ता. 31) छानणी प्रक्रियेत अवैध ठरले आहे. टाकळीभान चार, बेलापूर बुद्रूक तीन, बेलापूर खुर्द एक, भेर्डापूर एक, मालुंजा बुद्रूक एक, खोकर तीन, महांकळवाडगाव एक, मातुलठाण चार, मांडवे तीन असे एकुण 22 उमेदवारी अर्ज बाद झाले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर