उत्तर प्रदेशमध्ये अडकलेले 16 विद्यार्थी नगरला दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

उत्तर प्रदेशात अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली व आठ मुलांचा समावेश आहे. तसेच नगरमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये 15 मुले व 8 मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी वर्षभरापासून राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. 

नगर : राज्यांच्या संस्कृतीच्या अभ्यासासाठी उत्तर प्रदेशला गेलेले जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थी अखेर आज रात्री उशिरा नगरमध्ये दाखल झाले. त्यांना टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) येथील नवोदय विद्यालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

दरम्यान, उत्तर प्रदेशातून येथे आलेले 23 विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकले होते. त्यांना उन्नाव येथे सोडून, तेथून 16 विद्यार्थी नगरला आणण्याबाबत नवोदय विद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले होते.

राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास

जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेत, नगरमधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, राज्याच्या सीमाबंदीची आडकाठी येत होती. उत्तर प्रदेशात अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली व आठ मुलांचा समावेश आहे. तसेच नगरमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये 15 मुले व 8 मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी वर्षभरापासून राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. 

रात्री उशिरा नगरमध्ये

अखेर केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेले विविध स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेस वेग आला. नगरच्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश येथून निघालेली बस मध्य प्रदेशातील राजगड, देवास, शिवपुरी, पुरणखेडे, धुळे, मालेगाव, मनमाडमार्गे आज रात्री उशिरा नगरमध्ये दाखल झाली. 

14 दिवस "क्वारंटाईन

नगरमधील 16 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांची रवानगी टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात करण्यात आली. त्यांना तेथेच 14 दिवस "क्वारंटाईन' करून निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. 
- जितेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 Students came in Nagar whome were stranded in Uttar Pradesh