esakal | एसटीची दिवाळी! प्रवाशांची गर्दी वाढली, नगरमध्ये ३५० बसच्या माध्यमातून ३५ हजार प्रवाशी
sakal

बोलून बातमी शोधा

35 thousand passengers in the city through 350 buses

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी मार्चमध्ये केलेल्या लॉकडाउनपासून एसटी प्रशासनाची घडी विस्कटलेली आहे.

एसटीची दिवाळी! प्रवाशांची गर्दी वाढली, नगरमध्ये ३५० बसच्या माध्यमातून ३५ हजार प्रवाशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी मार्चमध्ये केलेल्या लॉकडाउनपासून एसटी प्रशासनाची घडी विस्कटलेली आहे. ती पूर्ववत होण्यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने एसटीपुढे मोठा पेच उभा राहिला. दिवाळी सणामुळे आता एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने फेऱ्याही वाढविण्यात येत आहेत. 

कोरोना संकटामुळे एसटी प्रशासनाला मोठा फटका बसला. संपूर्ण घडी विस्कटली. एसटीची घडी पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी त्यात प्रशासनाला फारसे यश आलेले नाही. मात्र, सध्या दिवाळीची धामधूम सुरू झाल्यामुळे एसटीला प्रवाशांची गर्दी दिसून येऊ लागली आहे. एसटीच्या आता आंतरजिल्हा, आंतरराज्य बस सुरू आहेत. 350 बसच्या माध्यमातून रोज 950 फेऱ्या केल्या जात आहेत.

शुक्रवारी जिल्ह्यातील 350 बसच्या माध्यमातून 35 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे एसटी प्रशासनाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच, दिवाळीमुळे जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या गावांमध्येही एसटीकडून जादा बसचे नियोजन करण्यात आले असले, तरी गर्दी पाहूनच या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर