तरच गावांना विनाव्यत्यय योग्य दाबाने अखंडीत वीजपुरवठा करणे शक्‍य होईल

विलास कुलकर्णी
Tuesday, 11 August 2020

राहुरी खुर्द येथे महावितरणच्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रात अतिरिक्त क्षमतावाढीसाठी 5 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारणीचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी खुर्द येथे महावितरणच्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्रात अतिरिक्त क्षमतावाढीसाठी 5 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारणीचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

एक कोटी 20 लाख रुपये खर्चाच्या या कामात नवीन 11 केव्ही क्षमतेच्या तीन उच्चदाब वीजवाहिन्यांची कामे समाविष्ट आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील 12 गावांना विनाव्यत्यय योग्य दाबाने अखंडीत वीजपुरवठा करणे शक्‍य होईल, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. 

राहुरी खुर्द येथे महावितरणच्या वीज उपकेंद्रात 5 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारणीच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता (नाशिक) संजय खंदारे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता शरद बंड, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, १५ किलोमीटर लांबीच्या तीन नवीन उच्चदाब वीजवाहिन्या उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या उच्चदाब वीज वाहिन्यांचा विद्युत भार कमी होईल. राहुरी खुर्द, राहुरी शहरातील काही भाग, तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, देसवंडी, उंबरे, बारागाव नांदूर, पिंप्री अवघड, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, गडदे आखाडा या गावांना अखंडीत वीजपुरवठा होईल. वांबोरी, आरडगाव व ताहाराबाद येथील वीज उपकेंद्रांच्या पाच किलोमीटर परिघात सरकारी जमिनीत मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प उभारून येथील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात 50 नवीन रोहित्रे उपलब्ध करून दिली आहेत. कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर आणखी रोहित्रे उपलब्ध करून दिली जातील, असेही ते म्हणाले. मंत्री तनपुरे यांच्या हस्ते महावितरणच्या दोन ऍनिमेटेड लघुपटांचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यात ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक फिल्म असून, विद्युत रोहित्र नादुरूस्त होऊ नये, यासाठी घ्यायची काळजी, या विषयावर दुसरी फिल्म आहे. महावितरणतर्फे राज्यभर सोशल मीडियाद्वारे या शॉर्टफिल्म प्रसारित होणार आहेत. 
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 MVA capacity Rohitra for additional capacity increase in MSEDCL substation in Rahuri taluka