esakal | नेवासेत ६३ रिक्षाचालकांनी बदलला व्यवसाय; कोण विकतय भंगार तर कोण भाजीपाला
sakal

बोलून बातमी शोधा

63 auto rickshaw drivers change business in Nevasa

कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली.

नेवासेत ६३ रिक्षाचालकांनी बदलला व्यवसाय; कोण विकतय भंगार तर कोण भाजीपाला

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. या संकटावर मात करण्याकरिता नेवासे तालुक्यातील कुकाणे व परिसरातील अनेक गावांतील रिक्षाचालकांनी फळ व भाजीपाला विक्रीचे दुकान सुरु केले आहे.

कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरु करण्यात आले. या लॉकडाऊनदरम्यान बससेवा बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प होती. तसेच शहरासह मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावातील अंतर्गत वाहतूकही बंद असल्याने रिक्षा पूर्णत: बंद होते. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक स्रोत बंद झाले. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतला. त्यामुळे कर्जाचा डोंगर रिक्षाचालकांवर होता. 

नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे, भानसहिवरेसह परिसरातील अनेक गावांत एकूण 148 कुटुंबियांची गुजराण रिक्षावर अवलंबून आहे. यातील 86 रिक्षाचालकांसह मालकांनी या कोरोना परिस्थितीवर मात करीत फळ- भाजीपाला विक्रीचे दुकने सुरु केले. त्यांनी कुकाणे, भेंडे, भानसहिवरे, नेवासे फाटा येथील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्ली व खेडोपाडी जाऊन फिरते भाजीपाला व फळ विक्री सुरू केली. यात सर्वाधिक 54 कुकाणे येथील रिक्षाचालक व मालक या व्यवसाय करत आहेत

62 रिक्षाचालकांनी शोधला हा मार्ग 
कुकाणे व परिसरातील 148 पैकी 86 रिक्षाचालकांनी फळ- भाजीपाला तर उर्वरित 62 जणांनी भंगार व कापूस खरेदी-विक्री, पाच-सहा जणांची टोळी करून कापूस वेचणी तर काहींनी साखर कारखान्यांवर उसतोडीचा मार्ग स्वीकारला आहे. 

23मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद झाला. त्यानंतरही कोरोना विषाणूवर लस निघेपर्यंत लॉकडाऊन उघडेल, अशी परिस्थिती नव्हती. आणखी वाट बघण्यापेक्षा फळ विक्री करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणे सुरु होते. त्यामुळे यापैकीच एक व्यवसाय निवडणे गरजेचे होते. त्यामुळे फळविक्री व भाजीपाला विक्री सुरू केली.
- युनूस नालबंद, रिक्षाचालक-मालक, कुकाणे
 

संपादन : अशोक मुरुमकर