संगमनेर तालुक्यातील जनावरांचे लसीकरण व टॅगींगचे 64 टक्के काम पूर्ण

आनंद गायकवाड
Friday, 30 October 2020

राज्यभरात जनावरांच्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या लाळ व खुरकूत अभियानास सुरवात झाली आहे. या अंतर्गत संगमनेर तालुक्यात सुमारे 64 टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : राज्यभरात जनावरांच्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या लाळ व खुरकूत अभियानास सुरवात झाली आहे. या अंतर्गत संगमनेर तालुक्यात सुमारे 64 टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमनेर तालुक्यात लाळ खुरकूत रोग प्रतिबंध लसीकरण तसेच सर्व जनावरांचे टॅगिंग करून त्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्यात येत आहेत. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणारी जनावरे, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती यांना पत्र देऊन परिसरातील बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस तोडणी किंवा विक्रीत आलेल्या सर्व जनावरांना लाळ खुरकुत, लंपी स्क्रीन व डिसीज या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील 171 गावांमध्ये एक लाख 67 हजार 900 जनावरांचे लाळ खुरकूत लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावयाचे असून, अत्तपर्यंत संगमनेर तालुक्यात 64 टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमनेर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. भागुनाथ शिंदे, डॉ. भगवान गुंजाळ, डॉ. संजय थोरात, डॉ. संतोष वाकचौरे, डॉ. नितीन जोंधळे, डॉ. आझाद पानसरे, डॉ. सुनील शिन्दोरे, डॉ. बालाजी देवकाते, डॉ. बाळासाहेब वाकचौरे, डॉ. बबन फटांगरे आदींसह पशुधन पर्यवेक्षक डॉ. साहेबराव भागवत, डॉ. आशुतोष राहाणे, डॉ. कुंडलिक बरकले, डॉ. सतीश शिरसाठ, डॉ. भास्कर कुडाळ, डॉ. संजय दिघे, डॉ. शिवाजी फड, डॉ. रविंद्र घोडके, डॉ. नंदकुमार डोखे, डॉ. नवनाथ दिघे, डॉ. कृष्णा घोगरे व डॉ. प्रविण काढणे आदींसह तालुक्यातील खासगी पशुवैद्यकिय चिकीत्सक सहभागी झाले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 64 percent completion of vaccination and tagging of animals in Sangamner taluka