म्हणून कृषी विद्यापीठातील 'शेतकरी निवास' बनलंय अतिसंवेदनशील

विलास कुलकर्णी
Wednesday, 5 August 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये राज्यभरातून भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या 'शेतकरी निवास' मध्ये सध्या नगर जिल्ह्यातील तब्बल ६६ सराईत गुन्हेगार निवासी आहेत.

राहुरी (अहमदनगर) : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये राज्यभरातून भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या 'शेतकरी निवास' मध्ये सध्या नगर जिल्ह्यातील तब्बल ६६ सराईत गुन्हेगार निवासी आहेत. कारण,  'शेतकरी निवास' चे रूपांतर कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तात्पुरते कोवीड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे.  त्यामुळे, कृषी विद्यापीठ परिसर सध्या अतिसंवेदनशील बनला आहे.

राहुरी येथे कृषी विद्यापीठ आवारातील कृषी पदवीधर व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सरकारने यापूर्वी अधिग्रहित केली. तेथे राहुरी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार व कोरोना संशयित व्यक्तींना क्वारंटाईन ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, कृषी विद्यापीठ परिसर यापूर्वीच संवेदनशील बनला आहे. त्यात, आता आणखी भर पडली आहे.

शनिवारी (ता. १) जिल्हा पोलिस प्रमुख अखीलेशकुमार सिंह यांनी कृषी विद्यापीठातील कैद्यांच्या कोवीड केअर सेंटरच्या सुरक्षेची पाहणी केली. नंतर, जिल्ह्यातील पाच ठिकाणच्या कारागृहात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या तब्बल ६६ सराईत गुन्हेगारांना 'शेतकरी निवास'मध्ये तात्पुरती व्यवस्था केली. त्यामुळे, कृषी विद्यापीठ परिसराला छावणीचे स्वरूप मिळाले आहे. 'शेतकरी निवास' इमारतीवर अनेक सीसीटीव्हीचे कॅमेरे नजर रोखून आहेत. त्यामुळे, कृषी विद्यापीठ परिसर अतिसंवेदनशील झाला आहे.

जिल्हाधिकारी यांनी नगर येथे जिल्हा कारागृहा नजिकची एक शाळा अधिग्रहित केली आहे. तेथे कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी कोवीड केअर सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कृषी विद्यापीठातील कैद्यांना लवकरच तिकडे हलविण्यात येणार असल्याचे समजते.

शेतकरी निवासमधील कैद्यांची संख्या : 
नेवासा : १८ 
पारनेर : २६ 
श्रीरामपूर : १९
राहुरी : ०२
लोणी : ०१

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 66 prisoners in the farmers residence of Mahatma Phule Agricultural University in Rahuri