संगमनेरमधील व्यापारी संकुलासह 73 इमारती धोकादायक; 107 जणांना नोटिसा

आनंद गायकवाड
Thursday, 1 October 2020

नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर धोकादायक ठरली.

संगमनेर (अहमदनगर) : शहरातील नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील इमारत स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर धोकादायक ठरली. त्यातील 34 गाळेधारकांसह आता शहरातील अन्य 73 इमारतींच्या 107 वापरकर्त्यांना वास्तू खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात नगरपरिषदेच्या, मेहतर समाजाचे वास्तव्य असलेल्या इंदिरा वसाहतीचा समावेश आहे. 

दरम्यान, आठ दिवसांत घरे खाली करण्याचा आदेश मिळाल्याने खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या विविध इमारतींसह अन्य शासकीय इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यातून व्यापारी संकुलासह 73 वास्तू धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

त्यानुसार 11 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांतर्गत व्यापारी संकुलातील 34 गाळेधारकांसह वाल्मीक कॉलनीतील इंदिरा वसाहतीतील 36, मोमीनपुरा भागातील अंजुमन इमारतीतील 16, परदेशपुऱ्यातील तीन, पार्श्‍वनाथ गल्ली, बाजारपेठ व सय्यदबाबा चौकातील दोन व मेन रोड, कोष्टी गल्ली, खंडोबा गल्ली, नारळ गल्ली, मोमीनपुरा, चंद्रशेखर चौक, सुतार गल्ली, शिकलकर गल्ली, तेली खुंट, साईनाथ चौक व साळीवाडा भागातील प्रत्येकी एक, अशा 107 भोगवटादारांना गाळे अथवा घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने या सर्व भोगवटाधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 

40 वर्षांपूर्वी शहरात सफाईचे काम करणाऱ्या मेहतर समाजासाठी म्हाळुंगी नदीच्या काठावर 36 खोल्यांची दोन मजली इंदिरा वसाहत निर्माण केली होती. यात 36 कुटुंबे राहत आहेत. या जागेवर नव्याने रहिवासी संकुल उभारण्याची योजना असल्याचे, तसेच सरसकट वास्तू पाडण्याऐवजी, आहे त्या इमारतींचे आयुष्य आणि भक्कमपणा वाढवता येणे शक्‍य असल्यास त्या पर्यायावरही प्रशासकीय पातळीवरून विचार सुरू असल्याचे समजते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 73 buildings including commercial complex in Sangamner are dangerous