बाप-लेक दुचाकीवर घरी जात असताना डंपरची धडक; आठ वर्षाचा चिमुकला ठार 

विलास कुलकर्णी 
Saturday, 25 July 2020

कणगर येथे शनिवारी (ता. 25) सकाळी साडेअकरा वाजता मुरुम वाहतुकीच्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली.

राहुरी (अहमदनगर) : कणगर येथे शनिवारी (ता. 25) सकाळी साडेअकरा वाजता मुरुम वाहतुकीच्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यात, दुचाकीवर वडिलांच्या मागे बसलेला आठ वर्षांचा मुलगा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. तर दुचाकी चालक जखमी झाले. 

कार्तिक बबन उऱ्हे (वय 8, रा. कणगर) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर बबन उऱ्हे (वय 32, रा. कणगर) असे जखमीचे नाव आहे. कणगर गावातून वडाचे लवन रस्त्यावर घरी जाण्यासाठी बबन उऱ्हे दुचाकीवरून चालले होते. त्यांचा आठ वर्षाचा मुलगा कार्तिक दुचाकीवर मागे बसला होता. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मुरूम वाहतुकीच्या बिगर नंबरच्या डंपरने दुचाकीला जोराचा धक्का दिला. कच्चा रस्ता असल्याने पावसाने चिखल झाला होता. त्यात, डंपरचा धक्का बसल्याने दुचाकी घसरली. मुलगा रस्त्यावर पडला.

डंपरचे चाक अंगावरून गेल्याने जागीच ठार झाला. दुचाकी चालक बबन उऱ्हे रस्त्याच्या बाजूला पडल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने राहुरी फॅक्‍टरी येथे रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना लोणी येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An 8 year boy killed after being accident twowheeler and dumper in Rahuri taluka